Amol Mitkari : राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघांमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लावण्यात आलेल्या पोस्टरवरून पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जात आहे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. रायगडमध्ये पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला सुनील तटकरे यांच्यासह मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात स्टेजवर लावलेल्या पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचेच फोटो होते. मात्र दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याचे दिसले. यावरून मिटकरी म्हणाले, ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जात आहे, हे सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणीही प्रयत्न करु नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असे मिटकरी यांनी नाव न घेता सुनिल तटकरे यांना टोला लगावला आहे. दरम्यान, या कार्यक्रमावरून तटकरे कुटुंबियांवर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.