TOP 15: अदानी पॉवर प्लांटसाठी 5,152 झाडांची कत्तल ते भारत-पाकिस्तानचा आज महामुकाबला; जाणून घ्या आजच्या TOP 15 News
TOP 15: राज्य, देश- विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी...

TOP 15: 1. सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरणी सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश
सिंहगड संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. ६० कोटी ६५ लाख रुपये देण्याचे आश्वासन पाळले नसल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता सिंहगड संस्थेच्या गैरकारभाराची CBI, ED आणि आयकर विभागाकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त मारुती नवले मारुती नवले यांच्यासह सर्व विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई करण्यात आली असून, सिंहगडच्या तांत्रिक संस्थांचा ताबा प्रशासक घेणार असल्याची माहिती आहे. संस्थेची बँक खाती आणि गुंतवणुका गोठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर आता १९ नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी पार पडणार आहे.
2. खासगी ट्रॅव्हल्स पुलावरून खाली कोसळल्याने १४ प्रवासी जखमी
छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. वरुड काजी शिवारातील पुलावर आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून खाली कोसळून उलटल्याने १४ प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटेची वेळ असल्याने बसमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. अपघातानंतर प्रवाशांच्या आरडाओरड्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चालकाला झोप आल्याने हा अपघात झाला की तांत्रिक बिघाडामुळे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
3. दोन्ही शिवसेनेबाबतच्या ओमराजेंच्या विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात असताना, दुसरीकडे दोन्ही शिवसेने एकत्र येण्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ‘दोन्ही शिवसेना एकत्र संदर्भातील निर्णय हा वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे, पण दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वात आनंदी मी असेन,’ असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं. त्यासंदर्भातही आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला असता, “ओमराजेंच्या प्रश्नावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तर दिले आहे,” असे म्हणत पुण्यातील आंदोलनावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी गेलेल्या रोषाची आठवण आदित्य ठाकरेंनी करुन दिली.
4. सोनम वांगचुक यांना जाणूनबुजून नजरकैदेत ठेवल्याचा काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांचा आरोप
सोनम वांगचुक हे देशासाठी आणि देशातील सध्याच्या परिस्थितीविरोधात आवाज उठवणारे समाजसेवक आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे व्यक्तिमत्त्व आहेत. १४ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात त्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होणार होते. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर त्यांना जाणूनबुजून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे.
5. देशातील संपत्ती अदानींच्या हाती सोपवण्याचा भाजप सरकारचा मानस – नाना पटोले
अदानी पॉवर प्लांटसाठी 5,152 झाडांची कत्तल
रायपूर-तिरोडा वीजवाहिनी प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे संभाव्य परिणाम यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अदानी पॉवर प्लांट ते रायपूरपर्यंत जाणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात तब्बल 5 हजार 152 झाडांची कत्तल होणार आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अल निनोचा प्रभाव म्हणजे भाजपचं पाप असल्याचे सांगत भाजपवर हल्लबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार देशभरात जंगलतोड करत आहे. वनसंपदेच्या ऱ्हासामुळे पर्यावरणीय संकट वाढत असून, पाणीटंचाई आणि शेतीच्या नुकसानीचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहे. देशातील संपत्ती अदानींच्या हाती सोपवण्याचा भाजप सरकारचा मानस असल्याचा आरोप करत पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
5. राज्यात थंडी वाढली! पारा १४ अंशांच्या खाली
राज्यात हळूहळू थंडी वाढत असून सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवू लागला आहे. मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अजूनही कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय. राज्यातील काही भागांमध्ये सकाळचा गारठा वाढू लागला आहे. पण नागरिकांना अजूनही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर आणि यवतमाळ या ठिकाणीही किमान तापमान १४ अंशांच्या खाली गेला आहे. आज राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.
6. राहूल गांधींचे फोन टॅपिंगचे आरोप बालिशपणाचे – एकनाथ शिंदे
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून माझा टॅपिंग केला जात आहे. मी फोनवर कोणाशी बोलतो आणि माझ्या इतर हालचालींची सर्व माहिती पंतप्रधान मोदींपर्यंत पोहचवली जात आहे,’ असा आरोप केला होता. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे.
राहूल गांधींचे फोन टॅपिंगचे आरोप बालिशपणाचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एवढा वेळ आहे का? असा सवाल शिंदे यांनी केला. तसेच देशाचा कारभार सांभाळताना आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्याचे काम करताना मोदींवर असे आरोप करणे चुकीचे आहे. प्रत्येक वेळी मोदींचे नाव घ्यायचे आणि कोणतेही पुरावे नसताना आरोप करायचे, ही राहुल गांधींची सवय असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.
7. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही – उमेश पाटील
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी, विलिनीकरणासंदर्भात चर्चा ‘ना औपचारिक, ना अनौपचारिक.. ! ना आमच्या बाजूने… ना त्यांच्या बाजूने.. खोटे नॅरेटीव्ह सेट करून स्वत:चा राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी माध्यमांचा वापर करणाऱ्या तथाकथित ‘सूत्रां’वर किमान आतातरी विश्वास ठेऊ नका.
नियमित भेटींनाही वेगळा राजकीय रंग देऊन ‘पार्थ पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली’ अशा बातम्या प्रसारित केल्या, इथून पुढे माध्यमांनी अशा अविश्वसनीय सूत्रांपासून सावध राहावे. यामागे नेमका कोणाचा अजेंडा आहे? असा सवाल करत उमेश पाटील यांनी करत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विलीनिकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहे.
9. गणपती विसर्जनाला परवानगी नाकारली, मग छटपूजेला कशी?
