Top-10 Richest Indian: भारतात अब्जाधीशांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी जागतिक स्तरावर मानल्या जाणाऱ्या ‘१०० अब्ज डॉलर क्लब’मध्ये स्थान मिळवणारे मुकेश अंबानी हे सध्या एकमेव भारतीय ठरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले असून, त्यांच्या पाठोपाठ गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्केट व्हॅल्यूच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती १०४.६ अब्ज डॉलर इतकी आहे. एवढी प्रचंड संपत्ती असणारे ते देशातील एकमेव उद्योजक असून जगातील मोजक्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. अदानी आणि जिंदल यांची झेप – अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ६२.३ अब्ज डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहेत. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर आलेल्या संकटामधून सावरून अदानी समूहाच्या कंपन्यांनी शेअर बाजारात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. तसेच, ७५ वर्षीय सावित्री जिंदाल यांनी देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून आपला दबदबा कायम ठेवला आहे. ३६.४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह त्या भारताच्या श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २००५ पासून त्या ‘ओपी जिंदाल ग्रुप’ची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. शिव नादर: श्रीमंतीसोबतच दातृत्वातही पुढे- एचसीएल (HCL) चे संस्थापक शिव नादर हे ३५.८ अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, ते केवळ श्रीमंतच नाहीत तर देशातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती म्हणूनही ओळखले जातात. २०२५ च्या ‘हुरून फिलान्थ्रॉपी लिस्ट’नुसार, त्यांनी गेल्या वर्षभरात २,७०८ कोटी रुपयांचे दान केले आहे. भारतातील टॉप १० श्रीमंतांची यादी (फोर्ब्सनुसार): क्रमांक नाव संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये) १ मुकेश अंबानी १०४.६ २ गौतम अदानी ६२.३ ३ सावित्री जिंदल ३६.४ ४ शिव नादर ३५.८ ५ दिलीप संघवी २५.५ ६ लक्ष्मी निवास मित्तल २४.२ ७ कुमार मंगलम बिर्ला २१.१ ८ सायरस पूनावाला २०.२ ९ राधाकिशन दमानी १५.५ १० उदय कोटक १४.८