Ajit Pawar : एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत जोरदार भाषण केले. या सभेत त्यांनी पक्षातील नाराजी, प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सत्ताधारी नेत्यांवर तीव्र टीका केली. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी अलीकडे पक्षाचा राजीनामा दिला आहे. याचा उल्लेख करत ओवैसी म्हणाले, “सोलापूरात पक्षात कोणी नाराज असेल तर मी त्याच्या घरी जाईन. मी फारूक शाब्दी यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. जोपर्यंत मी त्यांच्या कुटुंबातील लोकांशी बोलत नाही, तोपर्यंत राजीनामा स्वीकारणार नाही.” एमआयएमला ‘सोडचिट्टी’ देणाऱ्या शाब्दी यांचा थेट उल्लेख करत ओवैसी पुढे म्हणाले, “७९० मतं घेतलेला मला धमकावतो काय? मी शुक्रवारची नमाज तुझ्या गल्लीत येऊन पढतो,” असे आव्हान देत त्यांना इशाराही दिला. “तुझ्या घरातील लोक एमआयएमलाच मतं टाकतील, त्यामुळे मस्ती करू नको,” असेही ते म्हणाले. ओवैसींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “गुजरातमध्ये पेट्रोल ९७ रुपये तर सोलापूरात १०४ रुपये आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची कोणासाठी सेटिंग सुरू आहे? महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर थोडे कमी करा.” अजित पवारांच्या जुन्या वादग्रस्त विधानाचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, “अजित पवार म्हणाले होते ‘धरणात मुतू का?’ सोलापूरला आलेला निधी कुठे गेला? सोलापूरात मन्सूरी कुटुंबातील १० लोक जळून मेले. शहरात ८ दिवसांतून एकदा पाणी येते, तरी मोदी म्हणतात ‘नल से जल, जल से नल’.” सोलापूरातील महिलांचे कौतुक करत ओवैसी म्हणाले, “या शहरातील महिला पहाटे २ वाजता पाणी भरण्यासाठी उठतात, मी त्यांचे अभिनंदन करतो. महापालिकेचे १३०० कोटी रुपयांचे बजेट आहे, मग पैसे कुठे जातात?” अजित पवारांना मत देणे म्हणजे मोदींनाच मत देणे असल्याचे सांगत ते म्हणाले, “अजित पवारांना वोट म्हणजे मोदींना वोट. तुम्ही अजित पवारांना मतं देणार का? त्या दोन नंबर धंदे करणाऱ्या (तौफिक शेख) ला वोट देणार का?” यावेळी ओवैसींनी अजित पवारांना थेट आव्हान देत म्हटले, “असले ५६ अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं ‘तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे कर’ असं सुरू आहे. मात्र मुंबईत हे तिघे एकत्र येऊन मलई खातात. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार भाजपविरोधात बोलले आणि संध्याकाळी फोन आला की लगेच नरमले. माझं नाव असदुद्दीन ओवैसी आहे!” पुढे ते म्हणाले, “संसदेत वक्फ बोर्ड कायद्याला अजित पवारांनी पाठिंबा दिला होता. भाजप सत्तेत आल्यापासून देशात मॉब लिंचिंग वाढले आहे. एका बीएसएफ जवानाच्या मुलाला ‘पिंकी पिंकी’ म्हणून मारले गेले. अशा अनेक घटनांवर अजित पवार काही बोलले का? डोनाल्ड ट्रम्प मोदींवर बोलतात, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार ट्रम्पविरोधात बोलत नाहीत.” आंदोलनातील जुन्या आठवणी सांगत ओवैसी भावुक झाले. ते म्हणाले, “आंदोलनात माझ्यावर लाठीचार्ज झाला, माझी ४ बोटं तुटली, डोक्यात १८ टाके पडले आणि मणक्यात गॅप पडला. त्यावेळी माझ्या वडिलांनी बंद पुकारला नाही. मी असलो तरी नसलो तरी तुम्ही एमआयएमलाच मतदान करणार का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन देखील केले.