BMC Mayor Election : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-एकनाथ शिंदे गट युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी महापौरपदाच्या निवडीसाठी राजकीय सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिंदे गटाने थेट मुंबईच्या महापौरपदावर दावा सांगितला असून, त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना शनिवारी मुंबईतील एका लग्जरी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तिखट वक्तव्याने मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये ही जवळपास सर्वांची इच्छा आहे. एकनाथ शिंदे यांनी कोणत्या पदासाठी इतका आग्रह धरला आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिंदे गटाला “भाजपचे अंगवस्त्र” असल्याची टीका केली. अमित शहा हे त्यांचे प्रमुख असल्याने ते त्यांच्याकडे मागणी घेऊन जातील, पण देवेंद्र फडणवीस ऐकणार नाहीत, अशी माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे गटाने नगरसेवकांना हॉटेलमध्ये “बंद” ठेवले असल्याची टीका करत राऊत म्हणाले, ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांनाच आता नगरसेवक पळवले जातील अशी भीती वाटते. जे आमदार सुरतला घेऊन गेले होते, त्यांनी नगरसेवकांनाही सूरत किंवा अहमदाबादला नेण्याची गरज होती, पण मुंबईच नगरसेवकांसाठी सर्वांत सुरक्षित शहर आहे, असा व्यंगात्मक टोला त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री असूनही त्यांना नगरसेवक पळतील अशी भीती वाटत असल्याचे सांगत राऊत यांनी पुढे म्हटले की, शिंदे गटातील अनेक नगरसेवक नवीन चेहरे असले तरी तेही शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनातही मराठी माणसाची मशाल धगधगत आहे आणि भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळपास सर्वांनी ठरवले आहे. कितीही कोंडले तरी संपर्काचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, संदेश कसाही पोहोचवता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे सांगत राऊत यांनी खुलासा केला की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असून, महापौर हा शिवसेनेचा व्हावा अशी इच्छा आहे. बहुमत कितीही असले तरी ते चंचल असते आणि इथून तिकडे जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीचा महापौर निवडला जाणार असता तर नगरसेवकांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवण्याची गरज नव्हती, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई भाजपला आंदण देण्याची कोणालाही इच्छा होणार नाही आणि विचारांसाठी बंड करण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांनाच नाही, असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी दिला. सध्या महायुतीकडे बहुमत असले तरी महापौरपदावरून सुरू असलेला हा अंतर्गत आणि बाह्य तणाव मुंबईच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतो. पुढील काही दिवसांत या सस्पेन्सचा निकाल लागण्याची शक्यता आहे.