आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन Top 10 news: आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होईल. तर 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान अजितदादांच्या विमान अपघात, मंत्रालयातील लाचखोरी, शेतकरी कर्जमाफी मुलुंड मेट्रोचा अपघात अशा मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, असाही अंदाज वर्तवला जातोय. अर्थसंकल्पिय अधिवेशनात १५ विधेयके मांडली जाणार आहेत. त्याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचविलेले मुद्दे व सूचनांचा समावेश होईल. राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर अजूनही आरोप – प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का? ‘लिट्टे’ने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच अजित पवार यांची हत्या झालीय का? असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी उपस्थित केला. जर कपूर यांची पत्नी सुमित कपूर जिवंत असल्याचे म्हणत असेल तर विमान अपघातात खरंच सुमित कपूरचा मृत्यू झाला का? अशी शंकाही अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवली. ते अकोला जिल्ह्यात आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होतेय. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठं गूढ असताना महाराष्ट्र इतका शांत कसा? असा सवालही त्यांनी केलाय. पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवत काँग्रेस-ठाकरे एकसाथ ? Top 10 news: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत असून याच अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या सात जागांचीही निवडणूक आहे. त्यातल्या सहा जागा तर महायुती जिंकणार हे निश्चित आहे. पण, मविआच्या वाट्याला जी एक जागा जाऊ शकते, त्या जागेवरुन जोरदार घमासान सुरू झाल्याचं दिसतंय. कधी ठाकरे, कधी काँग्रेस असं दिवसागणिक दावेदार बदलत आहेत. इतके दिवस ठाकरेंच्या शिवसेनेतही एकाच जागेवरुन दोन सूर होते, ते आता बदलताना दिसत आहेत. पवारांच्या खासदारकीवरही मविआत एकमत होताना दिसत नाही. एकूणच काय तर मविआतील घडणाऱ्या सगळ्या घडामोडींमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राज्यसभेच्या एका जागेवरुन मविआत जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि काँग्रेसकडून ‘प्लॅन बी’ची तयारी सुरू असल्याचीही चर्चा आहे. राज्यसभेसाठी ठाकरेंची थेट काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शरद पवारांना बाजूला सारत ठाकरे-काँग्रेसचा प्लॅन सुरू आहे की काय अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट राज्यावर आता अवकाळी पावसाचं संकट दिसून येतंय. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आलीय. नागपूर, गोंदिया आणि भंडारा परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. प्राथमिक माहितीनुसार, नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. यावेळी जोरदार वारेही वाहत होते. त्यामुळे काही भागांमध्ये झाडं उन्मळून पडली. तर नागपूरच्या मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडगाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर दुसरीकडे भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. भंडाऱ्यात पहाटे पाच वाजतापासून विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं चना, तुर, मुग, उडीद यासह कडधान्य आणि फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर, उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. शेवटी दुर्योधनाचा अंत झालाच, हे अहंकारी राज्यकर्त्यांनी विसरू नये आम्ही लोकशाही विकत घेऊन ठोकशाहीचे राज्य प्रस्थापित केले. मग आता विरोधी पक्षनेता हवाच कशाला? अशा अहंकारी मानसिकतेत हे सरकार वावरत आहे. सुईच्या अग्राएवढीही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार फडणवीस- मिंधेंच्या सरकारमध्ये दिसतोय. अर्थात शेवटी दुर्योधनाचा अंत झालाच, हे अहंकारी राज्यकर्त्यांनी विसरू नये. विरोधी पक्षनेत्यांशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. दरम्यान, आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. या अधिवेशनालाही विरोधी पक्षनेता नसणार आहे. याच मुद्यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. निवडणुका संपताच डोंबिवलीतील 65 इमारतींचा वाद पुन्हा पेटला निवडणुका संपताच कल्याण-डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली आयरेगाव येथील समर्थ कॉम्प्लेक्सला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांनी कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिलेले असतानाही नोटीस आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घरांचे कर्ज सुरू असताना, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना आणि डोक्यावर या कारवाईची टांगती तलवार असताना या कारवाईच्या नोटीसमुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा आक्रोश समर्थ कॉम्प्लेक्समधील महिलांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. ५ दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार ₹३०००? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिना संपून गेला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता फेब्रुवारी महिनादेखील संपत आला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झालीय. याचसोबत आता जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. फेब्रुवारी महिना संपायला अवघे ५ दिवस बाकी आहेत. तरीही महिलांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या ५ दिवसात महिलांच्या खात्यात कधीही पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.जानेवारीच्या हप्त्यासाठी आता सामाजिक न्याय खात्यातून निधी वितरित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय खात्याकडून जवळपास ९८ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. याच निधीतून महिलांना जानेवारीचा हप्ता दिला जाणार असल्याचे सांगण्यात येतंय. माजी रेल्वे मंंत्री मुकूल रॉय यांचं निधन देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि टीएमसी नेते मुकूल रॉय यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले मुकूल रॉय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी होते. मात्र २०१७ मध्ये त्यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपला राज्यात लोकसभेला जास्त जागा जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण चार वर्षातच त्यांनी पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. मुकूल रॉय यांना कोलकात्यात रुग्णालयात दाखल केलं होतं. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुकूल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय यांनी सांगितलं की, त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. वयोमानानुसार काही आजारांशी त्यांची झुंज सुरू होती.मात्र त्यांची झुंज अपयशी झाल्याचं सांगण्यात येतंय. नेपाळमध्ये बस नदीत कोसळून १८ जणांचा मृत्यू नेपाळमध्ये सोमवारी पहाटे भीषण बस अपघात झाला आहे. धाडिंग येथे झालेल्या १८ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी बस नदीत पडल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. सोमवारी पहाटे धाडिंगमधील त्रिशुली नदीत कोसळली, ज्यामुळे किमान १८ जणांचा मृत्यू झाला. बेनीघाट रोरांग ग्रामीण नगरपालिकेच्या वॉर्ड ३ मधील चरौंडीजवळील चिंधरा येथे १:१५ वाजता बस नदीत कोसळली.धाडिंग जिल्हा वाहतूक पोलिस कार्यालयाचे प्रमुख शिशिर थापा यांच्या माहितीनुसार, मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे. दरम्यान, महामार्ग बचाव व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार ठाकूर यांनी सांगितले की, २५ जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे; बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी होते. ‘VIROSH’ नं दिली प्रेमाची कबुली Top 10 news: Top 10 news: अखेर नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नाचे लग्न ठरले असल्याची चर्चा रंगली होती. रश्मिकाने स्वतः याविषयी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करून लग्न ठरले असल्याची गोड बातमी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रश्मिकाने दोघांच्या जोडीला VIROSH असे नाव दिले आहे. लग्न नेमकं कधी होणार याची तारीख रश्मिकाने पोस्टमध्ये सांगितलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न करणार असल्याची माहिती आहे. या जोडप्याने लग्नासाठी एक शाही राजवाडा निवडला असून, तिथे फक्त कुटुंबातील सदस्य आणि अगदी जवळचे मित्र उपस्थित असणार आहेत.