Top 10 News : 1. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत युगेंद्र पवारांनी स्पष्ट केली भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मताधिक्याने विजयी होतील, याबाबत स्पष्ट आकडाच सांगितला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमोर कुठलाही स्ट्राँग उमेदवार नव्हता. येथील मतदारसंघात २ लाख २४ हजार मतदान झाले, त्यापैकी दोन लाख वीस हजार मतांनी सुनेत्रा काकी निवडून येतील आणि त्यांचा रेकॉर्ड होईल, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. पुढे राष्ट्रवादीतील विलीनीकरणाबाबत ते म्हणाले की, “विलीनीकरण व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती, आजही आहे. उद्या जर त्यांनी महायुती सोडली किंवा त्यांना सोडावे लागले, तर ते पुन्हा महाविकास आघाडीसोबत किंवा आपल्या पक्षासोबत येऊ शकतात. पूर्वी लोकांना वाटायचे की, काहीही झाले तरी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊच शकत नाहीत.पण, ते आले आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी सरकारही चालवले,”असेही युगेंद्र पवार यांनी सांगितले. 2. राज्यावर दुहेरी संकट कायम राज्यात आजही उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आज उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.5 मे पर्यंत मुंबईत उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. आज उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे. तर काही भागात पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याने यंदा तब्बल 70 टक्क्यांपर्यंत द्राक्षांचे उत्पादन घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. Top 10 News 3. बर्ड फ्ल्यूचा शिरकाव; पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूने शिरकाव केलाय, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी नवापूरमध्ये सहा पोल्ट्री फार्ममधील दीडशे ते दोनशे कोंबड्या अचानक मरण पावल्या होत्या. त्यामुळे पोल्ट्री फार्म मालकांनी थेट पशुसंवर्धन विभागात धाव घेतली. त्यानंतर प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी तपास करत संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळमधल्या वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर मिळालेल्या अहवालात नवापूर मध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं समोर आलं. आता 1 किलोमीटर परिसरात प्रशासनाकडून पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांची कलिंग प्रक्रिया सुरु केलीय. या प्रक्रियेत संसर्ग झालेल्या कोंबड्यांना सामुहिकरित्या नष्ट केलं जाणार आहे. दुसरीकडे बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह येताच जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलंय. याआधी 2010 ला राज्यात याचं फ्ल्यूमुळे लाखो कोंबड्यांची कत्तल करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे नवापूरमध्ये वारंवार होणाऱ्या बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडलेत. Raja Shivaji Movie : ‘राजा शिवाजी’ का पाहायला पाहिजे; जाणून घ्या पाच महत्वाची कारण 4. प्रतिभा चाकणकर यांना ईडीकडून समन्स नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातविरोधात अनेक महिलांनी तक्रारी दिल्या असून सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. खरातचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते अशीही माहिती समोर आली होती. खरातप्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिला प्रेदेशाध्यक्षपद आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचेही नाव या प्रकरणात समोर आले होते. Top 10 News राहाता येथील समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावाने असलेल्या चार खात्यांतून 2 कोटी 40 लाखांची उलाढाल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. या सर्व खात्यांना अशोक खरात हा नॉमिनी होता. आता तपासासाठी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावण्यात आलं असून, ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. HSC Result 2026 : आज निकाल जाहीर होणार ; कधी आणि कुठे पाहाल? असे डाउनलोड करा मार्कशीट, जाणून घ्या सविस्तर… 5. पुणेकरांसाठी गूड न्यूज! महापालिकेची ११ दवाखाने होणार हायटेक पुणे शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ११ दवाखान्यांचे अत्याधुनिक जनरल हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, या प्रकल्पासाठी ९० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या कमला नेहरू रुग्णालय हे एकमेव मोठे सर्वसाधारण रुग्णालय आहे. वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता इतर निवडक रुग्णालयांचेही उन्नतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत राजीव गांधी रुग्णालय (येरवडा), लायगुडे रुग्णालय (वडगाव), दळवी रुग्णालय (शिवाजीनगर) यांसह एकूण ११ केंद्रांची निवड झाली आहे. महापालिकेचा भवन आणि विद्युत विभाग लवकरच या ठिकाणांची संयुक्त पाहणी करणार आहे. यानंतर आधुनिक वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता यांबाबतचा सविस्तर आराखडा तयार केला जाईल. 6. पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान, निवडणूक आयोगाने राज्यातील १५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मगराहट पश्चिम आणि डायमंड हार्बर या दोन विधानसभा मतदारसंघांतील केंद्रांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे टप्पे पार पडत असतानाच, डायमंड हार्बर आणि मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः भाजपच्या वतीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षक सुब्रत गुप्ता यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या अहवालाच्या आधारे आता या १५ केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय झाला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ११ बूथवर आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील ४ बूथवर २ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत पुन्हा मतदान प्रक्रिया राबवले जाणार आहे. West Bengal Elections 7. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यावसायिक सिलिंडर पाठाेपाठ आता पेट्राेल आणि डिझेलच्या दरात ४ ते ५ रुपये आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरातही५० रुपयांनी वाढ हाेण्याचे संकेत मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि गेल्या चार वर्षांपासून देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या आठवड्यात प्रति बॅरल १२६ डॉलर या चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या होत्या. त्यात किंचित घसरण झाली असली, तरी दर अजूनही ११० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त आहेत. होर्मुझमधून होणाऱ्या तेलवाहतुकीवर परिणाम, तसेच इराण आणि अमेरिकेमधील तणाव यामुळे जागतिक तेलबाजारातील अनिश्चितता कायम आहे. यामुळे पुरवठा साखळीवर दबाव वाढल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. Top 10 News 8. ट्रम्प यांच्याकडून टीका होताच जॉर्जिया मेलोनी फेमस! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर टीका केली होती. ट्रम्प यांनी पोपबाबत केलेल्या त्यांच्या विधानाचा विरोध केल्याबद्दल मेलोनींच्या वक्तव्यांना त्यांनी ‘अस्वीकारार्ह’ म्हटलं. इराणकडे अण्वस्त्र असल्याचं सांगतानाच संधी मिळाल्यास तो दोन मिनिटांत इटलीचा नाश करू शकतो असंही म्हटलं. दुसरीकडे रशियाने देखील त्यांच्यावर अपमानास्पद टीका केली. परंतु मेलोनी यांच्यावर झालेल्या टीकेमुळे त्यांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे. त्यांचे राजकीय विरोधकही त्यांच्या समर्थनार्थ मैदानात आले आहेत. मेलोनी म्हणाल्या, त्यांचं सरकार कोणत्याही बाह्य दबावाखाली काम करत नाही, ना त्यांचा कोणी मालक आहे आणि ना आदेश देणारा कोणी…अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन माध्यमांच्या तीव्र टिप्पण्यांमुळे इटलीच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे पहिल्याच षटकात आऊट पण विक्रम मात्र नावावर; आयपीएलच्या १९ व्या हंगामात यशस्वीचा नवा कारनामा! 9. पहिल्याच चेंडूवर षटकार अन् जैस्वालने रचला इतिहास आयपीएलच्या १९ व्या हंगामातील ४३ वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाने २० षटकांत २२५ धावांचा मोठा डोंगर उभा केला. या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज मिचेल स्टार्क जेव्हा सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा यशस्वी जैस्वालने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक जोरदार फटका मारून चेंडू थेट सीमारेषेबाहेर पाठवला. या षटकारासह जैस्वाल आयपीएलच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, टी-२० फॉरमॅटमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर सर्वात जास्त वेळा षटकार मारण्याचा विक्रमही जैस्वालच्याच नावावर असून, त्याने तब्बल चौथ्यांदा हा पराक्रम केला आहे. या यादीत प्रियांश आर्या दोन वेळा डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून दुसऱ्या स्थानावर आहे. 10. रितेश देशमुखने सहकुटुंब घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन मराठी आणि बॉलिवूडचा रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. रितेश देशमुखने या चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही, तर त्याचे दिग्दर्शनही केले आहे. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हीसाठी लोक सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. यानंतर आता रितेश देशमुख सहकुटुंब ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आहे. या चित्रपटाच्या यशासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या आशीर्वादासाठी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली. दरम्यान, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात सलमान खानची एक छोटी भूमिका आहे. त्याने शिवाजी महाराजांचे संरक्षक जीवा महाला यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हा अभिनेता एका आकर्षक लूकमध्ये दिसला. पगडी आणि मिशांमध्ये तो एका वेगळ्याच लुकमध्ये पाहायला मिळायल. चित्रपटातील त्याची छोटी भूमिका केवळ काही मिनिटांची असली तरी, त्याने पटकन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. Top 10 News हेही वाचा: Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीच्या घरी आनंदाची बातमी; पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म