तितकीच तत्परता VSR संदर्भात का नाही?-अमोल मिटकरी Top 10 news: झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकीच तत्परता व्हिएसआर संदर्भात का दाखवली जात नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. या संदर्भात थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीए प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे. एक महिन्यानंतर हा अहवाल दिला, तीन आठवड्यानंतर ब्लॅक बॉक्स सापडला. सुमित कपूर संदर्भात डीजीसीए एक शब्द काढला नाही. या कारवाईने आम्ही समाधानी नाही, असेही अमोल मिटकरी म्हणालेत. तर डिजिसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. VSR व्हेंचअर्सच्या चार लिअरजेट विमानांच्या उड्डाणाला मनाई राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. VSR व्हेंचअर्सला मोठा दणका बसला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून चार लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं होतं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, लिअरजेट 40/45 या मॉडेलच्या चार विमानांना उड्डाण करण्यास मनाई करण्यात आलीय. या विमानांमध्ये उणीवा आढळल्यामुळं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय DGCA कडून घेण्यात आला आहे. यापूर्वी रोहित पवार.यांनी लिअरजेट विमानाच्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानांचे उत्पादन अमेरिकेत होते. ही विमाने अमेरिकेत अनेक वर्ष वापरली गेली होती. त्यानंतर ती भारतात आणली होती असे रोहित पवारा यांनी सांगितले होते. याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालातील कार्यालयात एसीबीने काही दिवसांपूर्वी छापा टाकत क्लर्कला लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. या घटनेमुळे मंत्री नगरहरी झिरवाळ यांच्यावर सध्या टीकेची झोड सुरू आहे तसंच त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. अशातच आता नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात नाशिकच्या एसीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं. या घटनेमुळे दिंडोरीमध्ये खळबळ उडाली. रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं. उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी त्यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत २५ हजार मान्य करण्यात आले. यापैकी १५ हजार रुपये स्वीकारताना सरपंच पत्नीसह पती अटक करण्यात आली. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने दिंडोरी तालुक्यात केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह केलं तर तुमची बस जागेवरच जाम होणार राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसलीय. विशेषतः समृद्धी महामार्ग आणि इतर मुख्य रस्त्यांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. महामार्गावरील अपघातांचे गांभीर्य लक्षात घेता, आता बसमध्ये ब्रेक ॲनालायझर ही आधुनिक यंत्रणा बसवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. ही यंत्रणा बसवल्यानंतर ड्रायव्हरनं दारू प्यायली असेल, तर ती बस सुरूच होऊ देणार नाही. या एका यंत्रणेची किंमत साधारण 1.5 लाख रुपये इतकी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन बस तसेच टाटा आणि अशोक लेलँड कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ही यंत्रणा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी बस मालकांनीही आपल्या गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवावी, असे स्पष्ट निर्देश मंत्र्यांनी दिलेत. भाजपापासून सावध राहण्याचा ठाकरेंचा सल्ला धूर्त भाजपापासून सावध आणि चाणाक्ष राहा तसेच स्थानिक पातळीवर पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे यांना दिला. भाजपाचे नेते खूप हुशार आणि चतुर आहेत, तेव्हा दटून राहा आणि टिकून राहा असेही ठाकरे यांनी म्हटले. चंद्रपूर महापालिकेत भाजपाची हातमिळवणी केल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नगरसेवक आज मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. काँग्रेस पेक्षा भाजपाने मानसन्मान राखत सव्वा वर्ष महापौर देण्याचे मान्य केल्यामुळेच चंद्रपूर महापालिकेत भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे संदिप गिऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना पटवून दिले. त्यावर लोकांच्या कामांसाठी सत्तेत जाण्याचा निर्णय योग्य असला तरी धूर्त भाजपापासून सावध आणि चाणाक्ष राहा. आवश्यक तिथे भाजपाचा विरोध करा, असा सल्ला ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आज भयंकर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ अपघाताची प्राथमिक शक्यता वर्तवली जात असल्याने वाहनांची प्रचंड रांग लागली आहे. ड्रायव्हर्स आणि प्रवासी यांना या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहने तासन्तास रस्त्यावर अडकून पडली असून, त्यामुळे संपूर्ण एक्सप्रेसवे वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे शेकडो प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे बिघडले आहे. काहींना महत्त्वाच्या बैठका किंवा कामांसाठी उशीर होत असल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही याच एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटल्याच्या घटनेने मुंबई दिशेच्या मार्गावर मोठी वाहन रांग लागली होती. त्या वेळी देखील प्रवाशांना प्रचंड असुविधा सहन करावी लागली होती. अशा वारंवार होणाऱ्या घटनांमुळे एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. लॉरेन्स बिश्नोई यांच्या वकिलाच्या गाडीवर गोळीबार Top 10 news: देशाच्या राजधानीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवारी रात्री दिल्लीतील काश्मिरी गेट परिसर गोळीबाराने दणाणून गेला. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या कायदेशीर पथकाशी संबंधित वकील दीपक खत्री यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी कारला लक्ष्य करून चार राउंड गोळीबार केल्याचे वृत्त आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आणि पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कारची मागील काच पूर्णपणे फुटल्याचे दिसून आले, ज्यामुळे हल्ल्याची तीव्रता स्पष्ट झाली. भारत आणि बांगलादेश दरम्यान पुन्हा बस धावली जवळजवळ १८ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, भारत आणि बांगलादेशमधील महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बस सेवा अधिकृतपणे पुन्हा सुरू झालीय. बस सेवेच्या पहिल्या दिवशी, मैत्री बस कोलकाताहून ढाकामार्गे निघाली आणि त्रिपुरातील अखौरा एकात्मिक चेक पोस्टवर आली. बसमध्ये १८ प्रवासी होते. त्रिपुराच्या वाहतूक आणि पर्यटन मंत्री सुशांत चौधरी यांनी अखौरा आयसीपीवर प्रवाशांचे स्वागत केले. माध्यमांशी बोलताना पर्यटन मंत्री सुशांत चौधरी म्हणाल्या की, हा मार्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे दोन्ही शेजारील देशांमधील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला नवीन चालना मिळेल. सुधारित सुरक्षा आणि सुरळीत संवादामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ‘हा अमेरिकेचा सुवर्णकाळ आहे…’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात त्यांचे २०२६ चे स्टेट ऑफ द युनियन भाषण दिले. जानेवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पहिले स्टेट ऑफ द युनियन होते. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या १३ महिन्यांतील कामगिरीची आठवण करून देत “अमेरिकेत कधीही न पाहिलेले बदल” झालेत. त्यांनी अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षा, ड्रग्ज नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भर दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणाची सुरुवात, “मी संकटात सापडलेल्या देशाची सूत्रे हाती घेतली. विक्रमी महागाई, युद्ध आणि जागतिक अराजकता होती. पण आज मी अभिमानाने म्हणू शकतो की आपण असा बदल घडवून आणला आहे जो यापूर्वी कोणीही पाहिला नाही आणि हा बदल युगानुयुगे घडून येणारा आहे.” त्यांनी सध्याचा अमेरिकेचा सुवर्णयुग असल्याचा दावा केला. थकीत मानधनावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं सोडलं मौन Top 10 news: अभिनेत्री विदिशा म्हसकरनं नुकतीच एक मुलाखत दिलीय. त्या मुलाखतीत बोलताना तिनं तिच्या बुडालेल्या मानधनाबाबत सांगितलं. तसेच, यावर काहीतरी नियम असायला पाहिजेत. ज्यामुळे आम्हा कलाकारांचे निदान काम केलेले हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत, असंही तिनं म्हटलंय. टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री विदिशा म्हसकर म्हणाली की, “हो, माझे सुद्धा पैसे अडकलेत. तेव्हा खूप जास्त वाईट वाटलं होतं. कारण, आता मी कमावतेय. पण, तेव्हा माझ्याकडे खरंच पैसे नसायचे. मला जे काही पैसे मिळायचे त्यामध्ये घरभाडं, खाणं-पिणं तसेच प्रवासासाठी पैसे लागायचे. अशा वेळी जेव्हा तुम्ही प्रायमरी स्टेजला आहात… तुमचं काम लोकांना आवडतंय… प्रशंसा होतेय… तरीही तुम्हाला तुमच्या 4-5 महिन्यांच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत… तेव्हा आपल्याला हक्काचे पैसे मिळवण्यासाठी झगडावं लागतं… हे खूप वाईट आहे…”असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्यात.