Top 15 News: पवार-पटेल भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू, देशात साखरेचे दर पुन्हा वाढणार? आणि सलमान खानचा आर्मी लूक पाहून चाहते भारावले! , वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वस्थतेमुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली.

पवार-पटेल भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू;
१० नोव्हेंबरनंतर काय घडणार?
Top 15 News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वस्थतेमुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान १० नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटण्याचा संवाद झाल्याने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी अजित पवार असते तर १२ फेब्रुवारीला विलिनीकरण झाले असते, असा दावा केला. शशिकांत शिंदे यांनीही या विधानावर प्रतिक्रिया दिली. संजय शिरसाट यांनी या भेटीतून नव्या घडामोडींचे संकेत मिळत असल्याचे म्हटले. त्यामुळे १० नोव्हेंबरच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजू शेट्टींच्या ६१ तासांच्या आंदोलनाला यश!
ऊस उत्पादकांना मिळणार प्रतिटन ४२०० रुपये
ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले ६१ तासांचे चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर कोल्हापूरमधील ऊसदराचा तिढा सुटला आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ३९०० रुपये मिळणार असून, हंगाम संपल्यानंतर आणखी १०० रुपये दिले जातील. साखरेला प्रतिटन ४५०० रुपये दर मिळाल्यास अतिरिक्त २०० रुपये मिळतील. अशा प्रकारे एकूण ४२०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो. दरम्यान, अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा शेट्टींनी दिला आहे.
बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट;
वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय
बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणणाऱ्या वैभव चव्हाणचा बीडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. मृत्यूपूर्वी माझ्या आणि मित्राच्या जीविताला धोका असल्याचा उल्लेख असलेली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान, वैभवच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. कुराश संघटनेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, वैभवचा मृत्यू आत्महत्या की घातपात, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष बसणार?
सरकारचा मोठा निर्णय, सतेज पाटील संतापले!
महाराष्ट्र सरकारने सहकारी संस्था सुधारणा अध्यादेश २०२६ जारी करत गोकुळ दूध संघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये पाच शासकीय संचालक नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चार तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकारही असेल. त्यामुळे गोकुळमध्ये महायुतीला सत्तास्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा असल्याची टीका केली आहे. या निर्णयाविरोधात ९ नोव्हेंबरला संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल;
पुढील काही दिवस कसे राहणार? Top 15 News:
महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्याने बदल होत आहेत. सकाळी गारवा, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमानातील चढ-उतारही कायम राहणार आहेत. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. पुढील काही दिवसही राज्यात अशाच प्रकारचे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
‘रोहित पवारांनी आमच्या पक्षात यावं अन्…’;
सुनील तटकरेंचं थेट निमंत्रण
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांना पक्षात येण्याचे थेट निमंत्रण दिले आहे. रोहित पवार यांना त्यांच्या वहिनींची म्हणजेच सुनेत्रा पवार यांची खूप काळजी आहे. त्यांना पक्षात एकटं पाडलं जात असल्याची रोहित पवारांची भावना आहे. त्यामुळे एवढीच काळजी असेल, तर त्यांनी आमच्या पक्षात यावं आणि वहिनींची काळजी घ्यावी, असा टोला लगावत तटकरेंनी राजकीय निमंत्रण दिलं.
‘खो द्यायचा, धप्पा द्यायचा की पळायचं’;
धीरज देशमुखांचा विरोधकांना टोला
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत त्यांनी बँकेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी ‘खो द्यायचा, धप्पा द्यायचा की पळायचं, हे संयुक्तिक नाही,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसप्रणित सहकार पॅनलचे उमेदवारही उपस्थित होते. त्यांच्या विधानामुळे लातूरमधील जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे.
दुष्काळात विकतचं पाणी आणून झेंडूची बाग फुलवली;
बाजारभाव कोसळल्याने शेतकरी हतबल
दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करत आजेगाव येथील प्रकाश गोरे आणि मीनाक्षी गोरे या दाम्पत्याने एक एकर क्षेत्रात झेंडूची बाग फुलवली. यासाठी त्यांना सुमारे ८० हजार रुपये खर्च आला. पाणी नसल्याने पाच हजार लिटर पाण्यासाठी एक हजार रुपये मोजून त्यांनी बाग जगवली. मात्र, मेहनतीने पिकवलेल्या फुलांना बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे झेंडू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने फुलांची हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी गोरे दाम्पत्याने केली आहे.
