लखनऊ | उत्तर प्रदेशात ‘विशेष गहन पुनरीक्षण मोहिमे’नंतर (SIR) निवडणूक आयोगाने सोमवारी मतदार यादीचा मसुदा (Draft List) अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. या प्रक्रियेत राज्याच्या मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली असून, यात प्रामुख्याने मृत, स्थलांतरित आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांचा समावेश आहे. आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांना या यादीची प्रत सोपवली असून, ही यादी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादी पुनरीक्षणाची ही प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली होती. ४ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष गणना टप्प्याला सुरुवात झाली, ज्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मतदार यादी ‘फ्रीज’ करण्यात आली होती. घरभेटी देऊन गणना फॉर्म वितरित करण्याची प्रक्रिया २६ डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण झाली. पुनरीक्षण प्रक्रियेपूर्वी उत्तर प्रदेशात एकूण १५ कोटी ३० लाख मतदार होते. त्यापैकी १२ कोटी ५५ लाख ५६ हजार २८ मतदारांकडून (८१.३० टक्के) भरलेले फॉर्म प्राप्त झाले. मात्र, उर्वरित १८.७० टक्के मतदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मतदार वगळण्याची प्रमुख कारणे: मृत मतदार: ४६.२३ लाख (२.९९ टक्के) स्थलांतरित/गैरहजर/बेपत्ता: २.१७ कोटी (१४.०६ टक्के) दुबार नोंदणी: २५.४७ लाख (१.६५ टक्के) १५ हजार नवीन मतदान केंद्रांची निर्मिती – मतदारांच्या सुविधेसाठी आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता एका मतदान केंद्रावर १,२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत. या नवीन नियमामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात १५,०३० नवीन मतदान केंद्रे (बूथ) वाढवण्यात आली आहेत. ६ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी – ज्या मतदारांना अद्याप फॉर्म जमा करता आले नाहीत किंवा ज्यांची नावे तांत्रिक कारणास्तव वगळली गेली आहेत, त्यांच्यासाठी आयोगाने ६ जानेवारी २०२६ ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हरकती व दावे दाखल करण्याची संधी दिली आहे. नागरिक आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर किंवा ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. ज्या मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी आढळली आहेत, त्यांची नावे केवळ एकाच ठिकाणी कायम ठेवली जातील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.