पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांना मोठा दिलासा Top 10 news: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्याने जमीन खरेदीशी त्यांचा थेट संबंध नाही, असा निष्कर्ष याप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विकास खरगे यांच्या समितीने काढला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना अभय मिळाल्याचे सांगितले जात आहे.या जमीन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाल्यामुळे पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानुसार, पदभार स्वीकारत कामाला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे, आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कधी होणार, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील नेत्यांनीही लागली आहे. त्यातच,आता सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि नाव ठरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख ठरली असून 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीचे ट्रोलर्संना सडेतोड उत्तर टिपू सुलतानची तुलना थेट शिवाजी महाराजांवर केल्याचे सांगत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजप नेत्यांकडून तीव्र शब्दात टीका केली जात आहे.आपल्या वडिलांवर होत असलेल्या टीकेला आता त्यांची लेक गार्गी सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. खरं तर माझ्या वडिलांचं मूळ वक्तव्य अतिशय स्पष्ट आणि संदर्भासह होतं. “शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केलं. महाराजांप्रमाणेच त्यांनी कुठल्याही विखारी, विषारी विचारांना थारा दिला नाही,” हा त्या वक्तव्याचा आशय होता, असे गार्गी यांनी म्हटले. तसेच, वडिलांचा वारकरी दिंडीतील फोटो शेअर करत गार्गी यांनी टीकाकारांना चोख शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यासोबतच गार्गी सपकाळ यांनी आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ एक भावनिक पोस्ट लिहिलीय. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की,”सत्य ओळखा आणि सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा, खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा.!”. दरम्यान, गार्गी सपकाळ यांची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्व स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. पायलट कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले? अजित पवार याच्या विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय उपस्थित करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा काही प्रश्न उपस्थित केलेत. ब्लॅक बॉक्सचं सत्य समोर येईल,पण अजितदादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते, याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या जनेते समोर आणा, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. पायलट साहिल मदन आणि यश, हे घरातून कधी निघाले? ते कोणत्या गाडीतून बाहेर पडले? कोणत्या रोडवरील ट्रॅफिकमध्ये अडकले? मृत्यूमुखी पडलेले सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरातून कधी निघाले? या सगळ्याचे सीटीटीव्ही जाहीर करावेत, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. सगळ्या पायलटांचा दिनक्रम आणि २८ जानेवारी रोजीचे सर्व सीटीटीव्ही फुटेज महाराष्ट्राला कळू द्यावेत, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. “अजितदादांचं पार्थिव समोर असतानाही विलीनीकरणाच्या चर्चा” महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्राला शोकसागरात टाकणारीच ही घटना होती. पुरोगामी महाराष्ट्रात दहावा आणि बारावा केला जातो, तो एक विचार आहेच. कारण हा विचार हिंदू धर्माच्या परंपरेतून चालत आला आहे. पण अनेकदा तीन दिवसांनंतरही अनेक कुटुंबांमध्ये हे विधी संपतात. शिवाय आम्हाला जे कुणी प्रश्न विचारत आहेत त्यांना हे सांगेन की अजितदादांचा मृतदेह अंत्यदर्शनाला ठेवला होता तेव्हापासून विलीनीकरणाची चर्चा सुरु करण्याची घाई का झाली? एक दोन नाही तर सात ते आठ नेत्यांनी मुलाखतींचा सपाटा लावला होता. दादांची अंतिम इच्छा आहे, या तारखेला विलीनीकरण होणार होतं वगैरे सांगितलं गेलं. जे विलिनीकरणाबाबत बोलत होते त्यांनी कधी हे म्हटलं का की आता उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं आता उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घ्यावीत. हे कुणाच्या मनात आलं का? विलिनीकरणाची चर्चा, दादांची अंतिम इच्छा वगैरे बोलत राहिले असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय. सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांवर नाराजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय.नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरिंग याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने 35 हजारांची लाच घेताना पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. साहजिक या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) प्रचंड बदनामी झाली होती. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना केल्याचं सांगण्यात येतंय. किल्ले रायगडावरील रोपवे बंद राहणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडवर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. किल्ले रायगडवर वयोवृद्ध तसेच शाळकर मुलांच्या सोयीसाठी असणारा रोपवे काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हा बंद ठेवण्यात येणार असून परिपत्रक काढून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलीय. रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रायगड रोप-वेची वार्षिक तांत्रिक देखभाल व आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. २३ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे काम करण्यात येणार आहेत. या कामांमुळे सदर कालावधीत रोप-वे सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. भारताकडून तीन इराणी तेल टँकर जप्त अमेरिकेने निर्बंध लादलेली इराणशी संबंधित तीन तेलवाहू जहाजे भारताकडून मुंबईच्या जवळ जप्त करण्यात आली आहेत. अवैध व्यापार रोखण्यासाठी भारताने केलेली ही कारवाई मोठी मानली जात आहे. पण, इराणी तेल कंपनीने या जहाजांशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलंय. ‘स्टेलर रुबी’, ‘अस्फाल्ट स्टार’आणि ‘अल जाफझिया’ अशी जप्त करण्यात आलेल्या तीन जहाजांची नावे आहेत. एका भारतीय अधिकाऱ्याने याबाबत ०६ फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया एक्सवरुन एक पोस्ट केली होती. ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली होती. दरम्यान, आता या कारवाईला अधिकृत दुजोरा मिळालाय. जहाजे ओळख बदलून बेकायदेशीरपणे सागरी हद्दीत घुसल्याची माहिती तपासातून समोर आलीय. भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात! वाणिज्य मंत्रालयातील संयुक्त सचिव आणि भारताचे मुख्य वाटाघाटीकार दर्पण जैन पुढील आठवड्यात अमेरिकेला भेट देणार आहेत. ७ फेब्रुवारी रोजी भारत आणि अमेरिका यांच्यात जारी झालेल्या संयुक्त निवेदनाच्या आधारे अंतरिम व्यापार करारासाठी कायदेशीर चौकट अंतिम करण्यासाठी ते जाणार आहेत, अशी माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिलीय. त्यासोबतच अमेरिका भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर लादण्यात येणारा २५ टक्के परस्पर कर १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची तयारी करत आहे. या आठवड्यात ही कपात अपेक्षित असल्याचं म्हटलं जातंय. बिग बॉस राखी सावंतवर भडकले ‘बिग बॉस मराठी 6’चा खेळ दिवसेंदिवस अधिक मजेशीर होत आहे. या भाऊच्या धक्क्यावर घरातील दोन सदस्य बाहेर गेले. अशात आता बिग बॉसचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच राखी सावंतला बिग बॉसने घराबाहेर काढलंय.बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बिग बॉस जेव्हा राखीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात. तेव्हा राखीसोबत घरातील इतर सदस्यांना देखील मोठा धक्का बसतो. राखी घराबाहेर जाताना खूप रडते. बिग बॉसला विनंती करते की, मला घरी राहू दे. मात्र बिग बॉस राखीला हाताला धरून बाहेर काढतात. या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. काही लोकांना राखीला घराबाहेर काढल्यामुळे आनंद झाला आहे. तर काहींना आता घरात ड्रामा पाहायला मिळणार नाही म्हणून दुःख होत आहे. आता खरंच बिग बॉसने राखीला घराबाहेर काढले की तिला अजून कोणती शिक्षा देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.