Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात प्रक्षप्रवेशाची राजकीय घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने धक्का दिला आहे. केवळ राष्ट्रवादीचेच नव्हे, तर भारतीय जनता पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकीय समीकरणे बदलणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे ठाकरे गट नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे, या प्रवेशांमध्ये भाजपामधील काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने हा केवळ राष्ट्रवादीसाठीच नव्हे, तर भाजपसाठीही धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाने पक्षाच्या अधिकृत फेसबुकपेजवर या पक्ष प्रवेशाचे छायाचित्र प्रसिद्ध करून लिहिले की, छत्रपती संभाजीनगरमधील अजित पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश गाडेकर, भाजपचे सय्यद हय्यासा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. राजकीय वर्तुळात चर्चा – हा प्रवेश संभाजीनगरच्या आगामी स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील सध्याच्या राजकीय संघर्षात ठाकरेसेनेत झालेला हा प्रवेश निश्चितच ठाकरे गटाची ताकद वाढवणारा आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमधील नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे या दोन्ही पक्षांना संभाजीनगरमध्ये राजकीय हादरा बसला असून, शहरातील तसेच जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणे आता काय रूप घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.