Top 15 News: राज्यातील २०० साखर कारखान्यांना गाळप परवाने , पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आणि रणबीरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर धूम, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News:

राज्यातील २०० साखर कारखान्यांना गाळप परवाने;
१३८ कारखान्यांचे प्रत्यक्ष गाळप सुरू
Top 15 News: राज्यातील २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी साखर आयुक्तालयाने २०० कारखान्यांना परवानगी दिली आहे. यामध्ये ९९ सहकारी आणि १०१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १३८ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर विभागातील सर्वाधिक ४३ कारखान्यांना परवाने मिळाले आहेत. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.१९ टक्के असून कोल्हापूर विभागात सर्वाधिक ९.४१ टक्के उतारा नोंदवला आहे. दरम्यान, फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पाठवण्यापूर्वी संबंधित कारखान्याचा गाळप परवाना तपासावा, असे आवाहन साखर आयुक्तालयाने केले आहे.
जेवणाला उशीर, पण बावनकुळे शेतकऱ्याच्याच घरी थांबले!
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या लोहारी सावंगा गावात नंदूजी लोहे यांच्या घरी मुक्कामी राहिले. मात्र, स्वयंपाकाला उशीर झाल्याने बावनकुळे यांचे जेवण रखडले. कार्यकर्त्यांनी दुसरीकडे जेवण्याचा सल्ला दिला, पण शेतकऱ्याचा स्वाभिमान दुखावू नये म्हणून त्यांनी नकार दिला. शेतकरी संवादाचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी लोहे कुटुंबीयांसोबत जेवण केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत शेकोटीचा आनंदही घेतला.
‘सतेज पाटील फेक नरेटिव्ह पसरवण्यात तरबेज’;
धनंजय महाडिकांचा जोरदार हल्लाबोल
बातमी : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. सतेज पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल केली असून, फेक नरेटिव्ह पसरवण्यात ते तरबेज आहेत, असा आरोप महाडिक यांनी केला. सत्ता वाटून घेण्याचा प्रस्ताव दिला असता, तर त्यावर विचार केला असता, असेही ते म्हणाले. गोकुळवर सरकारी कब्जा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तज्ज्ञ संचालक नियुक्तीबद्दल आभार मानले. गोकुळचा अध्यक्ष कोण होईल, हे आताच सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल;
पहाटे गारवा, दिवसा उन्हाचा चटका!
राज्यात हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागली असून पहाटे गारवा, तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील तापमानात चढ-उतार सुरू आहेत. रत्नागिरी येथे ३७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर निफाडमध्ये नीचांकी १२.७ अंश तापमान नोंदवले गेले. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे हवामानात बदल होत आहेत. पुढील काही दिवस तापमानाचा लपंडाव कायम राहण्याची शक्यता असून राज्यात थंडीचा जोर कधी वाढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुण्यात २,८०० घरांत डेंगीच्या डासांची उत्पत्ती;
महापालिकेची कारवाई, ९० हजारांचा दंड Top 15 News:
पुण्यात डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने ऑक्टोबर महिन्यात विशेष मोहीम राबवली होती. या तपासणीत तब्बल २ हजार ८०० घरांमध्ये डासांच्या उत्पत्तीला पोषक परिस्थिती आढळली. याप्रकरणी महापालिकेने ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला असून ४४८ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. मोहिमेदरम्यान २ लाख ९४ हजार ४६४ मिळकती आणि ४ लाख ८५ हजार ५९३ कंटेनर तपासण्यात आले. तसेच ७३ हजार ३६० घरांमध्ये धूरफवारणी, तर ४९ हजार ९५३ घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
‘मुलगी म्हणजे एटीएम नाही’;
पायल झांबरे प्रकरणी नीलम गोऱ्हे आक्रमक
पायल झांबरे मृत्यूप्रकरणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खेड शिवापूर येथील त्यांच्या माहेरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. पायल यांच्या चिमुकलीचा ताबा माहेरच्या कुटुंबीयांना मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभागाने लक्ष घालावे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणाचा हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचे सांगत, ‘मुलगी म्हणजे एटीएम नाही,’ असा संदेश त्यांनी दिला.
बीडच्या गावात दिवाळीचा आनंद हरवला!
लेकरांच्या ताटात चटणी-भाकरी, घमेल्यात अंघोळ
राज्यभर दिवाळीचा उत्साह असताना बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावात मात्र दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी विहिरी, बोअरवेल आणि हातपंप कोरडे पडल्याने गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमुकल्यांना घमेल्यात अंघोळ घालण्याची वेळ आली आहे. शेतात पीक न आल्याने घराघरांत फराळाऐवजी लेकरांच्या ताटात चटणी-भाकरी आहे. गावाची लोकसंख्या जवळपास तीन हजार असून टँकरसाठी प्रस्ताव देऊनही पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याचा आरोप सरपंच अभय गर्जे यांनी केला आहे. दिवाळीतही ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीवरून वंचित आघाडी आक्रमक;
जालन्यात काळी दिवाळी साजरी करणार!
