Sanjay Raut : “अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शाह यांच्या हातात गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याही हातात राहिलेली नाहीत, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सगळं काही अमित शाह यांच्या इच्छेनुसारच होईल. प्रफुल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहच बोलत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होणार नाही. त्याऐवजी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन होईल, राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे मोठं वक्तव्य देखील संजय राऊत केले आहे. प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा विमान अपघात घातपात असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत विमान अपघाताचा सविस्तर तपशील सांगितला होता. अजित पवार यांचा ताफा बारामतीकडे येण्यासाठी सज्ज होता. मात्र, अचानक एका बड्या नेत्याची भेट झाली आणि अजितदादांनी प्रवासाचा निर्णय बदलला असे रोहित पवार म्हणाले होते. विमान अपघाताबाबत पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी अनेक गोष्टींचा दाखला दिला होता. Sanjay Raut विमान अपघातानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूविषयी पवार कुटुंबातून हल्ले होत आहेत. रोहित पवार यांनी पुरावे समोर आणले आहेत. त्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पुराव्यातून प्रत्युत्तर द्यावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा तोंडे फुटली आहेत. अजित पवार हा एकखांबी तंबू होता. तो कोसळून पडल्यानंतर या तंबूतील उंट, खोडे, बैल यांची धावाधाव सुरु आहे, अशी घणाघाती टीकाही राऊतांनी केली आहे. संजय राऊतांचा दावा विमान अपघाताचा तपास पूर्णपणे होणार नाही, त्यामधून काही निष्कर्ष समोर येणार नाही, असा मोठा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या कंपनीत अदृश्य हात आहेत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. हेही वाचा : Pulwama Terror Attack: “जवानांच्या या त्यागामुळेच देश सुरक्षित…”; पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांसाठी PM मोदींची पोस्ट