Akot Pattern | भाजपने अकोटमध्ये सत्तेसाठी आपली तत्व बाजूला ठेवून एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. यावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एमआयएमसोबत युतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपाची युती कधीच होऊ शकत नाही, हा प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असे फडणविसांनी स्थानिक नेत्यांना सुनावले. तसेच संबधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. यानंतर आता थेट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना नोटीस बजावली आहे. नोटिसमध्ये म्हटले की, “नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये आपण अकोट नगरपरिषदेत AIMIM सोबत युती करून भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला आहे. तसेच हे करत असताना कोणालाही विश्वासात न घेता आपल्या या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत आपण तातडीने खुलासा करावा,” असं प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बजावले आहे. अकोटमध्ये नेमकं काय घडलं? अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांवर निवडणुका पार पडल्या. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून, भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदही पटकावले आहे. मात्र, सभागृहात स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यानंतर भाजपने सर्वसमावेशक अकोट विकास मंच आघाडी तयार केली आहे. यात भाजपसोबत एमआयएमच्या ५, प्रहारच्या ३, ठाकरे गटाच्या २ शिंदे गटाच्या १, अजित पवार गटाच्या २ शरद पवार गटाच्या २ सदस्यांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे ६ आणि वंचित बहुजन आघाडीचे २ सदस्य आता विरोधी बाकावर बसणार आहेत. या सर्व पक्षांना एकत्र आणल्यामुळे सत्ताधारी गटाची सदस्य संख्या आता २५ वर पोहोचली आहे. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, भाजपचे आमदार रवी ठाकूर यांची या आघाडीचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. तर अंबरनाथमध्येही भाजपने स्थानिक समीकरणे जुळवत काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. यावरून देखील भाजपवर टीका केली जात आहे. हेही वाचा: “पुणेकरांना आता ‘जुना कारभारी’ नको, ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी २० वर्ष का लागली?”, ; वाचा यासारख्या टॉप १० बातम्या