Ravindra Chavan : राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर विविध ठिकाणी महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी युत्या आघाड्या करून सत्ता समीकरणांची जुळवाजुळव करण्यात आली. चंद्रपूर महापालिकेत आघाडीतील संघर्षांचा फायदा भाजपने घेतला आणि भाजपचा महापौर या महापालिकेत विराजमान झाला. मात्र, भिंवडी महापालिकेत ऐनवेळी सेक्युलर फ्रंटचे पुरस्कृत उमेदवार नारायण चौधरी महापौर झाले. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नेमकं काय घडलं? ऐनवेळी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपमधून बंडखोरी करत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या सेक्युलर फ्रंटमध्ये नारायण चौधरी दाखल झाले होते. काँग्रेसनेही नारायण चौधरी यांना महापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. त्यांनाच मतदान करण्याबाबतचा व्हीप जारी केला होता. त्यामुळे त्यांना साथ देणाऱ्या आणि बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. 6 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई का करू नये? असा सवाल रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी भाजपचे बंडखोर नगरसेवक नेमकं काय उत्तर देतात आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यावर नेमकी काय कारवाई करतात, याकडे लक्ष असणार आहे. महापालिकेच्या स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात निवडणूक प्रक्रियेनंतर हात वर करुन झालेल्या मतदानात चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवले. नारायण चौधरी यांना 48 मतं मिळाली. भाजपच्या स्नेहा पाटील 25 आणि विलास पाटील यांना अवघे 16 मतं मिळाली. मूळ शेतकरी असलेल्या नारायण चौधरी यांनी बांधकाम व्यवसायिक ते महापौर असा प्रवास करत ते भिवंडीचे प्रथम नागरिक झाले. हेही वाचा : E-Challan : ५ मार्चपासून महाराष्ट्र ठप्प होणार? ई-चलनविरोधात लाखो वाहनधारक रस्त्यावर येण्याचा इशारा