Telangana – तेलंगणा पोलिसांनी रंगारेड्डी जिल्ह्यातील याचराम गावातील ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १०० भटक्या कुत्र्यांच्या कथित हत्येत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. स्टे अॅनिमल फाउंडेशनच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गावाचे सरपंच, वॉर्ड सदस्य आणि पंचायत सचिवांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्ट्रे अॅनिमल फाउंडेशन ऑफ इंडियाच्या एका प्राणी कल्याण कार्यकर्त्याने याचराम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये १९ जानेवारी रोजी कुत्र्यांना काही विषारी पदार्थ टोचण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मंगळवारी याचराम ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव आणि वॉर्ड सदस्यांविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि बीएनएस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या मते, १०० कुत्रे मारले गेले, परंतु प्राथमिक तपास आणि ग्रामस्थांच्या चौकशीत फक्त ५० कुत्रे मारले गेल्याचे पुष्टी झाली. अधिकाऱ्याच्या मते, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मारल्या गेलेल्या कुत्र्यांचे अवशेष शोधण्यासाठी तपास सुरू आहे. यापूर्वीही मारली कुत्री… यापूर्वी, हनमकोंडा जिल्ह्यातील पोलिसांनी श्यामपेट आणि अरेपल्ली गावात किमान ३०० भटक्या कुत्र्यांच्या कथित हत्येप्रकरणी गावातील दोन महिला सरपंच आणि त्यांच्या पतींसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच, कामारेड्डी जिल्ह्यात, पोलिसांनी सुमारे २०० भटक्या कुत्र्यांना मारल्याच्या आरोपाखाली पाच गावातील सरपंचांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचांसह काही निवडून आलेल्या प्रतिनिधींनी गावकऱ्यांना भटक्या कुत्र्यांच्या धोक्याचा सामना करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी ते वचन पूर्ण करण्यासाठी या हत्या केल्याचा आरोप आहे.