Top 15 News : शिवसेना-धनुष्यबाण वादावर आज पुन्हा सुनावणी, जरांगे आज मुंबईकडे रवाना होणार आणि अजित कुमारांच्या रेसमध्ये विजय-तृषाची उपस्थिती, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी दोननंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.

शिवसेना-धनुष्यबाण वादावर आज पुन्हा सुनावणी;
शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू राहणार
Top 15 News : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी दोननंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. हे प्रकरण अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यात असून, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने नीरज किशन कौल युक्तिवाद करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मागील सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी उद्धव ठाकरे यांनी पक्षघटनेत चुकीचे बदल केल्याचा दावा केला होता. तसेच, पक्षातील आमदारांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्याचेही त्यांनी म्हटले. आज शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि अन्य घटनात्मक संस्थांची बाजू मांडली जाण्याची शक्यता आहे.
जरांगे आज मुंबईकडे रवाना होणार;
फडणवीस म्हणाले, ‘जवळपास सर्व मागण्या पूर्ण झाल्यात’
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १८वा दिवस असून, ते सकाळी ११ वाजता मोजक्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगेंनी पुन्हा अर्ज केला असून, १९ ऐवजी १८ सप्टेंबरला परवानगी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास सर्व मागण्या पूर्ण झाल्याचे सांगितले. संवैधानिक मागण्या मान्य होतील, मात्र न्यायालयाशी संबंधित काही मागण्यांबाबत प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना असुविधा होऊ नये, याचाही विचार करावा लागेल, असे फडणवीस म्हणाले.
राज्यात पावसाचा जोर ओसरणार;
१९ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचे संकेत
राज्यातील पावसाचा जोर आज काहीसा कमी होण्याची शक्यता असून, अनेक भागांत पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र सोलापूर, जालना आणि बीड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागांत ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. दरम्यान, १९ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आहे. १४ सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा १५ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
आरतीच्या मानावरून सांगलीच्या राजघराण्यात वाद;
भाग्यश्री पटवर्धन यांच्या कृतीने खळबळ
सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्सव मूर्तीच्या आरतीच्या मानावरून पटवर्धन कुटुंबातील वाद पुन्हा समोर आला आहे. गणेश चतुर्थीला अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी मंदिरात उत्सव मूर्तीची आरती केली. यावेळी नूतन युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना डावलल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आदित्यराजे हेच संस्थानाचे पुढील उत्तराधिकारी असल्याचे स्पष्ट केले. तसेच भाग्यश्री आणि त्यांचे पती हिमालय दासानी यांच्यावर गैरकारभाराचे आरोप करत त्यांना संस्थानातून काढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विकासकामे बाजूला ठेवून बळीराजासाठी मदतीचा विचार करणार
बाबासाहेब पाटील यांची माहिती
राज्यात पावसाअभावी खरीप पिके संकटात आली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि तुरीसह उसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकार गांभीर्याने विचार करत असून, गरज पडल्यास विकासात्मक कामे काही काळ बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांच्या हिताचा विचार केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय;
डॉक्टरांच्या नामफलकावर QR कोड अनिवार्य Top 15 News :
राज्यातील बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) सर्व नोंदणीकृत डॉक्टरांसाठी QR कोड प्रणाली अनिवार्य केली आहे. डॉक्टरांना दवाखाना किंवा रुग्णालयाच्या दर्शनी भागात QR कोड असलेला नामफलक लावावा लागणार आहे. रुग्ण मोबाइलद्वारे कोड स्कॅन करून डॉक्टरचे नाव, नोंदणी क्रमांक, शैक्षणिक पात्रता आणि परवान्याची वैधता तपासू शकतील. ‘नो युवर डॉक्टर’ (KYD) उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे १० हजार डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. नोंदणीनंतर डॉक्टरांना QR कोड मिळतो. ऑक्टोबरअखेर राज्यभर ही प्रणाली लागू होणार असून, एकापेक्षा अधिक ठिकाणी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र QR कोड घ्यावा लागेल.
आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही’;
आंतरवालीतून मराठा आंदोलक मुंबईकडे सज्ज!
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मराठा समाजबांधव सज्ज झाले आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी महिला आणि पुरुष आंदोलक मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले आहेत. सरकारने वेळोवेळी आश्वासने देऊनही मागण्या पूर्ण केल्या नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता आरक्षण पदरात पाडूनच मुंबई सोडणार, असा निर्धार महिला आंदोलकांनी व्यक्त केला. दरम्यान, आंदोलनाला सरकार आणि पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी केवळ चार जणांसोबत मुंबईला जाण्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती आंदोलक मुंबईकडे रवाना होतात, याकडे लक्ष लागले आहे.
जरांगेंकडून पुन्हा उपोषणासाठी परवानगी मागण्याची तयारी;
सरकारनेही दोन पावले मागे यावे
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सहकारी गंगाधर काळकुटे यांनी महत्त्वाची माहिती दिली. जरांगे पाटील यांना पुन्हा एकट्याला उपोषणाला बसण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे काळकुटे यांनी सांगितले. जरांगे दोन पावले मागे आले असून, सरकारनेही त्यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन पावले मागे येत उपोषणाला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. जरांगेंनी सांगितलेल्या मार्गानेच मुंबईकडे जाणार असून, मैदानावर उपोषणासाठी चार ते पाच जण जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर जरांगे आंदोलनातून माघार घेतील, असा दावा काळकुटे यांनी केला.
