संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळ्याचा आरोप Top 10 news: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. त्यात सामाजिक न्याय विभागातील अनियमितता आणि प्रशासकीय घोळांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय. विभागातील निधी वितरण, टेंडर प्रक्रिया आणि मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत गंभीर संशय व्यक्त करत त्यांनी या प्रकरणात तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. या पत्रात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव भरत कदम यांच्यावरही आरोप करण्यात आलेत. तसेच विभागात ओएसडी म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा संशयही अविनाश जाधव यांनी व्यक्त केलाय. या सर्व प्रकरणांमुळे सामाजिक न्याय विभागातील प्रशासन आणि निधी वितरण प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. राज्यात नियम तोडणाऱ्या रुग्णालयांना नोटीस शासनाच्या महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियमानुसार रुगणालयांना उपचारांचे दरपत्रक दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रुगण हक्क सनद लावणेही बंधनकारक आहे. मात्र रुग्णालयांकडून सर्रास हे नियमधाब्यावर बसविले जातात. याविरोधात सरकारच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत ४५३८ रुग्णालये दोषी आढळली असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यातील सहा रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. शुश्रुषागृह नोंदणी नियमांनुसार नियमांचे रुग्णालयांकडून पालन होते की नाही याबाबत श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे व दरपत्रकांमध्ये अनेक ठिकाणी दरभिन्नता असल्याचे दिसून आले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणली. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या उत्तरात ही माहिती समोर आलीय. पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींची आज निवड पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी आज मतदान होणार आहे. १३ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ९० जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे २८ सदस्य विजयी झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १२, शिवसेना (शिंदे गट)१०,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४ तर दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे या ठिकाणी सभापती व उपसभापती पदांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. मात्र जुन्नर, खेड, दौंड आणि भोर येथे चित्र तुलनेने रंगतदार आहे. जुन्नरमध्ये शिंदे गट आघाडीवर असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसही मजबूत स्थितीत आहे. भोरमध्ये राष्ट्रवादी व भाजपचे समसमान सदस्य असल्याने तेथे राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. राज्यात टी-२० विश्वचषकानंतर राडा न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत भारताने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकावर नाव कोरले. संजू सॅमसन, इशान किशन यांची वादळी फलंदाजी, जसप्रीत बुमराह-अक्षर पटेल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडचा पराभव केला. संजू सॅमसन याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर भेदक मारा करणाऱ्या बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारताच्या विजयानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत जल्लोष साजरा केला. पण याच जल्लोषात अनेक ठिकाणी गालबोट लागले. अकोला, सोलापूर आणि सांगलीमध्ये जल्लोष करताना राडा झाला. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अकोल्यातील जुने शहर भागात दोन समुदायात जोरदार राडा झालाय. यात दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यासोबतच सोलापूर सांगली याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आला. मात्र हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी चांगलाच समज दिला. लातूरमध्ये पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची आज निवड लातूर जिल्ह्यात दहा पंचायत समिती असून आज दुपारी या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यातील लातूर आणि जळकोट पंचायत समितीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याने या ठिकाणी काँग्रेसचा सभापती होणार आहे. तर औसा ,निलंगा आणि देवणी या पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाल्याने भाजपाचा सभापती होणार आहे. चाकूर उदगीर आणि अहमदपूरचे सूत्र हे राष्ट्रवादीकडे असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, मात्र रेनापुर आणि शिरूर आंतपाळ या ठिकाणी सर्वांचे लक्ष लागले आहे. रेनापुर पंचायत समितीवर मनसेचा सभापती निश्चित आहे मात्र मनसे आणि भाजप एकत्र येणार की, मनसे काँग्रेस सोबत सत्तेत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. भारतीय संघाचे पंतप्रधानांकडून कौतूक Top 10 news: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह अशा अनेक प्रमुख नेत्यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये, “चॅम्पियन्स!आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन! हा उल्लेखनीय विजय अफाट कौशल्य, दृढनिश्चय आणि सांघिक कामगिरीचे दाखवून देतो आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने विलक्षण धैर्य दाखवून दिले आहे. या विजयाने प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमान आणि आनंदाने भरून आले आहे. वेल डन, टीम इंडिया!” म्हटले आहे. ‘अमेरिकेचे ते प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत’ अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. अद्यापही हे युद्ध सुरू असून इराण अमेरिका-इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीबाबत आता अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता चीनने देखील मोठी भूमिका मांडली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणधील राजवट बदलण्याबाबत अनेकदा वक्तव्य केलेली आहेत. या अनुषंगाने आणि अमेरिका-इस्रायल व इराणमधील संघर्षाबाबत चीनने भूमिका मांडली आहे. अमेरिका-इस्रायलच्या सुरू असलेल्या हल्ल्यादरम्यान इराणमध्ये राजकीय बदल घडवून आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांविरुद्ध चीनने इशारा देत म्हटलं की, अमेरिकेच्या अशा प्रयत्नांना सार्वजनिक पाठिंबा मिळणार नाही, तसेच बाह्यरित्या चालविलेले राजवट बदल घडवून आणण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. तसेच अमेरिका-इस्रायल व इराणमधील हे युद्ध घडायलाच नको होतं”, असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. टीम इंडियाचा इतिहास रचत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब Top 10 news: टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला असून एकूण तिसऱ्यांदा ही प्रतिष्ठेची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत असा पराक्रम करणारा पहिलाच संघ ठरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. यासह पुन्हा एकदा क्रिकेटविश्वावर आपला दबदबा सिद्ध केला. भारताने यापूर्वी 2007 साली कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा हा किताब पटकावला. आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकत इतिहासात लिहिला. या विजयासह भारताने क्रिकेटच्या इतिहासात आता एकूण पाच विश्वचषकांची नोंद झाली आहे. त्यामध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे दोनआणि टी-20 विश्वचषकाचे तीन किताब समाविष्ट झाले आहेत. मी ही ट्रॉफी ३ दिग्गजांना समर्पित करतो -गंभीर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अजून एका आयसीसी ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं. हे जेतेपद पटकावत भारतीय संघाने अनेक विक्रम आपल्या नावावर करून घेतले आहेत. दरम्यान, यासर्वात गौतम गंभीरने संघाने जिंकलेली ट्रॉफी ३ भारतीय खेळाडूंना समर्पित केलीय. याविषयी बोलताना गौतम गंभीरने, “मी ही ट्रॉफी राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण व अजित आगरकर यांना समर्पित करतो. राहुल द्रविडला कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्याप्रकारे संघ घडवला आहे. लक्ष्मण यांना कारण त्यांनी पडद्यामागून भारतीय क्रिकेटसाठी जे अनकंडिशनल कष्ट घेतले आहेत. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स हे टीम इंडियासाठी पाईपलाईन राहिली आहे आणि अजित आगरकर कारण ज्या प्रामाणिकपणे त्यांनी आपलं काम केलं आहे. असे म्हटले. वेलकम 4 विषयी सुनील शेट्टीने दिली महत्वाची माहिती बॉक्स ऑफिसरवर हीट ठरलेल्या वेलकम सिनेमाने चाहत्यांच्या मनात घरं केलं, तुफान विनोदी कलाकृती ठरलेल्या चित्रपटावर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं. त्यामुळेच, वेलकमचा सिक्वलही प्रदर्शित झाला आणि तोही सुपरहीट ठरला. त्यानंतर आता वेलकमचा तिसरा भाग ‘वेलकम टू द जंगल’ प्रदर्शनासाठी तयार असतानाच अभिनेता सुनिल शेट्टीने वेलकम 4 बाबत माहिती दिलीय. वेलकम 4 चित्रपटाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, सुनील शेट्टीने ट्विट करुन म्हटले की, ‘अराजकतेच्या काळात, काही बातम्या फक्त योग्य वाटतात. ‘वेलकम’ सिनेमाच्या चाहत्यांचा आत्मा असलेले नाना, अनिल आणि परेश परत आले आहेत. त्यांच्याएवढा टोकाचा, प्रतिभासंपन्न वेडेपणा कोणीही करू शकत नाही. या सर्वांना योग्य जागेवर पाहून खूप आनंद होत आहे. वेलकम4.’, असे सुनिल शेट्टीने म्हटले. त्यामुळे, वेलकम 4 मध्येही हे त्रिकुट झळकणार असून चाहत्यांना पोट धरुन हसवणार असल्याचं म्हणता येईल.