स्त्री बीज विक्रीचं राज्याबाहेर कनेक्शन Top 10 news: बदलापुरात स्त्री बीज बेकायदेशीर विक्री प्रकारणाचे कनेक्शन हे राज्याबाहेर असल्याचे तपासात समोर आले आहे. सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे यांना या प्रकरणात अटक करण्यात आलंय. यांच्या पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांकडून तिघींची कसून चौकशी करून त्यांचा कोणत्या डॉक्टर, हॉस्पिटल आणि IVF सेंटरसोबत कनेक्शन आहे हे समोर येणार आहे. शिवाय या टोळीने महिलांचे बनावट आधार कार्ड तयार करून एकाच महिलाचं वेगवेगळ नाव वापरून तिला अनेकदा डोनर बनवलं आहे. दरम्यान, या आरोपींनी आपल्या इतर टोळीच्या सदस्यांच्या मदतीने महिलांचे बनावट सत्यप्रतिज्ञा पत्र, आधार कार्ड, इतर बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही समोर आले आहे. तर आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो, महिलांचे खोटे आधारकार्ड तयार करून डोनर बनवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर ‘अवकाळी’ संकट नापिकी, कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळलं आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. कपाशी, ज्वारी, गहू, हरभरा, सोयाबीन, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही भागांत तर गारपीट झाली. यवतमाळमधील एका गावात वीज अंगावर कोसळून शेतकरी जखमी झाले आहेत. दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे असणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरीही खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता सरकारने थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाभार्थी महिलांना अनपेक्षित गिफ्ट मिळालं आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पार्थ पवारांचा मामेभाऊ दिग्विजय पाटीलला अटक होणार? Top 10 news: मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या दिग्विजय पाटीलने पुणे सत्र न्यायालयातील त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. दिग्विजय पाटीलने त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला केला होता. मात्र या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर नवीन मुद्यांच्या आधारे पुन्हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यासाठी दिग्विजय पाटीलने आधी केलेला अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. दिग्विजय पाटील हा पार्थ पवार यांचा मामेभाऊ आहे. दिग्विजय पाटीलकडून या प्रकरणात वेळकाढूपणा करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. दिग्विजय पाटीलने आधी केलेला अर्ज मागे घेतल्याने नियमानुसार पुणे पोलीस दिग्विजय पाटीलला अटक करु शकतात. मात्र, पार्थ पवार यांचा नातेवाईक असलेल्या दिग्विजय पाटीलला पुणे पोलीस अटक करणार की त्याला नव्याने अटकपूर्व अर्ज दाखल करण्याची संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा प्रकार सायंकाळी पाचच्या सुमारास एका दैनिकाच्या कार्यालयाबाहेर घडला. पवार यांना दामगुडे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत जिवंत राहायचे आहे ना, अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, दामगुडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. Hanumant Pawar एका दैनिकाच्या स्टुडिओमधील कार्यक्रमात पवार आणि दामगुडे सहभागी झाले होते. त्यानंतर प्रथम दामगुडे बाहेर पडले. त्यानंतर फोनवर बोलत पवार बाहेर येत असताना कार्यालयाबाहेर थांबलेल्या दामगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आवाज देऊन बोलावले. दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगितले जाते. पवार यांनी दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पवार यांच्या म्हणण्यानुसार, दामगुडे यांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. जुना मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी जुना मुंबई-पुणे महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पनवेलजवळील काळोखे गावाच्या हद्दीत एक भलामोठा कंटेनर रस्त्याच्या मधोमध अडकल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पहाटे साडेसहाच्या सुमारास हा मोठा कंटेनर येथील जोड रस्त्याच्या भागातून वळण घेत असताना म्हणजे रस्ता ओलांडताना या भल्या मोठ्या कंटेनरचा खालचा भाग रस्त्याला घासून अडकल्याने हा कंटेनर दोन्ही मार्गीकेच्या मधोमध अडकून पडला. परिणामी, पनवेलकडे जाणारी आणि पनवेलकडून पुण्याच्या दिशेला जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः थांबली. EPFO मध्ये मोठा बदल ; नोकरदारांना फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कामगार मंत्रालयाने पीएफशी संबंधित एक मोठा निर्णय घेतलाय. मंत्रालयाच्या नवीन योजनेअंतर्गत, बंद खात्यांमधील पैसे कोणत्याही कागदपत्रांशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ही नवीन योजना अशा इनऑपरेटिव किंवा निष्क्रिय खात्यांसाठी लागू असेल. यामध्ये जमा केलेली रक्कम १००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ती बँकेत जमा होणार आहे. कामगार मंत्रालयाच्या या मोठ्या निर्णयाचा थेट फायदा लाखो ईपीएफओ सदस्यांना होणार आहे. नोकरी बदलल्यानंतर लोक त्यांचे जुने खाते विसरून जातात. किंवा छोट्या रकमेसाठी गुंतागुंतीचे कार्यालयीन कागदपत्रांची पुर्तता करावी लागतात, त्यामुळे ते खात्यातील पैसे तसेच पडू देतात. या नवीन प्रणालीमुळे खातेधारकांना हे पैसे सहजपणे आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकतील. लवकरात लवकर इराण सोडा Top 10 news: अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आता 10 ते 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. या संघर्षामुळे मात्र इराणमधल्या भारतीयांचं टेंशन वाढलंय. तेहरानमधील भारतीय दूतावासानं भारतीयांना इराण सोडण्याचं आवाहन केलंय. इराणमध्ये सध्या जोरदार निदर्शनं सुरू आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित झालीय.त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून भारतीयांना काळजी घेण्याचं आवाहनदेखील केलंय. दिल्लीकडे जाणारे एअर अब्युलन्स कोसळून ७ ठार झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात झाला आहे. या विमानात चालक दलातील दोन सदस्यांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरात कोसळलं. या अपघातानंतर एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. Directorate General of Civil Aviation ने या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. 23 फेब्रुवारी रोजी रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे बीचक्राफ्ट C90 विमान रांची–दिल्ली मार्गावर एअर अँब्युलन्स उड्डाण करत होते. अजित पवारांच्या शोकसभेत नाना पाटेकर भावुक दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर काल मुंबईतील वारली डोम याठिकाणी शोकसभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शोकसभेला देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित आहेत. उद्योगपती आणि कलाकारांनीही हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. शोकसभेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहत ‘नमस्कार..माझा आणि दादांचा 50 वर्षांचा खूप मोठा सहवास आहे. खूप जास्त आठवणी आहेत’, असं नाना पाटेकर म्हणाले. ‘आज या ठिकाणी इतकी मंडळी जमली आहेत, शोकसभेच्या ठिकाणी जर दादांचा आज 75वा वाढदिवस साजरा करायला जमलो असतो, तर जास्त बरं वाटलं असतं’, असं म्हणत नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या तसबीरासमोर हात जोडले, तसेच व्यासपीठावरुन भावुक होऊन खाली उतरले.