मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (वंचित) यांची युती चर्चेत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितने इंडिया आघाडीला मोठा फटका दिल्याने यावेळी मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसने विशेष प्रयत्न केले. त्यानुसार, २२७ प्रभागांपैकी वंचितला तब्बल ६२ जागा देण्यात आल्या. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये मोठा उलटफेर झाला. वंचितकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांच्या १६ जागा काँग्रेसला परत देण्यात आल्या, पण ऐनवेळी काँग्रेसलाही त्या जागांवर उमेदवार उभे करणे शक्य झाले नाही. परिणामी, मुंबई काँग्रेसने १४६ जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले, वंचितने ४६ जागांवर लढण्यासाठी अर्ज भरले, तर डावे पक्ष आणि महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षासारख्या मित्रपक्षांना काही जागा देण्यात आल्या. एकूण आघाडीने सुमारे १९५ जागांवर लढत दिली. उर्वरित तब्बल ३२ प्रभागांत काँग्रेस-वंचित आघाडीचा एकही उमेदवार उभा राहू शकला नाही. या ३२ प्रभागांत आता थेट लढत होणार आहे. एकीकडे भाजप-शिंदे सेना (महायुती) युतीचे उमेदवार, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसे युतीचे (ठाकरे बंधूंच्या आघाडीचे) उमेदवार. तिसरा मजबूत पर्याय नसल्याने मतविभाजनाची शक्यता जवळपास नाहीशी झाली आहे. जाणकारांच्या मते, याचा थेट फायदा ठाकरे बंधूंना होईल. दलित आणि मुस्लिम मतदार हे पारंपरिकपणे काँग्रेस आणि वंचितची मतपेटी मानले जातात. या ३२ प्रभागांत आघाडीचा उमेदवार नसल्याने ही मते भाजपविरोधी म्हणून ठाकरे बंधूंच्या उमेदवारांकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही प्रभागांत उमेदवार सक्षम नसणे, तर काही ठिकाणी इच्छुकांच्या कागदपत्रांमध्ये अडचणी येणे, अशी कारणे समोर आली आहेत. वंचितने या जागा ऐनवेळी काँग्रेसला परत दिल्या, पण नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत संपल्याने काँग्रेसला नवे उमेदवार शोधता आले नाहीत. मुंबई महापालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, या घडामोडींमुळे शहरातील राजकीय समीकरणे अधिक रोचक झाली आहेत. मतविभाजन टळल्याने ठाकरे बंधूंच्या आघाडीला मजबुती मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस-वंचित युतीला मात्र अंतर्गत समन्वयाच्या अभावाचा फटका बसला आहे.