नागपूर: उपराजधानीच्या राजकारणात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ५० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवूनही एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपने १०२ हून अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. महायुतीमधील भाजपच्या या विजयामुळे राज्याच्या उपराजधानीत भाजपचाच महापौर बसणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, दुसरीकडे शरद पवार गटाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. स्वतः शहराध्यक्षांचाच पराभव – दुनेश्वर पेठे हे स्वतः प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, गेल्या निवडणुकीत पेठे हे पक्षाचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक होते. यापूर्वी त्यांना विधानसभा निवडणुकीतही अपयश आले होते, आणि आता महापालिका निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पत्राद्वारे व्यक्त केली खंत- “नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. यापुढे पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहीन.” – दुनेश्वर पेठे