Black Magic on Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरातशी जोडण्याचा प्रयत्न केला. खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती आणि त्यानुसार अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही. मात्र अशा प्रकारच्या भोंदूगिरीमागील कलुषित हेतू दुर्लक्षित करता येणार नाही. अशोक खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा प्रकार केला? तसेच त्यामागचा हेतू काय होता, हे समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. सध्या तो नाशिक पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याविरुद्ध एकूण १० गुन्हे दाखल आहेत. यापैकी ८ गुन्हे लैंगिक शोषणाचे, तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. या प्रकरणामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. हेही वाचा – राज्यातील 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पहा संपूर्ण यादी कोणाची कुठे झाली बदली रोहित पवार यांनी अंधश्रद्धेच्या मुद्द्यावर भाष्य करताना डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, दाभोळकरांच्या महाराष्ट्रात जर अशा भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल, तर पुढच्या पिढीसमोर चुकीचा संदेश जात आहे. हे प्रकरण जितके भयावह आहे, तितकेच राज्याच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सकाळी रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप करत अशोक खरातला तुरुंगातच संपवण्याचा डाव रचला जात असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, अनेक मोठ्या नेत्यांपर्यंत धागेदोरे पोहोचत असल्याने खरातला आत्महत्या किंवा इतर कारण दाखवून संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, अजित पवार यांच्या अपघाताबाबत माहिती असलेल्या व्ही. के. सिंग यांना कोणत्याही परिस्थितीत वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे; मात्र सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेणे किंवा कुणाला वाचवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येते,” असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.