AUS VS ENG : अॅशेस मालिकेतल्या पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व कायम राखत इंग्लडवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी दमदार आघाडी घेतली आहे. या सामन्यात मिचेल स्टार्कला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याने या सामन्यात 8 विकेट्स आणि 77 धावा करून संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. पहिल्या टेस्टमध्ये शरणागती पत्करल्यानंतर इंग्लंड संघावर जोरदार टीका झाली होती. त्या पराभवातून बोध घेत इंग्लंड खेळ सुधारेल असं वाटलं होतं पण पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लंडने सर्वसाधारण खेळ केला. या सामन्यात टॉस जिंकून इंग्लंडने बॅटिंगचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने ३३४ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात रूटने 12 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिलंवहिलं शतक झळकावलं. त्याने 15 चौकार आणि एका षटकारासह 138 धावांची खेळी केली. झॅक क्राऊलेने 76 धावा करत त्याला चांगली साथ दिली. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 6 विकेट्स घेतल्या. यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने 511 धावांचा डोंगर उभारला. जेक वेदराल्ड, मार्नस लबूशेन, स्टीव्हन स्मिथ, अलेक्स कॅरे, मिचेल स्टार्क यांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १७७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. इंग्लंडतर्फे ब्रायडन कार्सने 4 तर बेन स्टोक्सने 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातदेखील इंग्लडला काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार बेन स्टोक्सने 50 तर विल जॅक्सने 41 धावांची खेळी केली. आणि इंग्लडचा दुसरा डाव 241 धावांवर समाप्त झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 65 धावांचे लक्ष्य मिळाले. विजयासाठी मिळालेले लक्ष्य ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स गमावून साध्य केले आणि हा सामना आपल्या नावावर केला.