AUS vs ENG 5th Test : ऑस्ट्रेलियाचा कार्यवाहू कर्णधार स्टीव्ह स्मिथने अॅशेस २०२५-२६ मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावले. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात स्मिथ २०५ चेंडूत १२९ धावा करून नाबाद राहिला. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील ३७ वे शतक आणि अॅशेसमधील १३ वे शतक ठरले. याआधी ट्रॅव्हिस हेडने १६६ चेंडूत १६३ धावांची खेळी साकारली होती. या शतकासह स्मिथने फेब्रुवारी २०२५ नंतर पहिल्यांदा शतकी खेळी साकारली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स गमावून ५१८ धावा करत इंग्लंड विरुद्ध १३४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या बाजूला ब्यू वेबस्टर ४८ धावांवर नाबाद होता. राहुल द्रविडला मागे टाकले या शतकाने स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडले. त्याने भारताचा माजी दिग्गज राहुल द्रविड (३६ शतके) यांना मागे टाकत सर्वाधिक कसोटी शतकांच्या यादीत ६ वे स्थान पटकावले. स्मिथने हे ३७ वे शतक फक्त २१९ डावांत साकारले, जे सचिन तेंडुलकरपेक्षा (२२० डाव) जलद आहे. सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे फलंदाज ५१ – सचिन तेंडुलकर ४५ – जॅक कॅलिस ४१ – रिकी पाँटिंग ४१ – जो रूट ३८ – कुमार संगकारा ३७ – स्टीव्ह स्मिथ* ३६ – राहुल द्रविड WTC मधील सर्वाधिक शतके आणि धावा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात स्मिथने अनेक दिग्गजांना मागे टाकले. या शतकासह त्याने WTC मध्ये १४ शतके पूर्ण केली असून जो रूट (२३) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. WTC इतिहासात सर्वाधिक शतके जो रूट (इंग्लंड) – २३ स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – १४ केन विल्यमसन (न्यूझीलंड) – ११ ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) – ११ मार्नस लाबुशेन (ऑस्ट्रेलिया) – ११ शुभमन गिल (भारत) – १० हॅरी ब्रूक (इंग्लंड)- ९ रोहित शर्मा (भारत) – ९ WTC इतिहासात सर्वाधिक धावा जो रूट – सुमारे ६४७४ धावा स्टीव्ह स्मिथ – ४५२४+ धावा मार्नस लाबुशेन – ४४४७ धावा सामन्यातील स्थिती आणि इंग्लंडची निराशा तिसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने मॉर्निंग सेशनमध्ये शतक पूर्ण करत इंग्लंडच्या गोलंदाजांना त्रस्त केले. त्यानंतर स्मिथने संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेले. इंग्लंडने अनेक कॅच सोडले आणि रिव्ह्यू गमावले, ज्यामुळे त्यांची निराशा वाढली. ऑस्ट्रेलियाने आधीच मालिका ३-१ ने जिंकली असून, हा सामना जिंकून ४-१ अशी विजयी सांगता करण्याच्या मार्गावर आहे.