मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या ‘१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल’ या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. “चव्हाणांनी अशा प्रकारचे विचार करून स्वत:ला त्रास करून घेऊ नये,” असा खोचक सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर थेट प्रतिक्रिया दिली. ‘काळं-बेरं नक्कीच असेल’ फडणवीस म्हणाले, “आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होते, ते भविष्यवाणी करत होते. हे सर्व आम्ही पाहिलेलं आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे जेष्ठ नेते, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, मंत्री राहिले आहेत, त्यांनाही अशा प्रकारे साक्षात्कार व्हायला लागले तर मला वाटतं की नक्कीच काहीतरी काळंबेरं असेल.” फडणवीस यांनी पुढे म्हटले, “पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय चांगले नेते आहेत. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण त्यांनी अशा प्रकारचा विचार करून स्वत:ला फार त्रास करून घेऊ नये असा माझा त्यांना सल्ला आहे.” चव्हाणांचा नेमका दावा काय होता? पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच एका कार्यक्रमात “येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल,” असे भाकीत केले होते. याबद्दल स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले होते, “मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर आत्ता त्या पदावर असलेल्या व्यक्तीला बाजूला गेलं पाहिजे. बदल घडण्याची शक्यता मला दिसते. बदल घडला तर भाजपचाच पंतप्रधान होईल पण कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता.” या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, फडणवीस यांच्या प्रतिक्रियेने त्यात आणखी भर पडली आहे.