PM-KISAN Yojana: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (पीएम-किसान)PM-KISAN Yojana योजनेचा २२वा हप्ता येत्या १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी आसाम दौऱ्यावर असतील आणि गुवाहाटी किंवा कोकराझार येथून सायंकाळी ५ च्या सुमारास रिमोट बटण दाबून हा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे. यापूर्वीही पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांदरम्यान असे हप्ते जाहीर करत आले आहेत. हप्ता उशिरा का आला? PM-KISAN Yojana २१वा हप्ता नोव्हेंबर २०२५ मध्ये आला होता. साधारणपणे दर चार महिन्यांनी हप्ता येतो, त्यामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये २२वा हप्ता येण्याची अपेक्षा होती. यंदा होळीपूर्वी पैसे येतील अशी आशा होती, मात्र सरकारने होळीनंतर म्हणजे १३ मार्चला हप्ता जारी करण्याचा निर्णय घेतला. पीएम-किसान योजना म्हणजे काय? PM-KISAN Yojana ही योजना २०१९ मध्ये लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली. केंद्र सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना एकूण ६,००० रुपये देते. ही रक्कम तीन समान हप्त्यांत, म्हणजे प्रत्येकी २,००० रुपये, थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यात कोणताही दलाल किंवा मध्यस्थ नसतो. आजमितीस ही योजना देशातील सर्वात मोठ्या शेतकरी मदत कार्यक्रमांपैकी एक बनली असून लाखो कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे. कोणाला मिळणार नाही हप्ता? PM Kisan Yojana प्रत्येक हप्त्यापूर्वी सरकार लाभार्थ्यांची यादी तपासते व अद्ययावत करते. खालील कारणांमुळे हप्ता अडू शकतो, ई-केवायसी पूर्ण न केल्यास, फार्मर आयडी किंवा आधार लिंक नसल्यास, जमिनीचे रेकॉर्ड पडताळणी न झाल्यास, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा दरमहा १०,००० रुपयांपेक्षा अधिक पेन्शन घेत असल्यास, अथवा शेतकरी किंवा कुटुंबातील सदस्य प्राप्तिकर भरत असल्यास. स्थिती कशी तपासाल? शेतकऱ्यांनी तातडीने pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी, जमिनीचे रेकॉर्ड तपासावे आणि आपली स्थिती (Status) पाहावी. संकेतस्थळावर eMitra चॅटबॉटची मदतही घेता येते. लाभार्थी यादी तपासण्यासाठी संकेतस्थळावर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून सबमिट करावे. नाव यादीत असल्यास आणि सर्व माहिती पडताळणी झाल्यास हप्ता आपोआप खात्यात जमा होईल.