Bribery Case : बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे परळी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याकडून सोलंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कडे करण्यात आली होती. सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती असून तडजोडीनंतर २० हजारांवर सौदा ठरल्याचे समोर आले आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला. उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. काही वेळापूर्वी तहसीलदारांना लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदारांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचेही सांगण्यात येत आहे. तरीही एसीबीने आवश्यक पुरावे गोळा करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भ्रष्टाचाराविरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी अशा कठोर पावले आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.