Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर (२८ जानेवारी) त्यांच्या जवळच्या सहकारी आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी सवांद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजितदादांच्या शेवटच्या काही दिवसांतील मानसिक अवस्था आणि राजकीय जीवनातील संघर्षांबद्दल भावुक आठवणी सांगितल्या. अपघाताच्या पाच दिवस आधीच अजित पवार यांनी किरण गुजर यांच्याशी मन मोकळं केलं होतं, ज्यात त्यांनी राजकारणातील थकवा आणि निराशेची भावना व्यक्त केली होती. किरण गुजर यांनी सांगितले की, “अजितदादा मला म्हणाले, ‘कंटाळा आलाय, आपण दोघे बाहेर जाऊया.’ आम्ही अर्धा दिवस बाहेर फिरलो, जेवलो. ते माझं त्यांच्यासोबतचं शेवटचं जेवण ठरलं. त्यावेळी ते म्हणाले, ‘मला आता नको वाटतंय. बास वाटतंय आता मला. या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय.’ गुजर यांनी पुढे म्हटले की, अलीकडे अजित पवारांचं मन विचलित झालं होतं. ते म्हणायचे, “मी एवढं मरमर काम करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, तरी माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय? असं गुजर यांनी सांगितले. राजकीय अपयश आणि टीकेचा ताण नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतरही अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी नव्या जोमाने कामाला लागले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील पराभव, बारामतीत होणारी टीका आणि राजकीय आरोप यामुळे त्यांच्यावर मानसिक दबाव होता. गुजर यांनी सांगितले, “लोक असे वागतात, बारामतीमध्ये माझ्यावर टीका का केली जाते? मी कोणाचं वाईट केलंय?” असे ते विचारायचे. विधानसभा निवडणुकीत उभे राहायला ते तयार नव्हते, पण मीच त्यांना तयार केलं. राजकीय प्रवासाची सुरुवात किरण गुजर यांनी अजित पवारांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात आठवली. १९८४ साली छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार उभे राहिले, ज्यात गुजर यांनी त्यांचं मन वळवलं. त्यावेळी अजित पवार राजकारणात यायला तयार नव्हते. ajit pawar plane crash ते म्हणायचे, “मला माझा प्रपंच बघायचा आहे.” पण बारामतीकरांसाठी ते राजकारणात आले. सुरुवातीला ते मंदिरात जायचे नाहीत, देवाबद्दल वेगळे विचार होते. “देवाने माझं काय केलंय? लहानपणी वडील गेले,” असे ते म्हणायचे. पण हळूहळू अनुभवाने आणि वयामुळे त्यांच्यात बदल झाला. त्यांची देवावर श्रद्धा होती, पण अंधश्रद्धा नव्हती आणि राजकारणासाठी त्याचा वापर कधी केला नाही, असे गुजर यांनी सांगितले. अपघाताच्या क्षणाची आठवण अजित पवार विमानात बसण्यापूर्वी गुजर यांना फोन केला होता. “मी विमानात बसतोय,” असे सांगितलं. गुजर विमानतळावर घ्यायला गेले होते. “माझ्या डोळ्यांसमोरच विमान कोसळलं. मृतदेह गाडीत घालताना मी ओळखलं हे दादा आहेत. आपल्याला वाईट स्वप्न पडलंय असं वाटत होतं, पण ही घटना खरी ठरली. आजही विश्वास बसत नाही,” असे गुजर यांनी भावुक होऊन सांगितले. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, बारामतीसह संपूर्ण राज्य शोकमग्न आहे. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी आज (२९ जानेवारी) सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात कार्यक्रम होणार आहे.