गणरायासमोर चंद्रकांत खैरेंचे साकडे;
मराठवाड्यात पाऊस पडू दे, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे
छत्रपती संभाजीनगरच्या संस्थान गणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पूजा, अभिषेक आणि अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन पाऊस पडावा, शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि उद्योजकांना सुख-समृद्धी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. जायकवाडी धरण पूर्ण भरावे आणि मराठवाड्यातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलपूजनही करण्यात आले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत, अशी मागणी खैरे यांनी केली. तसेच मराठवाड्याचा ४० कोटी रुपयांचा अनुशेष भरून काढावा आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
शिरसाटांच्या कार्यालयात गणरायाचे आगमन;
बळीराजासाठी घातले साकडे
छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रार्थना केली. देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सुखी आणि आनंदी ठेव, असे साकडे शिरसाट यांनी घातले. दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी गणरायाला साकडे घातल्याच्या वक्तव्यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. देवाकडे मनोकामना व्यक्त करण्यात गैर काहीही नाही. खैरे यांनीही आपली इच्छा व्यक्त केली आहे. ती पूर्ण होणार की नाही, हे काळानंतर स्पष्ट होईल, असे शिरसाट म्हणाले.
UPI व्यवहारांबाबत केंद्राचा मोठा निर्णय;
२ हजार रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क नाही
केंद्र सरकारने १४ सप्टेंबर २०२६ रोजी UPI आणि RuPay डेबिट कार्ड व्यवहारांबाबत राजपत्र अधिसूचना जारी केली. त्यानुसार २ हजार रुपयांपर्यंतचे UPI आणि RuPay डेबिट कार्ड व्यवहार ‘इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धती’ म्हणून शुल्कमुक्त करण्यात आले आहेत. या व्यवहारांसाठी पैसे पाठवणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडून बँक किंवा पेमेंट सिस्टम ऑपरेटर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कोणतेही शुल्क आकारू शकणार नाही. ‘पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ॲक्ट, २००७’ अंतर्गत सरकारने हा निर्णय घेतला आहे. UPI व्यवहारांवरील शुल्काबाबतचा संभ्रम दूर करणे हा यामागील उद्देश असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. P2P व्यवहार मोफतच राहतील, असेही सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते.
ममता बॅनर्जींच्या TMCला मोठा धक्का;
१७ बंडखोर खासदार भाजपमध्ये जाणार?
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या २० बंडखोर खासदारांपैकी १७ जण दुर्गापूजेपूर्वी किंवा नंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी केला. दोन-तृतीयांशपेक्षा अधिक खासदार एकत्र पक्ष बदलल्यास पक्षांतरबंदी कायद्यातील विलीनीकरणाच्या तरतुदीचा लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. उर्वरित अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे भाजपमध्ये प्रवेश न करता बाहेरून एनडीएला पाठिंबा देतील, अशी माहिती आहे. बंगालमध्ये TMCचे २८ लोकसभा खासदार होते; त्यापैकी २० जणांनी वेगळा गट केल्याने ममता बॅनर्जींकडे आठ खासदार उरले आहेत.
मसूद अझहरवर पाकिस्तानकडून इनाम वाढवला;
नव्या मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने २०२६ मधील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर केली असून, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचाही त्यात समावेश आहे. FIAने अझहरवरील इनामाची रक्कम ५० लाखांवरून ७० लाख पाकिस्तानी रुपये केली आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या बैठकीपूर्वी पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे भारतीय सूत्रांचे म्हणणे आहे. अझहर अफगाणिस्तानात असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातो. मात्र, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या विश्लेषणानुसार तो पाकिस्तानात लपल्याचा दावा करण्यात आला आहे. नव्या रेड बुकमध्ये मुंबईवरील २६/११ हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेवर भारताचा ७२ धावांनी विजय;
ट्रॉफी स्वीकारण्यावरून दुबईत हायव्होल्टेज ड्रामा
भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषकात श्रीलंकेवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ट्रॉफी स्वीकारण्यावरून वाद निर्माण झाला. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधांमध्ये यापूर्वीही हस्तांदोलन आणि ट्रॉफी वितरणावरून वाद झाले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध अधिक तणावपूर्ण झाले. दरम्यान, या प्रकरणावरून सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले आहे.
अजित कुमारांच्या रेसमध्ये विजय-तृषाची उपस्थिती;
सिल्व्हरस्टोनमधील VIDEO व्हायरल
दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील अभिनेते अजित कुमार आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय सध्या चर्चेत आहेत. अजित कुमार यांच्या मिशेलिन ले मॅन्स कपच्या सिल्व्हरस्टोन फेरीसाठी विजय ब्रिटनमध्ये पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री तृषा कृष्णनही उपस्थित होती. रेसपूर्वी विजय, अजित आणि तृषा एका तंबूत दिसले. तसेच शर्यतीदरम्यान विजय आणि तृषा प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये एकत्र उभे असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅमेऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर तृषा रेस पाहण्यासाठी खाली वाकताना दिसली, तर विजय यांनी तिच्याकडे पाहिल्याचा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला. या व्हिडिओनंतर विजय-तृषाच्या मैत्रीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.





