देशभरात शिवजयंतीचा उत्साह Top 10 news: देशभरात आज (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवजन्म स्थान किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.शिव जयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले शिवनेरीवरील शिव जन्मस्थळ व शिवकुंज इमारतीला आकर्षक अशा रंगी बेरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे.तर शिवजन्म स्थळाच्या आतील भागातही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही उपस्थित राहणार आहे. तर दुसरीकडे साताऱ्यात शिवजयंतीचा उत्साह दोन दिवस आधीपासूनच सर्वत्र पाहायला मिळत असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शेकडो मशालींनी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा उजळलाय. शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. अजिंक्यतारा किल्ल्याचे गड पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवजयंती सोहळ्यापूर्वी शिवनेरीवर मध्यरात्री चेंगराचेंगरी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त मोठा उत्साह सुरू आहे. मोठ्या संख्येने शिवभक्तांची शिवनेरी गडावर मध्यरात्रीपासूनच गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासूनच गडाचा परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि याचदरम्यान चेंगरीचेंगरीची घटना घडली आहे. किल्ल्यावरील अंबरखाना परिसरातील अरुंद दरवाजात शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत काही शिवभक्त जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील तो नकाशा एकतर्फी हटवला एनसीईआरटीच्या आठवीतील इतिहासाच्या पुस्तकात असललेला वर्ष 1759चा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीने एकतर्फी हटवला, दरम्यान ही कृती राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली केल्याचा आरोप नागपूरकर भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी केले आहे. पुस्तकातून हटवलेला तो नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्यात यावा, अशी मागणी ही त्यांनी केली आहे. ‘कटक ते अटक’पर्यंत मराठा साम्राज्य विस्तारलेला असताना, जर राजस्थानचा भाग मराठ्यांचे अधिपथ्यखाली नव्हता, तर मराठे महाराष्ट्रातून अटक पर्यंत पोहोचले कसे??? असा सवाल ही मुधोजीराजांनी या संपूर्ण वादा संदर्भात विचारला आहे. मराठा साम्राज्याचा खरा विस्तार दाखवणारा आणि मराठा साम्राज्य “कटक ते अटक” विस्तारलेला होता असा ऐतिहासिक तथ्य दर्शवणारा तो नकाशा पुस्तकातून हटवणे ऐतिहासिक तथ्याशी छेडछाड करण्यासारखे आहे. महाराष्ट् सरकार आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने हा मुद्दा उचलून धरत मराठा साम्राज्याचा वैभव नकाशाच्या स्वरूपात इतिहासातील पुस्तकात पुनर्प्रकाशित होईल, यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. दादांच्या प्रतिमेचा वापर करणे अत्यंत निषेधार्ह कृत्य Top 10 news: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन राष्ट्रवादीतील तणाव वाढत असून आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोपांतून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अजित पवारांचे विमान मुद्दाम पडल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, त्यांनी अजित पवारांचे ए आय व्हिडीओ बनवणाऱ्याचे कौतुक केले. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी याच विषयाला हात घातला आहे. आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील व प्रतिमेतील एआयद्वारे तयार केलेल्या बनावट चित्रफिती व ध्वनिफिती समाजमाध्यमे तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यक्ती स्वार्थी राजकीय व सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी आदरणीय दादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी वक्तव्ये पसरवत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. दादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अपार आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन जनतेमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. अशा प्रकारे दिवंगत नेत्याच्या प्रतिमेचा वापर करणे हे अत्यंत हीन आणि निषेधार्ह कृत्य आहे, असे म्हणत सुनिल तटकरे यांनी नाव न घेता रोहित पवार यांनाच लक्ष्य केलयं. आठवड्याभरात लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार पैसे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील. यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वितरित करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आता निधी