Bangladesh Shooting team India visit 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी सुरक्षा कारणास्तव आपल्या क्रिकेट संघाला भारतात पाठवण्यास नकार देणाऱ्या बांगलादेश सरकारने आता एक अनपेक्षित निर्णय घेतला आहे. पुढच्या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ‘एशियन रायफल आणि पिस्टल चॅम्पियनशिप’ साठी बांगलादेशने आपल्या नेमबाजांना भारत प्रवासाची अधिकृत मंजुरी दिली आहे. बांगलादेशच्या या दुटप्पी भूमिकेमुळे क्रीडा विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेमबाजी स्पर्धेसाठी विशेष हिरवा कंदील – दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह नेमबाजी संकुलात २ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये १७ देशांतील ३०० हून अधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. बांगलादेशने या स्पर्धेसाठी दोन रायफल नेमबाजांना पाठवण्याचा निर्णय घेतला असून, ते तीन वेगवेगळ्या प्रकारांत आपले कौशल्य पणाला लावतील. क्रिकेटसाठी सुरक्षा धोक्यात, मग शूटिंगसाठी कशी काय सुरक्षितता? ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० वर्ल्ड कपमधून बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत माघार घेतली होती. मात्र, नेमबाजी स्पर्धेसाठी तिथल्या क्रीडा मंत्रालयाने अधिकृत सरकारी आदेश (GO) जारी केला आहे. ‘डेली सन’ या बांगलादेशी वृत्तपत्रानुसार, “नेमबाजी स्पर्धा ही एका सुरक्षित आणि इनडोअर (बंदिस्त) ठिकाणी होणार असल्याने तिथे कोणताही मोठा सुरक्षा धोका नाही,” असे बांगलादेश सरकारचे मत आहे. बांगलादेशचा टी२० विश्वचषक २०२६ वर बहिष्कार व्हिसा प्रक्रिया सुरू; हे नेमबाज येणार भारतात – नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (NRAI) सचिव राजीव भाटिया यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशची टीम येणार यात कोणतीही शंका नाही. २१ वर्षीय महिला नेमबाज अरेफिन शायरा आणि २६ वर्षीय ऑलिम्पियन मोहम्मद रोबिउल इस्लाम हे १० मीटर एअर रायफल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत भाग घेतील. यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या खेळाडूंना मंजुरी दिली असून दूतावासाकडून व्हिसाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हेही वाचा – New Zealand Record : भारताच्या भूमीवर न्यूझीलंडचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड! सायफर्ट-कॉनवेने गोलंदाजांना धुतलं चाहत्यांमध्ये संतापाची लाट – एकीकडे क्रिकेट वर्ल्ड कपमधून माघार घेतल्याने बांगलादेशी क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे, तर दुसरीकडे नेमबाजांना भारतात पाठवण्याच्या निर्णयामुळे सरकारच्या ‘सुरक्षा’ दाव्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.