शरद पवारांना पराभूत करण्यासाठी शिंदेंचा प्लॅन तयार Top 10 news: राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, काल भाजपकडून 4 नावं जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवार गटाकडून पार्थ पवारयांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापही नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यानंतर आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवारांविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवारांसमोर एकनाथ शिंदे यांचे मोठे आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे शरद पवारांना पराभूत करण्याची योजना आखत आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची आवश्यकता आहे. महायुतीला एकूण 232 आमदारांचा पाठिंबा आहे. शिंदे गटाकडे 20 अतिरिक्त मते आहेत, तर अजित पवारांच्या गटाकडे 3 अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आज नेमके किती उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लवकरच जाहीर शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, असे विधान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत केले. कलम 260 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. चर्चेत सत्तारूढ व विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी महाराष्ट्राने 2025 ते 2029 या कालावधीसाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर केले असून असे धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आता नवा दावा समोर आलाय. पायलटची संशयास्पद भूमिका, DGCA चा प्राथमिक अहवाल, ब्लॅक बॉक्सचं सत्य यावरून एक ना अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या रोहित पवारांनी पुन्हा खळबळजनक दावा केलाय…दादांच्या विमान अपघातावरून सुरु असलेली गौप्यस्फोटांची मालिका आता थांबयचं नाव घेत नाही…अशातच दादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त करत सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी केलीय. याआधी एएआयबीच्या 22 पानी अहवालात विमान झाडाला धडकल्याचं नमुद करण्यात आलं होतं…त्यावेळी बारामतीतील स्थानिकांनी अपघातस्थळी कुठलंच मोठं झाड नसल्याचा खुलासा करत संशयाला वाट मोकळी करून दिली होती… अशातच चौथी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी बारामती विमानतळाच्या रेकीचा मुद्दा उपस्थित केल्यानं एकच खळबळ माजलीय…आधीच रोहित पवारांच्या पत्रकार परिषदांनी पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण केलाय. अशात या ‘रेकी’ प्रकरणाची चौकशी होणार का? विमानतळावर रेकी कोणी आणि का? याचं सत्य बाहेर येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलयं… लाडक्या बहिणांना मिळणार तब्बल १० लाखांचं कर्ज Top 10 news: महाराष्ट्र सरकार बचत गटातील महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देते. उमेदच्या माध्यमातून हे कर्ज दिले जाते. या आर्थिक वर्षात ३०० कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील अनेक योजनांमध्ये महिलांना स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. बचत गटाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना या आर्थिक वर्षात तब्बल ३०० कोटींचे कर्जवाटप होणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून पुढच्या महिन्यापर्यंत हे कर्ज दिले जाण्याचे उद्दिष्ट आहे. सोलापूरातील तब्बल २४ हजार २०० बचत गटांना हे कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये अडीच लाख महिला आहेत. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करुन दाखवण्याची इच्छा निर्माण होते. यामुळे रोजगाराची संधीदेखील निर्माण होते. जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत.याअंतर्गत सुरुवातीला ३० हजार ते १ लाख रुपयांचे कर्ज मिळायचे. आता ३ ते १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. बचत गट हे कर्ज वाटून घेतात आणि व्यवसाय सुरु करतात. या कर्जाची परतफेडदेखील केली जाते. जर कर्जाची नियमित परतफेड केली तर बँकांकडून व्याजदरात सवलत मिळते. शिवनेरी एसटी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार मुंबई- पुणे महामार्गावर अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित प्रवाशासाठी ‘शिवनेरी’ बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. आता मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शिवनेरी धावणार असून, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भापर्यंत शिवनेरीचा आरामदायी आणि वातानूकुलित प्रवास सुरू होणार आहे. पुणे-मुंबई-पुणे महामार्गाची राणी म्हणून ओळख मिळवलेली शिवनेरी बस स्वारगेट आणि पुणे स्टेशनवरून धावते. नोकरी, व्यावसायिकांसह पर्यटन आणि कामानिमित्त पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून या बसला अधिक पसंती आहे. त्यामुळे इतर बससेवेपेक्षा तिकीट दर थोडे अधिक असूनही ही सेवा नफ्यात असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. आता या शिवनेरीचा लाभ राज्यातील काही प्रमुख शहरांना मिळणार असून, त्यासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या येताच मुंबई-पुणे प्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये शिवनेरी सेवा सुरू होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर पण… अॅड. प्रकाश आंबेडकर यांना म्हाडाच्या बंगला योजनेतील घरासाठी पात्र आहे की नाही, यावर उच्च न्यायालयाने २५ मार्चपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. ही बाब वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बंगला वाटपाशी संबंधित असल्याने राजकीय व कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. अमरावती हाउसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डाच्या उमरी उमरखेड येथील योजनेत उच्च उत्पन्न गटातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांना घर वाटप करण्यात आले होते. मात्र, या वाटपाला याचिकाकर्ते विनायक कात्रे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकेत म्हाडाच्या नियम ९(१ए) चा हवाला देऊन आंबेडकर यांना बंगला मिळण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आंबेडकर यांच्या नावावर नगरपालिका क्षेत्रात मोकळा भूखंड उपलब्ध असल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर ३ आठवड्यात हे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले. आजीने नातवाच्या अंगावर उकळत पाणी टाकलं Top 10 news: नागपुरात होळीच्या दिवशी अतिशय भयंकर आणि संतापजनक घटना घडलीय. खेळताना अंगावर रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून एका आजीने आपल्या चार वर्षांच्या नातवावर उकळत पाणी टाकल्याची घटना उघडकीस आलीय. कोराडी परिसरातील ही घटना आहे. या अमानुष घटनेत चिमुरडा ओम गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेविरोधात परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे हा चार वर्षांचा मुलगा आपल्या घराबाहेर पिचकारीने खेळत होता. त्याच वेळी त्याची आजी सिंधू ठाकरे (आईची आई) होळीच्या लाकडावर गरम केलेले उकळते पाणी बादलीत भरून घरात नेत होत्या. खेळण्याच्या ओघात ओमने त्याच्या छोट्या पिचकारीने आजीच्या अंगावर थोडा रंग उडवला. या किरकोळ गोष्टीमुळे आजीचा संताप अनावर झाला. संतापाच्या भरात सिंधू ठाकरे यांनी विचार न करता हातातील उकळत्या पाण्याची संपूर्ण बादली चार वर्षांच्या ओमच्या अंगावर उपडी केली. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने प्रचंड ओरडू लागला. या घटनेत ओमचा कमरेखालील भाग पूर्णपणे भाजला गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने तपास सुरू केलाय. शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली डोंबिवलीची शोरमा गर्ल एकता सावंत हिने नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेने केलेल्या मदतीमुळे एकता सावंत हिचा शोरमाचा व्यवसाय पुन्हा सुरु झाला होत्या. त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानायला एकता सावंत नुकतीच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेली होती. राज ठाकरे यांना भेटल्यानंतर एकता सावंत हिने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पाया पडली. शोरमा गर्लने राज ठाकरे यांना भेट म्हणून एक घड्याळ आणले होते. घड्याळाची पिशवी तिने राज ठाकरे यांच्या हातात ठेवली तेव्हा त्यांनी यामध्ये काय आहे, असे एकता सावंतला विचारले. त्यावर तिने घड्याळ असे उत्तर दिले. तेव्हा राज ठाकरे यांनी ‘मला घड्याळ नको, तू मला मस्तपैकी शोरमा घेऊन ये’, असे सांगत हे घड्याळ एकता सावंतला परत दिले. यानंतर एकता सावंत हिने शर्मिला ठाकरे यांचीही भेट घेतली. शोरमा गर्ल नावाने इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असणाऱ्या एकता सावंत हिचे लाखो फॉलोअर्स आहेत. चीन सोडून एकही जहाज हॉर्मुझमधून जाऊ देणार नाही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवत जागतिक व्यापाराला मोठा धक्का दिला आहे. इराणने या भागातील व्यापारी जहाजांना इशारा देत तेलपुरवठा खंडित केला आहे. चीन सोडून एकाही देशाच्या जहाजाला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही असं इराणने स्पष्ट केलं आहे. तर कोणत्याही परिस्थितीत अमेरिका जगभरातील पुरवठा साखळी खंडित होऊ देणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना तात्काळ विमा संरक्षण देण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत. गरज भासल्यास अमेरिकन नौदल जहाजांना एस्कॉर्ट करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी जाहीर केले. इराणचे नेतृत्व जवळपास संपुष्टात – ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षाबद्दल माहिती दिलीय. यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेची युद्धातील कामगिरी ही अपेक्षेपेक्षाही चांगली सुरू असल्याचं म्हटल . इतकेच नाही तर त्यांनी अमेरिकेच्या कामगिरीला १० पैकी चक्क १५ रेटिंग दिले आहे. याबरोबरच इस्रायलबरोबर मिळून ही करावाई सुरूच ठेवली जाणार असल्याचा पुनरुच्चार केला व्हाईट हाऊसमध्ये टेक्नोलॉजी एक्झिक्युटीव्हजशी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र हे या संघर्षात वरचढ ठरत असल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी दावा केला की या संघर्षामध्ये इराणचे नेतृत्व संपवले जात आहे. “आम्ही सध्या अतिशय मजबूत स्थितीत आहोत आणि त्यांचे नेतृत्व वेगाने संपुष्टात येत आहे. नेतृत्व करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचा शेवट मृत्यूमध्ये होताना दिसून येत आहे,” असे ट्रम्प म्हणाले. इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा देखील वेगाने संपुष्टात येत असल्याचेही ट्रम्प म्हणाले.