वसुलीसाठी जबरदस्ती करु नका -प्रताप सरनाईक Top 10 news: वाहतूक पोलिसांच्या वर्तनावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी नोंदवताच राज्याचे वाहतूक अप्पर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षक यांच्यासाठी परिपत्रक काढले आहे. यात सर्व वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चालकांकडून प्रलंबित ई-चलान दंड वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करू नये, पैशांची अवैध मागणी करू नये आणि चालकांशी सौजन्याने वागावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. तसेच या सूचनांचे किंवा ई-चलान वसुलीबाबत जारी केलेल्या परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणात कराडचा हात परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने आता पुन्हा एकदा गती घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांनी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.महादेव मुंडे यांच्या हत्येला बराच काळ लोटला असून एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, “इतका तपास करूनही पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही,” अशी खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली असून, याप्रकरणी त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले. त्या म्हणाल्या की, “या केसशी मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नाही. राजाभाऊ फड यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव घेण्याचे काहीच कारण नव्हते. आमचा खरा आरोप वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलावर आहे.” धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी संदेश चव्हाण यांची निवड झालीय. अशातच आता 15 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचा अध्यक्षपदावरही दावा केल्याने मोठा ट्वीस्ट निर्माण झालाय. शिंदे गटाच्या दाव्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे टेन्शन वाढलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विकी चव्हाण यांची निवड करण्यात आलीय. आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड झाल्याची माहिती समोर आलीय. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची राजकीय ताकद अधिक मजबूत झाल्याचं बोललं जातय. अशातच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदावरही शिवसेना दावा करणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगलीय. राज्यात उष्णतेची लाट नाही पण अस्मानी संकट महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्याचा जोर वाढला असून, बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान आहे. तर किनारी भागात उष्ण आणि दमट स्थिती कायम आहे, तर काही भागांत उष्णतेची लाट आहे. पुढील 2 दिवसांत पावसाची शक्यता कमी आहे, पण 13-14 मार्चपासून मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. आज कमाल तापमान 31-35 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. 12 मार्चला हवामान कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही. उष्णतेच्या लाटेची स्थिती काही ठिकाणी कायम राहू शकते. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज मुख्यत: उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमानाचा पारा 33 ते 38 अंशांपर्यंत जाईल. आज पावसाची शक्यता नसली तरी 13-14 मार्चला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. जळगावमध्ये केळी पीकविमा घोटाळा जळगावमधून केळी विमा घोटाळ्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावमध्ये केळी विम्यातून २५० कोटी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात केळी लागवड नसताना २७ हजार शेतकऱ्यांकडून विमान काढण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून सात दिवसांच्या आत खुलासा करावा लागणार आहे. केळी लागवड नसतानाही हजारो शेतकऱ्यांच्या नावावर विमा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. सुमारे 44 हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस लागवड दाखवत 250 कोटी रुपयांचा डल्ला मारण्याचा डाव असल्याचा कृषी विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्याने सरकारचे सुमारे 179 कोटी रुपये वाचले असून 37 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी 48 सीएससी केंद्रांवरून बोगस फॉर्म भरण्यात आल्याची ही समोर आले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त या सीएससी केंद्रांची पडताळणी करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या असून संबंधित शेतकऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून नोटीसा बजावण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत आपला खुलासा हा सादर करावा लागणार आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला Top 10 news: Farooq Abdullah Attack जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवानं या हल्ल्यात फारूक अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत. फारुख अब्दुल्ला जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित होते. लग्न समारंभ आटोपून जात असताना हल्लेखोर कमल सिंग जामवालने मागून फारुख अब्दुला यांच्या मानेवर बंदूक ठेवली. यादरम्यान, फारुख अब्दुला यांच्या सोबत असलेल्यांकडून हल्लेखोर कमल सिंग जामवालची धरपकड करण्यात आली.फारुख अब्दुल्लावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोराचे नाव कमल सिंग जामवाल आहे, तो जम्मूच्या पुरानी मंडी परिसरातील रहिवासी आहे.समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या चौकशीत, आरोपीने उघड केले आहे की तो 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्लाला मारण्याचा विचार करत होता. तो म्हणाला, मी 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्लाला मारू इच्छित होतो. हा माझा वैयक्तिक अजेंडा होता. भारताकडे येणाऱ्या कार्गो शिपवर हल्ला पश्चिम आशियात इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीत भारताकडे येणाऱ्या एका कार्गो जहाजावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थायलंडचे ‘मयुरी नारी’ हे कार्गो जहाज गुजरातमधील कांडला बंदराकडे येत असताना त्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवर भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, 11 मार्च रोजी होर्मुज सामुद्रधुनीत थायलंडच्या ‘मयुरी नारी’ या कार्गो जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. भारत सरकारनं या घटनेचा निषेध करत व्यापारी जहाजांना लक्ष्य करणं टाळलं पाहिजे, असं स्पष्ट केलं आहे. तसेच या युद्धामुळे निर्दोष नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचंही भारतानं म्हटलं आहे. इराण उद्ध्वस्त,आम्ही युद्ध जिंकलो- डोनाल्ड ट्रम्प गेल्या 13 दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून वारंवार हल्ले करण्यात येत आहे. तर इराणकडून पलटवार सुरु आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराणविरोधातील युद्ध जिंकल्याचा मोठा दावा केलाय. इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. अमेरिकेनं इराणविरुद्धचं युद्ध जिंकलंय, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. इराणचे सर्व महत्वाचे नेते मारल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच इराणच्या 58 जहाजांना समुद्राच्या बुडाला नेले, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इराणने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. तेलाच्या किमती प्रति बॅरल 200 डॉलर्सपर्यंत पोहोचतील याची तयारी ठेवावी, इराणने म्हटलं आहे. आम्ही अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांपर्यंत एक लिटरही तेल पोहोचू देणार नाही. त्यांच्याकडे जाणारे कोणतेही जहाज किंवा टँकर आमचे कायदेशीर लक्ष्य असेल, असा इशारा इराणने दिला आहे. बहुप्रतिक्षित आयपीएलचं वेळापत्रक जाहीर बहुप्रतिक्षित आयपीएल २०२६ चं वेळापत्रक अखेरीस बीसीसीआयाने जाहीर केलं आहे. टी-२० विश्वचषक २०२६ वर सर्व चाहत्यांच्या नजरा असतानाही आयपीएलच्या वेळापत्रकाची सर्वांना प्रतिक्षा होती. आयपीएल जणू क्रिकेटप्रेमींसाठीचा सण असतो. टी-२० विश्वचषक सुरू असताना आयपीएल २०२६ सुरू होण्याची तारीख समोर जाहीर करण्यात आली होती. आयपीएल २०२६ येत्या २८ मार्चपासून खेळवली जाणार आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, बीसीसीआयकडून उर्वरित वेळापत्रक जाहीर केलं जाईल. त्यामुळे आता आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक सध्या जाहीर केलं आहे. आयपीएल २०२६ यंदा शनिवारपासून सुरू होत आहे आणि शनिवार-रविवारी एक-एक सामना होईल डबल हेडर नसणार आहे. सध्याचे वेळापत्रक २८ मार्च ते १२ एप्रिल पर्यंत आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. पहिला सामना गतविजेत्या आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. हा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. पण चिन्नास्वामीच्या मैदानावर सामना होणार की नाही याचा निर्णय १३ मार्चल कमिटी घेणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना मुंबईत केकेआर विरुद्ध होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचा घटस्फोट सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिनं चार वर्षांपूर्वी बिझनेसमन सोहेल खतुरिया याच्याशी विवाह केला होता. त्यावेळी हंसिका आणि सोहेल यांच्या रॉयल विवाहसोहळ्याचीजोरदार चर्चा रंगली होती. मात्र, लग्नाच्या चारच वर्षांत दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्यानं परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून कोर्टाकडूनही दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्या घटस्फोटाच्या बातमीनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हंसिका आणि सोहेल खतुरिया हे आता अधिकृतपणे वेगळे झाले असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील वांद्रे इथे असलेल्या कौटुंबिक न्यायालयानं हंसिका आणि सोहेल यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. लग्नाला अवघा तीन वर्षांहून काहीसा अधिक काळ लोटला असतानाच, दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.