वितरित करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. लाजकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून जवळपास ९८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीतून महिलांना आता हप्ता दिला जाणार आहे. येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक व आर्थिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी विभागांतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या टास्क फोर्सवर शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्य क्षेत्रात मागील दहा वर्षांपासून कार्यरत असलेले कृषी धोरणातील तज्ञ संशोधक, कृषी समाजशास्त्र डॉ. विनायक हेगाणा यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही राष्ट्रवादीचे दिवंगत नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन राष्ट्रवादीतील तणाव वाढत असून आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोपांतून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात आता अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी देखील या विमान अपघाताविषयी आपलं मत व्यक्त करत जनतेला सत्य समजले पाहिजे असे म्हटले आहे.त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालून,त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहारांबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. Miss You Dad असं म्हणत अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनीन पोस्ट केलीय. वधुवर उधळले ८.५ कोटी ;शाही लग्नाची चर्चा Top 10 news: सोशल मीडियावर सध्या एका पंजाबी लग्नाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवविवाहित जोडप्यावर अक्षरशः नोटांचा वर्षाव होताना दिसतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उधळण्यात आली, की संपूर्ण डान्स फ्लोअर नोटांनी झाकून गेला. या लग्नात सुमारे ८.५ कोटी रुपयांची रोकड उधळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.एका वृत्तानुसार, पाहुणे आणि कुटुंबीयांनी नवदांपत्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी नोटांचा वर्षाव केला. यावेळी नवऱ्यानेही आपल्या बायकोवर पैशांची उधळण केली. या भव्य सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांची उधळण झाल्याचा दावा असलेला हा व्हिडिओ विशेष चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये डीजेसमोर उभ्या असलेल्या वधूवरांवर सतत नोटांचा वर्षाव होताना दिसतो. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे फेकले गेले, की डान्स फ्लोअर पूर्णपणे नोटांनी भरून गेला. या अनोख्या आणि भव्य दृश्यामुळे अनेक जण थक्क झाले आहेत. महिलांवरील हिंसाचाराला कायदेशीर मान्यता अफगाणिस्तानातील महिलांची वरचेवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबानने एक नवीन कायदा लागू केला आहे जो महिलांवरील घरगुती हिंसाचाराला कायदेशीररित्या मान्यता देतो. या कायद्यानुसार, पती आपल्या पत्नी आणि मुलांना जोपर्यंत त्यामुळे हाडे तुटत नाहीत किंवा उघड्या जखमा होत नाहीत तो पर्यंत शारीरिक शिक्षा देऊ शकतो, याचा अर्थ असा की जर हाडे तुटलेली नाहीत तर मारहाण करणे चुकीचे नाही. वृत्तांनुसार, तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी या दंड संहितेवर स्वाक्षरी केली होती. हा कायदा एक नवीन व्यवस्था निर्माण करतो, ज्यामध्ये गुन्हेगार “स्वतंत्र” आहे की “गुलाम” तसेच तो कोणत्या वर्गातील आहे यावर आधारित शिक्षा दिली जाते. ‘हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी .. ‘ मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे आपल्या वक्तव्यावरुन कायम चर्चेत असतो. त्यानं अनेकदा विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे. तो सोशल मीडियावरही सक्रीय असतो. त्यानं अलिकडेच एका नेत्यावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्यानं एक पोस्ट शेअर करुन ‘आणि ही आपली लायकी…’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. आस्तादने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भाजप नेते मनोज तिवारी हे नोटबंदीविषयी बोलताना दिसत आहेत. तसेच लोकांना देशभक्तीचे नाव घेऊन मुर्खात कास काढलं याचे कथन करताना दिसत आहेत. त्यावर ‘हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी .. नोटबंदी नावाचा राष्ट्रीय पीआर स्टंट सपशेल फसलाच होता. त्यात हे लोक, घाबरुन रांगा लावून उभ्या असलेल्या नागरिकांबद्दल असे भाष्य करत होते….’, अशी पोस्ट आस्तादने शेअर केली. सध्या आस्ताद काळेची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतीय.