मंत्रालयात कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात लाचखोर अधिकाऱ्याला अटक Top 10 news: मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेवरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात झालेल्या लाचखोरीवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं म्हणत काँग्रेसने टीका केली आहे. या घटनेनंतर लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणीही काँग्रेसनं केलीय. राजेंद्र ढेरंगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करुन देण्यासाठी मागितली 50 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आलंय. दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता? अजित पवारांच्या विमान अपघाताला तब्बल 14 दिवस उलटून गेलेत. मात्र या अपघातामागे काही काळं-बेरं आहे का? असा सवाल राजकीय नेत्यांकडून वारंवार केला जातोय…अशातच विमानाच्या ब्लॅकबॉक्समधील माहिती अद्याप बाहेर आलेली नसतानाच या प्रकरणाला नवं वळण मिळालयं..काँग्रेस प्रवक्ते अतुल लोढेंनी दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता, असा दावा केलाय. ब्लॅक बॉक्स हा असा एक भाग आहे जो कोणत्याही परिस्थितीत अपघाताची कारणे शोधण्यास मदत करतो. त्यामुळे ब्लॅक बॉक्स बंद असणं हे तांत्रिकदृष्ट्या अशक्य मानले जातं. त्यामुळे अपघातामागे ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण पुढे येत असेल तर घातपात असल्याचं सिद्ध होईल, असा दावा रोहित पवारांनी केलाय. दरम्यान सॅटेलाईटद्वारे विमानाच्या लोकेशन आणि स्पीडबद्दल माहिती देणारे ट्रान्सपॉन्डर अपघाताच्या एक मिनट आधी बंद करण्यात आल्याचा दावा याआधीच रोहित पवारांनी केलाय. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांचे कान टोचले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षात मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलीय. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन पक्षात बांधणी केली जाणार आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यावरून एकनाथ शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच मंत्रीमंडळात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याचं सांगण्यात येतंय. निवडणुकीत मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो, का पडलो याची कारणमीमांसा करण्याच्या सूचनाही दिलेल्या असल्याची माहिती समोर येतीय. प्रफुल्ल पटेलांच्या फाईलमुळेच दादांना उशीर अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक वेगवेगळ्या घातपाताच्या शंका उपस्थित केल्या जात होत्या. आमदार रोहित पवार यांनी देखील हा घातपात असल्याचे अनेक पुरावे दाखवले. आता राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मोठे भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून टाकली आहे. अजित पवार यांच्या रस्त्याने बारामतीला जाण्याचा निर्णय झाला होता, सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब किंवा कुणाचा तरी त्यांना फोन आला होता की, साहेब माझे काम अडले आहे काहीतरी फाईल क्लिअर करायची आहे. त्यांनी लगेच फोन लावला आणि फाईल आणायला सांगितली. फाईल येण्यास साडेसात वाजले. त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की, त्या बॅगा परत काढा, उद्या सकाळी विमानाने जाणार असे सांगितले आणि त्या बॅगा परत गाडीतून काढायला लागल्या असा दावा प्रमोद हिंदूराव यांनी केला आहे. युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्को चे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला उभारण्यात आला असून आज मंत्री आशिष शेलार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन ही केले.सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी 11 जुलै 2025 रोजी, युनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. राज्यात हवामानात मोठा बदल राज्यात हिवाळा कमी झाला असून उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे.कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव वाढत आहे. भारत हवामान विभागाने आज कोकणात कमाल तापमानात वाढ होण्याचा आणि उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील विविध ठिकाणी नोंदवलेल्या तापमानानुसार, रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, जे कोकणातील उष्णतेचे प्रमाण दर्शवते. तर धुळे येथील कृषी महाविद्यालय, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि जेऊर येथे राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज असून, तरीही उकाड्यात वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यासाठी १०३२ कोटींचा आराखडा… Top 10 news: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निधनांनंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक घेतली. या बैठकीत पुढील आर्थिक वर्षासाठी (2026 -27) १०३२ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली. लहान तुकड्यांमध्ये कामे न करता मोठे प्रकल्प राबवण्यावर भर द्यावा अति मागासने दुर्गम भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून कामांची प्रशासकीय मान्यता निविदा प्रक्रिया आणि अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित करून काम करावे अशा सूचना पवार यांनी प्रशासनाला दिल्या. कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कर्जवसुली करणाऱ्या एजंटांच्या कामकाजात बदल करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. सर्वसाधारणपणे कर्जवसुली एजंट कर्जदारांसोबत गैरवर्तन करत असल्याचं दिसून येतं. मात्र, आरबीआयच्या नव्या नियमानुसार कर्जवसुली एजंटांवर मर्यादा येणार आहेत. कर्जदारांसोबत बोलताना एजंटांना मर्यादा पाळावी लागणार आहे, याशिवाय कॉल रेकॉर्डिंग करावी लागणार आहे. आरबीआयच्या कर्जवसुली प्रतिनिधींच्या नियुक्ती आणि कामकाजाचं नियमन करण्यासाठी नव्या नियमांचा मसुदा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार एजंटांना प्रशिक्षण देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय कर्जदारांना वसुलीसाठी करण्यात येणार्या फोनचं रेकॉर्डिंग करावं लागेल. वसुली एजंटांना कर्जदारासोबत सभ्यतेनं संवाद साधावा लागेल, असंही आरबीआयच्या मसुद्यात म्हटलं आहे. बांगलादेशमध्ये BNP चा मोठा विजय बांगलादेशमध्ये नुकताच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत बांगलादेशने निर्णायक जनादेश दिला आहे. या निवडणुकीमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या पक्षाने बहुमताचा दावा केला असून बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. तारिक रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. स्थानिक टीव्ही चॅनेल्सच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार आणि पक्षाच्या दाव्यानुसार, बीएनपीने बहुमत मिळवले आहे आणि या पक्षाने सरकार स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. बांगलादेशसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती कारण २०२४ च्या GEN Z नेतृत्वाखालील क्रांतीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांचे दीर्घकाळ चालणारे सरकार उलथवून टाकल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. ‘बॉर्डर २’नंतर सनी देओल ‘या’ आगामी चित्रपटांतून झळकणार अभिनेता सनी देओल सध्या ‘बॉर्डर २’मुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. अशातच आता सनी देओलने त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणा केली आहे.सनी देओलने येत्या काळात लवकरच त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार अभिनेता म्हणाला, “सध्या माझ्याकडे दोन चित्रपट आहेत. एक ‘लाहौर १९४७’ आणि दुसरा ‘गबरू.’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.” या चित्रपटांव्यतिरिक्त इतरही काही चित्रपट आहेत. सनी देओलकडे ‘इक्का’, ‘रामायण पार्ट १’ आणि ‘रामायण पार्ट २’ असे चित्रपट आहेत, त्यामुळे येत्या काळात अभिनेता विविध भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘रामायण’मध्ये तो हनुमाच्या भूमिकेतून झळकणार आहे.