पुणे : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा झटका बसला आहे. दलित मतदारांना (Ajit Pawar)आकर्षित करण्याच्या उद्देशाने आरपीआय (खरात गट) सोबत केलेली युती आता धोक्यात आली आहे. आरपीआय (खरात गट)चे प्रमुख सचिन खरात यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतून तडकाफडकी माघार घेतली आहे. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या पाठिंब्याला नकार दिला आहे. यामुळे अजित पवारांच्या निवडणूक रणनीतीचे गणित बिघडले असून, दलित मतांच्या बाबतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवडसह एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होत आहेत. मतदानाच्या तारखा अगदी जवळ येत असताना प्रचाराला जोरदार वेग आला आहे. राज्यातील प्रमुख नेते सभा घेऊन प्रचार करत आहेत आणि सर्वच पक्ष या महत्त्वाच्या महापालिका जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहेत. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांवर अजित पवार यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, आता सचिन खरात यांच्या निर्णयामुळे त्यांच्या योजना धोक्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी दलित मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आरपीआय (खरात गट) सोबत युती केली होती. या युतीअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरात गटाला काही जागा देण्यात आल्या होत्या. यातून दलित समाजातील मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती आखली गेली होती. मात्र, आता सचिन खरात यांनीच निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने अजित पवारांसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. या माघारीमुळे खरात गटाच्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार कसे ठेवणार आणि दलित मतदारांचा कल काय राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सचिन खरात यांनी आपली भूमिका एका व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. त्यात ते म्हणतात, “मला सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, त्या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पक्षाला तसेच कोणत्याही उमेदवाराला माझा पाठिंबा नाही.” खरात यांच्या या विधानामुळे युतीतील नाराजी उघड झाली आहे. यापूर्वी युती जाहीर झाल्यानंतरही काही जागांवरून वाद निर्माण झाल्याचे बोलले जात होते. या घडामोडीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शरद पवार गटाची एकत्रित आघाडी असतानाही दलित मतांच्या विभागणीचा फटका बसू शकतो. प्रचार शिगेला पोहोचलेला असताना हा धक्का बसल्याने अजित पवार आता नेमकी काय रणनीती आखणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणुकीच्या निकालावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.