Ajit Pawar : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत पिंपरी-चिंचवड शहर विशेष चर्चेत आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख नेते प्रचारसभांसाठी धडपडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जोरदार भाषण केले. शहराच्या विकासासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करतानाच त्यांनी भाजपवर तीव्र हल्लाबोल केला. विशेष म्हणजे, खासदार शरद पवार यांचा उल्लेख करत त्यांनी केलेल्या विधानाची राज्यभर चर्चा आहे. अजित पवार म्हणाले, “माझी जन्मभूमी बारामती असली तरी पिंपरी-चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. ही गोष्ट मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही.अनेकांना मी पदे दिली. पद देणे आपल्या हातात असते, पण शेवटी माणसाने माणुसकी जपायची की सोडायची, हे त्याच्याच हातात असते.” अनेक जण सोडून निघून गेले, माणसे येतात-जातात त्याची मला फिकीर नाही. माझ्या माय-माऊली (जनता) माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मी कुणाच्या बाला घाबरत नाही, असे ठणकावून सांगितले. भाजपच्या कारभारावर बोट ठेवत अजित पवार म्हणाले, “मी पिंपरी-चिंचवडचा विकास केला, पण कधी कर्ज काढले नाही. आता मात्र महापालिका कर्जबाजारी झाली आहे. त्यांनी ४० हजार कोटींची कामे केल्याचा दावा करतात, मग ती कामे कुठे केली? हा पैसा कुठे गेला? याचा जाब विचारायला हवा का नाही?” महेश लांडगे यांना मी स्थायी समिती अध्यक्ष केले, त्यातून त्यांनी जे करायचे ते केले. पण नंतर विधानसभेला आपल्याच विलास लांडे यांच्या विरोधात बंडखोरी केली. आता शहरात दादागिरी कोणाची चालली आहे? रिंग कोणाची सुरू आहे? भ्रष्टाचार कोण करतोय? वरिष्ठ नेते इतर कामांत व्यग्र असल्याने त्यांचे याकडे लक्ष नसेल, पण मी पालकमंत्री आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत. कोयता गँग दहशत पसरवतेय, गाड्या फोडतेय. ज्यांची गाडी फोडली, त्यांच्या आई-वडिलांनी किती कष्टाने ती घेतलेली असेल! आम्ही सत्तेत आलो तर गुन्हेगारांचा बंदोबस्त करू,” असे आश्वासन दिले. सभेच्या शेवटी शरद पवार यांच्याबाबत बोलताना अजित पवार भावुक झाले. ते म्हणाले, “काकांच्या पुण्याईने माझं लय बरं चाललंय. गळ्या शपथ सांगतो!” मतदानाच्या आदल्या दिवशी प्रलोभने दाखवली जातील. कोणाकडून जास्त मिळाले तर घ्या (काय घ्या हे मी सांगितले नाही), पण संधी मात्र आम्हालाच द्या, असे थेट आवाहन त्यांनी मतदारांना केले. अजित पवारांच्या या भाषणाने पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, निवडणुकीच्या तोंडावर हे विधान चर्चेचा विषय ठरले आहे. प्रचार शिगेला पोहोचलेल्या या निवडणुकीत मतदार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.