दहा दिवसांची पोलीस कोठडी : कराडमध्ये तणाव कायम
कराड – तीन गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन दीपक सोळवंडे याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. पवनचा खून हा खंडणी प्रकरणामुळे नव्हे तर वर्चस्ववादातूनच झाल्याचे आज गुरुवारी उघड झाले. खूनप्रकरणी अटक केलेल्यांना गुरूवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश आवटी यांनी आठही जणांना दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुनेद फारूख शेख (वय 30 रा. शिवाजीनगर, मलकापूर ता. कराड), समीर इस्माईल मुजावर (वय 30 रा. सर्वोदय कॉलनी, आगाशिवनगर, ता. कराड), शिवराज सुरेश इंगवले (वय 24 रा. लाहोटीनगर, मलकापूर ता. कराड), अल्ताफ राजेखान पठाण (वय 50 रा. मंगळवारपेठ, कराड), निहाल अल्ताफ पठाण (वय 24 रा. मंगळवारपेठ, कराड), मजहर बद्रुद्दीन पिरजादे (वय 28 रा. अयोध्यानगर, बिरोबा मंदिराचे पाठीमागे, मलकापूर), हैदर महिबूब मुल्ला (वय 26 रा. मुजावर कॉलनी, शनिवारपेठ, कराड), पितांबर ऊर्फ पप्पू विश्वास काटे (वय 26 रा. बैलबाजार रोड, मलकापूर ता. कराड) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयात वकीलांनी सोळवंडेच्या खुनात
हल्लेखोरांनी खुनाचा कट कोठे रचला, पिस्तुले कोठून आणली, खुनामागे आणखी काय कारण आहेत का? याबाबत युक्तीवाद केला. तसेच त्यांना 14 दिवस पोलीस कोठडी देण्याचे आवाहन केले. मात्र न्यायालयाने दहा दिवसाची कोठडी सुनावली. संशयितांना न्यायालयात आणताना त्यांच्यावर हल्ला होऊ नये, यासाठी पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून न्यायालयाच्या आवारात डमी आरोपींना एका गेटमधून तर खऱ्या आरोपींना दुसऱ्या गेटमधून कोर्टात हजर केले. यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पवन सोळवंडे याचा मंगळवारी मध्यरात्री गोळ्या झाडून खून झाला होता.
जुनेद शेख व त्याच्या साथीदारांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रभात टॉकीजच्या आवारात हवेत गोळीबार करून दहशत माजवली होती. पवन दिसताच जुनेदने तो बघा पवन दिसतोय, त्याला जिवंत सोडू नका. असे म्हणत त्याच्यावर गोळीबार केला. जुनेदच्या अन्य साथीदारांनीही पवनवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पवन जागीच ठार झाला. खुनाच्या घटनेनंतर कराडात तणाव निर्माण झाला. पवनच्या समर्थकांनी जाळपोळ करत दगडफेक करून गाड्यासह काही बंगल्याच्या काचा फोडल्या.
पवनच्या समर्थकांसह नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक करत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. संशयितांना पकडण्यासाठी तीन पथके रवाना केली होती. संशयित पुण्याकडे पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना पकडले.
गुरूवारी सकाळी त्यांना कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांची दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर संशयितांना कडक बंदोबस्तात पुन्हा चौकशीसाठी निर्जनस्थळी नेण्यात आले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी संशयितांना पोलीस ठाण्यात न ठेवता अन्य पोलीस ठाण्यात हलवले. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे करत आहेत.