Top 10 News : एकनाथ शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री होणार, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात आणि स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन…वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून जोरदार ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झालीय.

एकनाथ शिंदेचं पुन्हा मुख्यमंत्री होणार!
महायुतीत पुन्हा मुख्यमंत्रीपदावरून राजकीय ‘वॉर’
Top 10 News : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून जोरदार ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण भंडाऱ्याचे शिंदे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी थेट आणि अत्यंत आक्रमक विधान करत, “एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार,” असा निर्धार व्यक्त केलाय. भोंडेकर एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी महायुतीतील अंतर्गत धुसफूसही चव्हाट्यावर आणली आहे.”आम्ही आधी एकटे भांडत होतो, अनेक नेते मॅनेज झाले होते. पण आता दोन नाही तर, आम्ही 11 झालो आहोत,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर निशाणा साधलाय.
छगन भुजबळांचा पत्ता कट
राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळलं आहे. भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात;
लक्झरी बसचा चेंदामेंदा
समृद्धी महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला. मेहकरजवळ खासगी प्रवासी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यांपैकी ११ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की, खासगी बसचा चेंदामेंदा झाला आणि अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडले. जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. पुण्याहून नागपूरकडे जाणारी ‘बाबा ट्रॅव्हल्स’ची लक्झरी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघातातील गंभीर जखमी झालेल्या ११ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (किंवा पुढील केंद्रात) संदर्भित (रेफर) करण्यात आले आहे.
तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का?
आमदार बच्चू कडूंचा सवाल
राज्यात सरकार कोणाचेही असो, ते आपले असो की परके, आम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, कारण शिवसेनेचा डीएनए हा आंदोलनाचा आहे,असा आक्रमक इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. शिवसेना-प्रहार कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नेते आश्वासन देऊन पाठ दाखवणार असतील, तर पाठीवर दणका कसा द्यायचा हे आम्हाला ठाऊक असल्याचे बच्चू कडू म्हणाले. तसेच “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे असतानाही आज विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असं म्हणत विदर्भातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं.
मान्सूनचा प्रवास रखडला,
पण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला, पण त्यानंतर त्याचा प्रवास रखडला आहे. मान्सून अरबी समुद्रातून अद्याप पुढे सरकलेला नाही. १५ जूननंतर मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज वर्तवला जातोय. २ दिवसांपासून मान्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल जैसे थेच आहे. मान्सूनचा प्रवास रखडला असता तरी राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. कोकणात आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत आज जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय.
मोदी सरकारमध्ये मोठा उलटफेर;
केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार Top 10 News :
अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होत आहे, आता या विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचं ‘रिपोर्ट कार्ड’ तपासण्यात आले आहे. त्यावरून याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. आगामी वर्षातील उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.या मंत्रिमंडळात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील बड्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परीक्षेच्या काही मिनिटांआधी MSc नर्सिंगची परीक्षा रद्द
देशात NEET परीक्षेचा मुद्दा गाजत आहे. नीट पेपरफुटीवरून शनिवारी कॉकरोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोलन केलं आहे. या नीट पेपर फुटीप्रकरणानंतर जम्मू-काश्मीरमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये MSC नर्सिंगची परीक्षा सुरू होण्याआधी काही मिनिटांपूर्वी रद्द करण्यात आली. प्रश्न पत्रिकेत चुका झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.एमएससी नर्सिंग हा पोस्टग्रॅज्युएट कोर्स आहे. हा कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. जम्मू आणि काश्मीरमध्ये ही परीक्षा जम्मू आणि काश्मीर व्यावसायिक प्रवेश परीक्षा मंडळाकडून घेतली जाते. त्याच मंडळाने ही परीक्षा आयोजित केली होती.मात्र ही परीक्षा अचानक रद्द करण्यात आली.
आता संपत्तीचा संघर्ष ;
इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण इराणच्या गोठवलेल्या संपत्तीचा वापर कुवेत आणि इतर आखाती देशातत युद्धामुळं झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी वापरण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे. इराणकडून कुवेत आणि बहरीनवर ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आल्यानं अमेरिकेकडून यावर गांभीर्यानं विचार केला जातोय. रॉयटर्सच्या वृत्तानुसार अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका विशेष टीमला इराणकडून आखाती देशात हल्ले झाल्यानं जे नुकसान झालंय त्याचा अभ्यास करण्यास सांगितलंय. या टीमकडून आखाती देशातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी इराणच्या संसाधनांचा वापर करण्याबाबत अभ्यास केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता आखातात संपत्तीचा संघर्ष सुरु होणार का ? असा सवाल निर्माण झालाय.
सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती?
बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवले. सूर्यकुमार यादवला टी-२० संघातूनही वगळण्यात आले, त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्णधार पदावरून सूर्यकुमार यादवला हटवण्यात आल्यानंतर त्याने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. सूर्यकुमार यादवच्या निवृत्तीची घोषणा करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमुळे चाहते भावुक झाले आणि त्यांनी सूर्याचे आभार मानण्यास सुरुवात केली. मात्र, थोड्याच वेळात या पोस्टमागील सत्य समोर आले. ती पोस्ट सूर्यकुमारच्या अधिकृत अकाउंटवरून नव्हे, तर एका फेक (बनावट) अकाउंटवरून करण्यात आली होती.त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा स्वास सोडला.
स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन!
देऊळ बंद २’चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व Top 10 News :
सध्या स्वामी भक्तांची गर्दी सध्या थिएटरमध्ये पाहायला मिळतीय. तिसऱ्या रविवारी देखील ‘देऊळ बंद 2’ चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. आज चित्रपट रिलीज होऊन 18 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही सिनेमा पाहायला प्रेक्षक गर्दी करत आहे. १८ व्या दिवशी प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाने १,१४९ शोमधून ३.१५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ७०.२८ कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई ५९.७५ कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपटाने तिसऱ्या रविवारी देखील बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट अशीच कमाई करत राहिला तर लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल असं म्हटलं जातंय. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ चित्रपट २१ मे ला रिलीज झाला आहे.तेंव्हापासून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होतीय.