मनसेचा उल्हासनगर महापालिकेला जाब
उल्हासनगरच्या अँटेलिया घाटावर गणपती विसर्जनासाठी परवानगी नाकारण्यात आली, मात्र त्याच घाटावर छटपूजेसाठी परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. या कथित दुजाभावावरून मनसेने आक्रमक भूमिका घेत महापालिका उपायुक्त स्नेहा करपे यांना जाब विचारला. गणपती विसर्जनासाठी परवानगी नाकारणाऱ्या प्रशासनाने छटपूजेसाठी परवानगी देण्यामागचे कारण काय, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाची ही दुटप्पी भूमिका का, असा सवालही मनसेकडून करण्यात आला. मात्र, या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळाले नसल्याने उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
10. मोकाट कुत्र्यांची पिल्ले थेट महापालिकेत आणून भीम ब्रिगेडचे आंदोलन
२,५०० नागरिकांना कुत्र्यांचा चावा
अमरावती शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात तब्बल २ हजार ५०० नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत भीम ब्रिगेड संघटनेने थेट महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात आंदोलन केले. विशेष म्हणजे, आंदोलकांनी मोकाट कुत्र्यांची पिल्ले थेट महापालिकेत आणून अधिकाऱ्यांसमोर ठेवली. आतापर्यंत ३० हजार कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि नसबंदी केल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, नसबंदी करूनही शहरात कुत्र्यांची पिल्ले जन्माला येत असतील, तर प्रशासनाची कारवाई नेमकी कुठे कमी पडते, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
11. मायक्रोसॉफ्टची पूर्ववत झाल्याचा दावा; कंपनीने माफीही मागितली
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे Outlook आणि Microsoft Teams व कोपायलट च्या सेवा जगभरात डाऊन झाल्या होत्या. याबाबत डाऊनडिटेक्टरवर लाखो युजर्सनी तक्रारी नोंदवल्या होत्या. याबाबत आता मायक्रोसॉफ्टने एका निवेदनाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देत ग्राहकांची माफी देखील मागितली आहे. तसेच आता सेवा पुन्हा पूर्ववत झाल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे.
‘नेटवर्क क्षमतेत पूर्वी केलेल्या एका अपग्रेडदरम्यान उद्भवलेल्या त्रुटी अलीकडे केलेल्या नेटवर्क बदलांनंतर समोर आली, ज्यामुळे ही घटना घडली. आम्ही टप्प्याटप्प्याने सेवा पूर्ववत केल्या आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांची स्थिरता तपासली. यामुळे प्रक्रिया पूर्ण होण्यास अधिक वेळ लागला. पण यामुळे सेवा स्थिर पद्धतीने पुन्हा सुरू करणं शक्य झालं.”, असं स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्टने दिलं आहे.
12. गांधी कुटुंबावर पोस्ट करतातच कंगना रणौत यांच्यावर गुन्हा दाखल
हिमाचल प्रदेश पोलिसांनी भाजपाच्या मंडी येथील खासदार कंगना रणौत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे गांधी कुटुंबावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली शिमल्यातील बालुगंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंगना रणौत यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, दिवंगत नेते संजय गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात शिमल्यातील अतुल शर्मा यांनी राज्याचे पोलीस महासंचालक अशोक तिवारी यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली होती.
13. अमेरिकेत सर्व विमानांची उड्डाणे रोखली; हजारो प्रवासी अडकले
अमेरिकेत संपूर्ण देशभरातील विमानसेवा अचानक ठप्प झाली आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानांची उड्डाणे थांबवली असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये चानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आली आहे.
या निर्णयामुळे हजारो प्रवासी अडकून पडले असून, प्रवाशांना मनस्ताप आणि गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. होमलँड सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी, हा कोणताही घातपाती हल्ला असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. आकाशात असलेली सर्व विमाने सुरक्षित आहेत आणि काळजी करण्याचे काहीही कारण नाही. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असल्याचे सांगितले आहे.
14. भारत-पाकिस्तानचा आज महामुकाबला; १९ वर्षांखालील आशिया चषक कोण जिंकणार?
आशिया कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला होणार आहे. हा सामना अल अमिरात क्रिकेट ग्राउंडमध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. भारताला नवव्यांदा १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे.
या महत्त्वपूर्ण लढतीत आर्यवीर सेहवाग आणि ईशान सूद यांसारख्या खेळाडूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताचा १५१ धावांनी पराभव करत दुसरे विजेतेपद पटकावले होते. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याकडे आणि नवव्यांदा ट्रॉफी जिंकून आपला विक्रम भक्कम करण्याकडे भारतीय संघाकडे लक्ष लागले आहे.
15. ‘जोश’ सिनेमातील शरद कपूरची अवस्था पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले
‘जोश’ चित्रपटात शाहरुख खानच्या विरोधात भूमिका साकारणारा अभिनेता शरद कपूर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील त्याचा बदललेला लूक आणि डोळ्यांत आलेले अश्रू पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. मिळालेल्या वृत्तांनुसार, शरद कपूर सध्या काही शारीरिक अडचणींचा सामना करत असून त्याला स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
घरातील सध्याच्या परिस्थितीत चार कुत्र्यांची योग्य काळजी घेणे कठीण होत असल्याने त्यांना काही काळासाठी प्राणी कल्याण केंद्रात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्हिडीओमध्ये शरद आपल्या चार पाळीव कुत्र्यांना निरोप देताना अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:
Sardaar Ji 3 OTT Release: भारतामधील रिलीज रद्द, आता OTT वर एन्ट्री; ‘सरदार जी 3’ पुन्हा चर्चेत