‘मुंबईकरांना पाणी हवंय, पेंग्विन नको’;
किशोरी पेडणेकरांचा टोला
पेंग्विन आणण्याच्या चर्चेवरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पेंग्विन ही आदित्य ठाकरेंची संकल्पना असून, सुरुवातीला विरोध करणारेच आता त्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या पेंग्विनच्या काही जोड्या म्हैसूरला पाठवून त्यांच्या जागी जिराफ आणि सिंह आणण्याची चर्चा आहे. मात्र, दिवाळीनंतर मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी, आरोग्य आणि प्रदूषणाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी प्राणी आणण्यावर चर्चा सुरू आहे. ‘मुंबईकरांना आता पाणी हवंय, पेंग्विन आणण्याची ही वेळ नाही,’ असं पेडणेकर म्हणाल्या.
भिवंडीत ५ हजार दिव्यांचा दीपोत्सव;
गड-किल्ल्यांच्या देखाव्यांतून स्वराज्याचा इतिहास
दिवाळीनिमित्त भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिवाळीचा पहिला दिवा शिवरायांच्या चरणी प्रज्वलित करून उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी तब्बल पाच हजार दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला. यानिमित्त आयोजित गड-किल्ले स्पर्धेत शिवरायांनी स्वराज्यासाठी जिंकलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांचे देखावे साकारण्यात आले. या माध्यमातून नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास आणि शौर्यगाथा अनुभवता आली. शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी आणि ह.भ.प. कैलास महाराज निचिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
देशात साखरेचे दर पुन्हा वाढणार?
दर ३१ वरून थेट ४२ रुपये करण्याची मागणी
देशात साखरेचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने (AISTA) साखरेचा किमान विक्री दर (MSP) ३१ रुपयांवरून ४२ रुपये प्रतिकिलो करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. फेब्रुवारी २०१९ पासून हा दर बदललेला नसल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ही मागणी मांडण्यात आली. दरवाढ झाल्यास साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळून ऊस उत्पादकांची थकबाकी वेळेत देण्यास मदत होऊ शकते. मात्र, याचा परिणाम बाजारातील साखरेच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.
CBSE बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक जाहीर!
दहावी-बारावीच्या परीक्षा १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या २०२७ च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दोन्ही वर्गांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून, परीक्षेची वेळ सकाळी १०.३० वाजता असेल. यंदा दहावीचे सुमारे २६.५० लाख, तर बारावीचे १९.८० लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीसाठी ८३, तर बारावीसाठी १२१ विषयांच्या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि विषयांच्या परीक्षांमध्ये योग्य अंतर राहावे, याचा विचार करून वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
ट्रम्प यांचा व्हाइट हाऊसमध्ये मोठा फेरबदल;
स्टीफन मिलर नवे चीफ ऑफ स्टाफ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. सुसी वाइल्स यांच्याऐवजी निकटवर्तीय स्टीफन मिलर यांची नवे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारपासून ते पदभार स्वीकारतील. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधी सभागृह आणि सिनेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीतील पराभवामुळे ट्रम्प नाराज असल्याची चर्चा आहे. मिलर हे ट्रम्प यांचे विश्वासू आणि प्रभावी सल्लागार असून त्यांच्या स्थलांतर धोरणातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा!
भावनिक पोस्ट करत निवृत्ती जाहीर
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्याने हा निर्णय जाहीर केला. शमीने भारतासाठी ६४ कसोटी सामने खेळताना २२९ विकेट्स घेतल्या. ५६ धावांत ६ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. कसोटी क्रिकेट हा आयुष्यातील खास भाग असल्याचे सांगत त्याने सहकारी, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभार मानले. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सलमान खानचा आर्मी लूक पाहून चाहते भारावले!
‘मातृभूमी’च्या ट्रेलरला मीडियाकडून जोरदार प्रतिसाद
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. मुंबईत आयोजित खास कार्यक्रमात चित्रपटाच्या ट्रेलरची झलक मीडियाला दाखवण्यात आली. सलमानचा आर्मी युनिफॉर्ममधील दमदार अंदाज आणि युद्धाचे थरारक प्रसंग उपस्थितांच्या पसंतीस उतरले. चित्रांगदा सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे कौतुक करण्यात आले. देशभक्ती, सैनिकांचे बलिदान आणि युद्धाचे मानवी परिणाम यांवर चित्रपट भाष्य करणार आहे. अपूर्व लाखिया यांनी दिग्दर्शन केले असून, आता अधिकृत ट्रेलरची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे





