SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी Top 10 News: महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याची SIT कडून चौकशी केली जात आहे. खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधाचे पुरावे आणि इतर माहिती SIT कडून गोळा करण्याचे काम सुरू आहेत. खरातचे जबाब देखील नोंदवून घेतले जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे आज एसआयटीकडून खरातची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. आयपीएल तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटीकडून ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, या चौकशीदरम्यान अशोक खरातच्या ऑफिसमधील बॉय नीरज जाधव आणि खरात यांची सामोरा समोर चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान कॅप्टन खरात आणि नीरज जाधवमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महिला अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक शोषणप्रकरणी नीरज जाधव आणि कॅप्टन खरात यांची पहिल्यांदाच SIT कडून सामोरा समोर चौकशी करण्यात आली. अशोक खरातचे राजकीय संबंध, तसेच व्यावसायिक मालमत्ता यांची देखील चौकशी करण्यात येत आहे. रुपाली चाकणकरांचे महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार? अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर या भोंदूबाबाच्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र राजीनाम्यानंतरही चाकणकरांच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीत.आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांना अटक करण्याच्या मागणीनं जोर धरलाय. एका बाजूला अटकेची मागणी होत असताना दुसरीकडे ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंनी चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही हकालपट्टी करण्याची मागणी केलीय.तर चाकणकरांच्या राजीनाम्यासंदर्भात सुनेत्रा पवार निर्णय घेतील, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळांनी मांडलीय. विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला गुरु मानलं आणि त्याचे पाय धुतल्याने चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं. आता या प्रकरणी चाकणकरांच्या संपत्तीची चौकशी कऱण्याची मागणी अंधारेंनी केलीय. आता एसआयटीच्या प्रमुख तेजस्वीनी सातपुते या प्रकरणात सखोल चौकशी करण्यासाठी रुपाली चाकणकरांना ताब्यात घेणार का? आणि अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या हाती कोलित मिळू नये म्हणून चाकणकरांना अटक होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय भाजपच्या ज्येष्ठ नेत्या अलका केरकर यांचे निधन माजी उपमहापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. अलका केरकर यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्या वार्ड क्र. ९८ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. अलका केरकर या भाजपच्या अतिशय अनुभवी नगरसेविका होत्या. त्या सलग तीनवेळा मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकून आल्या होत्या. २०१२ पासून त्या मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. विशेष म्हणजे २०१४ ते २०१५ या काळात त्या मुंबई महापालिकेच्या उपमहापौर देखील होत्या. त्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत प्रशासकीय कामकाजांचा प्रदीर्घ अनुभव होता. अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा पोलिसांकडून एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अशोक खरात याचे अनेक बड्या राजकारण्यांशी लागेबांधे आहेत. हे संबंध समोर येऊ नयेत म्हणून अशोक खरात याला संपवले जाऊ शकते, अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली. त्या शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी तृप्ती देसाई यांनी केलेल्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत. अशोक खरात याचे अनेक मंत्री आणि राजकारण्यांशी संबंध आहेत. त्यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. हे संबंध कधी समोर येऊ नयेत, यासाठी अशोक खरात याला संपवण्याचा डाव असू शकतो.असं त्यांनी म्हटलंय. राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळीचे संकट Top 10 News: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून, मार्च महिन्यातील सामान्य उन्हाळ्याच्या तुलनेत काही भागांत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाला पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत राज्याच्या काही भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सोमवारपासून मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाने सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांत आज काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवर (मुंबई, ठाणे, रायगड) उष्ण आणि दमट हवामान कायम राहील, ज्यामुळे तेथील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागेल. 1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी सेंट्र्ल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स यांच्याकडून आयकर कायदा 2026 नोटिफाय करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2026 पासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्या आयकर कायद्यामुळं घरभाडे भत्ता, इतर भत्ते आणि कर यासंदर्भात बदल होणार आहेत. ओल्ड टॅक्स रिजीमनुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि बंगळुरु सारख्या काही शहरांना उच्च घरभाडे भत्ता सूट यामधये ठेवलं जाईल.या शहरात राहणारे व्यक्ती त्यांच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम घरभाडे भत्ता सूट म्हणून दावा करु शकतात. इतर शहरांमध्ये ही रक्कम 40 टक्क्यांपर्यंत क्लेम करता येईल. न्यू टॅक्स रिजीममध्ये घरभाडे भत्ता यावर सूट उपलब्ध नाही. नव्या नियमांनुसार मुलांच्या शिक्षणासाठीचा भत्ता 100 रुपयांवरुन वाढवून 3000 रुपये महिना करण्यात आला आहे. जो दोन मुलांपर्यंत लागू असेल. याशिवाय हॉस्टेल खर्च भत्ता 300रुपयांवरुन वाढवून 9000 रुपये महिना करण्यात आला आहे. त्यासोबत घरगुती सेवा आणि कराचे नियम,गिफ्ट व्हाऊचर,खाद्यपदार्थ ,कारचा वापर आणि कर याविषयी देखील नवीन नियम लागू होणार आहेत. नितीश कुमार यांचा याच आठवड्यात राजीनामा नितीश कुमार गेल्या आठवड्यात राज्यसभेवर खासदार झाले, त्यानंतर बिहारमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चा वाढल्या आहेत. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. बिहारमध्ये भाजप आपला मुख्यमंत्री नेमतील, असा अंदाज वर्तवला जातोय. ३० मार्च २०२६ हा दिवस बिहारमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा एकाचवेळी देणार नसल्याचे समोर आले आहे. नितीश कुमार दोन टप्प्यात राजीनामा देतील, असं म्हटलं जातंय. पण राज्यसभेवर गेलेले नितीश कुमार केंद्रीय राजकारणात सक्रीय झाले तर त्यांना दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागेल. नितीश कुमार आधी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देतील. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. नियमांनुसार, नितीश यांना एका ठराविक वेळेत विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे राज्यसभा सदस्यत्व सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येईल. ही अंतिम मुदत ३० मार्च असल्याचं म्हटलं जातंय. १० एप्रिलपर्यंत नितीश औपचारिकपणे राज्यसभा खासदार होतील. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळेल. “…तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका” पश्चिम-आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबाबत वादग्रस्त विधान केलंय. एका काल्पनिक परिस्थितीचा दाखला देताना बासित यांनी हे विधान केलंय. “जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य केले पाहिजे.” एका चर्चेदरम्यान बोलताना बासित यांनी ही गरळ ओकली. कल्पना करा, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर, पाकिस्तानने गप्प न बसता मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतीय शहरांवर बॉम्बफेक करावी, असं विधान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलंय. बासित यांच्या या विधानामुळे राजनैतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अमेरिकेच्या संभाव्य कारवाईचा बदला भारतावर काढण्याचे बासित यांचे विधान तर्कहीन मानले जातंय. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा विधानांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते. बासित यांनी थेट मुंबई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या महानगरांचा उल्लेख केल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. बासित हे यापूर्वीही त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत राहिले आहेत. मात्र, थेट युद्धाची आणि बॉम्बफेकीची भाषा केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्र केसरीचा आज रंगणार अंतिम थरार Top 10 News: राज्यातील कुस्तीप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज संध्याकाळी रंगणार आहे. या थरारक अंतिम लढतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्या पैलवानाला मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. संध्याकाळी पाच वाजता हा बहुप्रतिक्षित सामना सुरू होणार आहे. या स्पर्धेत माती आणि गादी या दोन्ही विभागांमध्ये दमदार कामगिरी करत अंतिम फेरीतील पैलवान निश्चित झाले आहेत. माती विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर गादी विभागात सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांनी प्रभावी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. रश्मिका अन् विजयने दुर केली चिमुकलीची नाराजी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे त्यांच्या पारंपारिक आणि भव्य लग्नासाठी चर्चेत आहे. दोघांचं लग्न झाल्यामुळे चाहते खूप आनंदात होते. मात्र, एका लहान चाहतीला लग्नाचं आमंत्रण मिळालं नव्हतं. तिला मिठाई न मिळाल्यामुळे ती छोटी फॅन प्रचंड नाराज झाली होती. पण रश्मिका आणि विजयने मिळून तिची नाराजी दूर केली. या लहान चाहतीने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर विजय आणि रश्मिकाने त्या मुलीला आपल्या घरी बोलावून घेतलं. तसेच तिला जेवण दिलं. लहान चाहतीचे लाड केले. या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी त्या लहान मुलीला हैदराबादमधील त्यांच्या घरी आमंत्रित करुन तिचे स्वागत केले. त्या लहान चाहतीने स्वत: विजय आणि रश्मिकाच्या घरी दिलेल्या भेटीचा, तसेच पाहुणचाराचा व्हिडिओ तिनं शेअर केला. ती चिमुकली चाहती विजयच्या घरी जाताना दिसत आहे. जिथे विजय तिला उचलून आत घेऊन जातो. नंतर, रश्मिका तिला लाडू खाऊ घालते. तसेच तिचा लाड करते. विजयही यात सामील होतो. तो आपल्या लहान चाहतीशी गप्पा मारताना दिसत आहे. तसेच तिला कडेवर घेऊन फिरताना दिसत आहे.