Aadhaar Card Updates : नागरिकांना आता ठिकठिकाणी आधार कार्डची फोटोकॉपी देण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लवकरच आधार व्हेरिफिकेशनसाठी नवा नियम लागू करणार आहे, ज्यामुळे हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर यांसारख्या संस्थांकडून ग्राहकांच्या आधार कार्डची छायांकित प्रत कागदी स्वरूपात साठवून ठेवण्याच्या प्रथेला पूर्णविराम मिळेल. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) भुवनेश कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, प्राधिकरणाने नवा नियम मंजूर केला आहे. यानुसार, हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर इत्यादी संस्थांना आधार-आधारित व्हेरिफिकेशनसाठी ‘रजिस्ट्रेशन’ करणे अनिवार्य असेल. नोंदणीकृत संस्थांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामुळे ते क्यूआर कोड स्कॅन करून किंवा आधारच्या नवीन ॲपद्वारे व्हेरिफिकेशन करू शकतील. आतापर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करताना किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमात नाव नोंदवताना आधार कार्डची झेराॅक्स देत असाल. UIDAI (आधार बनवणारी संस्था) म्हणते की, असे कागदपत्रे घेणे आणि ती साठवून ठेवणे चुकीचे आहे आणि त्यामुळे तुमच्या खाजगी माहितीला धोका असतो. म्हणूनच, UIDAI लवकरच एक नवीन नियम आणणार आहे. नवीन नियमायामुळे काय बदलेल? झेराॅक्सची गरज नाही: आता हॉटेल, इव्हेंट कंपन्या किंवा इतर संस्थांना तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी मागता येणार नाही आणि त्यांना ती कागदी रूपात ठेवावी लागणार नाही. डिजिटल व्हेरिफिकेशन: व्हेरिफिकेशन (तुमची ओळख पटवणे) आता डिजिटल पद्धतीने होईल. म्हणजे कागदपत्रांशिवाय. व्हेरिफिकेशन कसे होईल? या संस्थांना आता UIDAI कडून नवीन तंत्रज्ञान मिळेल, जसे की, क्यूआर कोड स्कॅन. समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात. रिसेप्शनिस्ट तुमच्या आधार कार्डचा क्यूआर कोड स्कॅन करेल किंवा तुमचा आधार क्रमांक एका नवीन ॲपमध्ये टाकेल. एक नवीन ॲप येईल, ज्यामुळे थेट एका ॲपमधून दुसऱ्या ॲपमध्ये तुमची ओळख सुरक्षितपणे तपासली जाईल (सेंट्रल डेटाबेसशी न जोडता). आतापर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करताना हॉटेल तुमच्या आधारची फोटोकॉपी घेते आणि ती फाइलमध्ये साठवते. नवीन पद्धतीत तुम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करताना हॉटेल आधार ॲप/क्यूआर स्कॅनर वापरून तुमची ओळख काही सेकंदात ऑनलाइन (डिजिटल पद्धतीने) तपासेल. तुम्ही कोण आहात हे लगेच सिद्ध होईल, पण हॉटेलला तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी साठवावी लागणार नाही. याचा तुम्हाला काय फायदा? गोपनीयता सुरक्षित: तुमच्या आधार कार्डची माहिती लीक होणार नाही किंवा त्याचा गैरवापर होण्याचा धोका कमी होईल. व्हेरिफिकेशनची प्रक्रिया जलद आणि पेपरलेस (कागदविरहित) होईल. थोडक्यात, तुमचा आधार क्रमांक गोपनीय राहील आणि तुम्हाला कोणत्याही संस्थेकडे त्याची फोटोकॉपी देण्याची गरज पडणार नाही.