पणजी : गोव्यात आम आदमी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून माजी प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, प्रभारी अध्यक्ष श्रीकृष्ण परब, युवा शाखा अध्यक्ष रोहन नाईक तसेच उपाध्यक्ष चेतन कामत व सरफराज यांनी सोमवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जिल्हा परिषद निवडणुकीतील नामुष्कीजनक पराभवानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला. २० डिसेंबरच्या निवडणुकीत ‘आप’ला ४२ पैकी केवळ १ जागा मिळाली होती. या अपयशानंतर पालेकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते, तर परब यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद देण्यात आले. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले की, समर्थकांना माझ्या राजकारणात स्पष्टता हवी होती. चार वर्षांचा आप सोबतचा प्रवास संपला असून याबाबतची कोणतीही खंत मनात नसल्याचे पालेकर यांनी स्पष्ट केले. पालेकरांच्या बरोबरीने प्राभारी अध्यक्ष असलेल्या श्रीकृष्ण परब यांनी पालेकर यांना हटवण्याच्या पद्धतीवरुन टीका करताना, वरिष्ठांचा निषेध म्हणून राजीनामा दिला असल्याचे नमूद केले. सन २०२२ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या पालेकरांच्या एक्झिटमुळे गोव्यातील ‘आप’ संघटनात्मक दृष्टीकोनातून संकटात सापडल्याचे चित्र सध्या गोव्यात दिसून येत आहे.