मॅरेथॉनमुळे उद्या साताऱ्यातील वाहतुकीत बदल

कासकडून येणाऱ्या वाहनांना सकाळी अकरापर्यंत बंदी
सातारा  –
सातारा शहरात रविवार दि. 25 रोजी हिल हाफ मॅरेथॉन होणार असल्याने शहरातील अंतर्गत वाहतुकीत सात तासांसाठी बदल केल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनी विठ्ठल शेलार यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि. 25 रोजी पहाटे चार ते सकाळी अकरा वाजेपर्यंत सातारा शहरामध्ये हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन पोलीस परेड ग्राऊंड-कालीदास पंप-शिवाजी सर्कल-पोलीस मुख्यालया मार्गे शेटे चौक-कमानी हौद-मोती चौक-गोलबाग-समर्थ मंदिर-बोगदा-हॉटेल निवांत-प्रकृती हिल रिसॉर्ट-गणेश खिंड अशी जाणार असून परत येताना याच मार्गाचा वापर केला जाणार आहे.

त्याच मार्गाने परत येऊन टोपेमामा दत्त मंदिर-गुरुवार बाग-शाहू चौक-वाहतूक शाखा-सावंत कॉर्नर-गीते बिल्डिंग-शिवाजी सर्कल ते पोलीस परेड ग्राऊंड येथे स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. या स्पर्धेत सुमारे आठ हजार स्पर्धक सहभागी होणार असून त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता नागरिकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. स्पर्धक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीचे नियमन व वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था गरजेची असल्याने दि. 25 रोजी पहाटे चारपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरातील अंतर्गत वाहतुकीत व पार्किंग व्यवस्थेत बदल केले आहेत.

जुना आरटीओ चौक-पोलीस परेड ग्राऊंड-शिवाजी सर्कल-आर. के. बॅटरी-शेटे चौक-कमानी हौद-मोती चौक-गोलबाग-समर्थ मंदिर-बोगदा-हॉटेल निवांत-प्रकृती हिल रिसोर्ट -गणेश खिंड आणि टोपेमामा दत्त मंदिर-गुरुवार बाग-शाहू चौक-वाहतूक शाखा-सावंत कॉर्नर-गीते बिल्डिंग-शिवाजी सर्कल हा मार्ग रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने वगळून सर्व वाहनांसाठी बंद राहील. शेटे चौक ते मोती चौक, मोती चौक ते राधिका टॉकिज चौक ते राधिका सिग्नल- एसटी स्टॅंडकडून भूविकास बॅंकेकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील.

शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे पोवई नाका बाजूकडे येणारी वाहने बॉम्बे रेस्टॉरन्ट चौक-वाढे फाटा-भूविकास बॅंकमार्गे सातारा शहरात ये-जा करतील. बॉम्बे रेस्टॉरंन्ट चौकातून पोवई नाक्‍याकडे येणारी वाहने वाढे फाटा-भूविकास बॅंकमार्गे सातारा शहरात ये-जा करतील.

मुख्य बसस्थानक-राधिका सिग्नल-तहसील कार्यालयमार्गे राष्ट्रीय महामार्गकडे जाणारी वाहने भूविकास बॅंक-जुना आरटीओ चौक-जरंडेश्‍वर नाका-वाढे फाटामार्गे शहराच्या बाहेर जातील. सज्जनगड, ठोसेघर, परळीकडून येणारी व जाणारी वाहने भूविकास बॅंक-जुना आरटीओ चौक-जरंडेश्‍वर नाका-वाढे फाटा-शेंद्रेमार्गे ये-जा करतील. कासकडून शहरात येणारी वाहने मॅरेथॉन संपेपर्यंत सातारा बाजूकडे येणार नाहीत किंवा पर्यायी मार्गाने शहराकडे येतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×