अमरावती: अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या २२ पराभूत उमेदवारांनी माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्याविरुद्ध थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली असून, त्यांना पक्षातून तातडीने निष्कासित करण्याची मागणी केली आहे. “नवनीत राणांना बाहेरचा रस्ता दाखवला नाही, तर त्या भविष्यात शहरातून भाजपचा नायनाट करतील,” असा गंभीर इशारा या उमेदवारांनी पत्राद्वारे दिला आहे. ‘आमचा पराभव जनतेने नाही, राणांनीच केला’ अमरावती महापालिकेत भाजप २५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, मागील ४५ जागांच्या तुलनेत पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे. या पराभवाचे खापर उमेदवारांनी नवनीत राणा यांच्यावर फोडले आहे. “आम्ही भाजपचे निष्ठावंत आणि कष्टाळू उमेदवार होतो, पण आमचा पराभव विरोधी पक्षांनी नाही तर नवनीत राणा यांनीच केला आहे. त्यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी केली आहे,” असा खळबळजनक आरोप पत्रात करण्यात आला आहे. मतदानाच्या पाच दिवस आधी ‘गेम’ पालटला? पराभूत उमेदवारांनी पत्रात राणा यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. मतदानाला केवळ ५ दिवस शिल्लक असताना नवनीत राणा यांनी भाजप उमेदवारांविरोधात प्रचार केला. भाजपचे उमेदवार ‘डमी’ आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या ‘युवा स्वाभिमान’ पक्षाचे उमेदवार हेच खरे भाजपचे उमेदवार आहेत, असा संभ्रम त्यांनी मतदारांमध्ये पसरवल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे. भाजपचा गड असलेल्या प्रभागांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करून भाजपच्या अधिकृत पॅनेलचे नुकसान केल्याचेही पत्रात म्हटले आहे. शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवण्यात आली आणि पोस्टर्सवर स्वतःचे मोठे फोटो लावण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सत्तेचे गणित आणि पेच – ८७ जागांच्या महापालिकेत भाजपला सत्ता स्थापनेसाठी ४५ या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. सध्या भाजप (२५ जागा) सर्वात मोठा पक्ष असला तरी, बहुमतासाठी त्यांना नवनीत राणा यांच्या ‘युवा स्वाभिमान’ (१५ जागा) किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. एकीकडे सत्तेसाठी युवा स्वाभिमानची साथ हवी असताना, दुसरीकडे स्वतःच्याच उमेदवारांनी राणांविरुद्ध बंड पुकारल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता या तक्रारीवर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात आणि अमरावतीच्या राजकारणाला कोणती नवी कलाटणी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.