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या आर्थिक मदतीचा निषेध करण्यासाठी जालना येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काळी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारने शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत दिली असून, या रकमेत दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राजकीय सोहळ्यांमध्ये व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा-भाकरी खाऊन सरकारचा निषेध करणार असल्याचे घुमारे यांनी सांगितले.
फायनान्स कार्यालय फोडल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गंभीर कलम;
आमदारांच्या दबावाचा तुपकरांचा आरोप
नांदेडच्या लोहा येथे श्रीराम आणि बजाज फायनान्स कार्यालयांची तोडफोड केल्याप्रकरणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला. चार कार्यकर्त्यांचा सत्कार करत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. या कलमाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बीडमध्ये रामलिंग वाघाला जेरबंद करा;
आमदार सुरेश धस यांची मागणी Top 15 News:
बीडच्या आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी देविदास टकले यांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे. नागपूर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वाघाला पिंजऱ्यात पकडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याच वाघाच्या हल्ल्यात वर्षभरापूर्वी राजेंद्र गोल्हार यांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत नागरिकांनी एकट्याने शेतात किंवा जंगल परिसरात जाऊ नये, असे आवाहन धस यांनी केले.
पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार!
देशवासीयांना दिला खास संदेश
देशभरात दिवाळीचा उत्साह असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशातून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा संदेश देतो. येणारा काळ सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना त्यांनी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अयोध्येत दीपोत्सवानिमित्त ३० लाखांहून अधिक मातीचे दिवे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राजकारणाचा येण्यासाठी राहुल-प्रियांकांनी विरोध केला;
सोनिया गांधींचा आत्मचरित्रातून मोठा खुलासा
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातून अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. राजकारणातील महत्त्वाकांक्षा, लोभ आणि विश्वासघाताची वृत्ती यांचा आपल्याला तिटकारा होता. राहुल आणि प्रियांका यांनीही राजकारणात प्रवेश करू नये, अशी भूमिका घेतली होती, असे त्यांनी सांगितले. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या निर्णयावेळी त्यांच्या जीवाची भीती वाटत होती, असाही खुलासा केला. आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चूक होता, असेही त्यांनी मान्य केले. दरम्यान, भाजपने त्यांच्या आत्मचरित्रावर टीका करत काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांवरही लिहिण्याचे आव्हान दिले.
भारत-अमेरिकेची चिंता वाढली;
जिनपिंग यांचा नेमका प्लॅन काय?
चीनने हिंदी महासागरासह दक्षिण चीन समुद्र, तैवान आणि जपान परिसरात नौदलाच्या हालचाली वाढवल्या आहेत. वृत्तानुसार, चीनच्या जवळपास १०० युद्धनौका विविध समुद्री मार्गांवर गस्त घालत आहेत. चीनकडे ४०० हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्या असून, तीन विमानवाहू जहाजे कार्यरत आहेत. चौथ्या विमानवाहू जहाजाचीही निर्मिती सुरू आहे. शी जिनपिंग यांचे चीनला सागरी महासत्ता बनवण्याचे उद्दिष्ट आहे. या वाढत्या नौदल सामर्थ्यामुळे अमेरिका आणि भारतासमोर सुरक्षेचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींकडे भारताचे लक्ष लागले आहे.
IPL मध्ये सर्वात मोठा ट्रेड?
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये, अर्शदीप मुंबईत येणार
आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात मोठ्या ट्रेडची चर्चा रंगली आहे. वृत्तानुसार, हार्दिक पांड्याच्या बदल्यात अर्शदीप सिंग मुंबईच्या संघात दाखल होऊ शकतो. हार्दिकने स्वतः मुंबईची साथ सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावाही केला जात आहे. दरम्यान, हार्दिक पंजाबमध्ये गेल्यास श्रेयस अय्यरच कर्णधारपदी कायम राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत हार्दिकच्या जागी रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी दिली जाण्याची चर्चा आहे. मात्र, या संभाव्य ट्रेडबाबत दोन्ही संघांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
रणबीरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर धूम!
तीन दिवसांत ३७५ कोटींची कमाई Top 15 News:
रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण: राईज ऑफ अ लेजेंड’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा आहे. ५ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात ३७५.५० कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केल्याचा Sacnilk चा दावा आहे. भारतात चित्रपटाची नेट कमाई १८२.७० कोटींवर पोहोचली आहे. हिंदी आवृत्तीला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून शनिवारी ५३ कोटींची कमाई झाली. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट तब्बल ४ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.





