पोलिसांनी खरातची ‘दैवी’ शक्ती उतरवली Top 10 News: माझ्याकडे अलौलिक शक्ती आहे आणि मी देवाचा अवतार आहे, असे सांगून अनेक स्त्रियांचे लैंगिक शोषण करणारा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला. गेल्या दोन दिवसांपासून विशेष तपास पथकाकडून अशोक खरात याची चौकशी सुरु होती. काल त्याला पुन्हा नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या हवाली करण्यात आले. यानंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना कॅप्टन अशोक खरातची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. अनेक बडे नेते आणि उद्योगपतींना शक्तीवर्धक गोळ्यांचे सिरप वाटणाऱ्या अशोक खरातला काल स्वत:च्या पायांनी चालण्याची ताकदही उरली नव्हती. अशोक खरात दोन पोलिसांच्या साहाय्याने कसाबसा चालत नाशिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर पडला. यावेळी दोन पोलिसांनी त्याला धरले होते. अशोक खरात लंगडत आणि कण्हत चालत होता. स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात याला अक्षरश: पाय ओढत आणि इतक्या गलितगात्र अवस्थेत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी या अवस्थेत अशोक खरातची साग्रसंगीत वरात काढली. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी अशोक खरातची ही अवस्था व्यवस्थितपणे टिपली. ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या डाव उधळला ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतरही राज्यातील राजकीय घडामोडी घटना घडताना दिसून येताय. काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे नाराज खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या चर्चेनंतर नाराज खासदारांची संजय राऊत यांच्या घरी बैठक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी रविवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांनी नाराजी दूर करत डॅमेज कंट्रोल केल्याच सांगितलं जातंय.दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच ही बैठक झाली. या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. या बैठकीत ठाकरेंनी खासादारांची समजूत काढून सत्ताधाऱ्यांच्या डाव उधळल्याचंही म्हटलं जातंय.उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नसल्याची तक्रार होती. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदत मिळाली नाही. पक्ष नेतृत्वाने प्रचार केला नाही. आदित्य ठाकरे फारसे महाराष्ट्रात फिरले नाही, अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी वाचला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदारांनी समजूत काढली. ठाकरेंनी समजूत काढल्याने डॅमेज कंट्रोल यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. अजितदादांच्या घराजवळ अशीच अघोरी पूजा झाली नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात गाजत असून विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही याच प्रकरणावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. आता, याप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन तर नाही ना, म्हणत प्रश्न उपस्थित केलेत. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहितीही मिटकरी यांनी दिली. अशोक खरातच कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणार आहे, आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहित झालं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही. व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत या भोंदूबाबाचे संबंध असू शकतात. कारण, या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे असून सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्याचा झालेला प्रकार सर्वात अघोरी असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.आता त्यांच्या अशा वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झालाय. नकली साप अन् वाघाची भीती Top 10 News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. खरात नकली साप आणि वाघ ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा. रिमोट कंट्रोलने सापाच्या आणि वाघाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करत होता. संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली त्याने भाविकांकडून पैसे उकळण्याचा पॅटर्न तयार केला होता. बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून महागडे खडे म्हणून विक्री त्याचे तो विक्री करायचा. भोंदूबाबा अशोक खरात १०० रुपयांच्या वस्तूला भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार १० हजार ते १ लाखांपर्यंत विक्री करत गंडवायचा. नकली खडे आणि रत्ने दैवी असल्याचा दावा करत त्याची तो विक्री करायचा. भाबड्या भाविकांना लक्ष्य करत आतापर्यंत त्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे. यासंदर्भात खरातविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत यातूनच अंधश्रद्धेच्या आड त्याने चाललेल्या मोठं रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा ‘महाराष्ट्र केसरी’ पुण्यातील वाघोली, तालुका हवेली इथं पार पडलेल्या यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात सामना झाला. अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडला 4-2 असे पराभूत केलं. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी ठरला. पहिल्या डावात दोघांची 1-1 अशी बरोबरी झाली होती. यंदाच्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर विजयी झाला असून तो डबल महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. विशेष म्हणजे, 7 वा डबल महाराष्ट्र केसरी किताब हर्षवर्धन सदगीरने आपल्या नावावर केला आहे. महाराष्ट्र केसरीच्या किताबासह हर्षवर्धन सदगीरने मानाच्या गदासह फॉर्च्यूनर कारही जिंकली आहे. त्यामुळे, फॉर्च्यूनर कार जिंकणारा पहिला महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ठरला. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड ठरला असून महेंद्र गायकवाड यांस चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ कार बक्षीस स्वरुपात मिळाली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवानांवर बक्षीसांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन सदगीरला महाराष्ट्र केसरीची गदा, फॉर्च्यूनर कार आणि 5 लाख रुपयांचा धनादेश अशी बक्षिसांची मोठी रक्कम मिळाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात महत्वाचा बदल करण्याचे सरकारने ठरवले आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र, आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे. सिलेंडर तोच राहणार आहे. मात्र, त्यामध्ये गॅस आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आलेत. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार आहेत. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भरुन तयार असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्यात येणार आहेत. यापुढे गॅस सिलेंडर कमी वजनाचे असल्याने ते साहजिकच कमी दिवस पुरणार आहेत. त्यामुळे सामान्य घरातील दैनंदिन गणित बिघडणार आहे. यावर सामान्य नागरिक कशाप्रकारे व्यक्त होणार, हे बघावे लागेल. याशिवाय, कमी वजनाच्या या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किती असणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा आहेत. वजन वाढलं तर थेट पगार कापणार भारतातल्या मुख्य विमान कंपन्यांपैकी Air India कंपनीने त्यांच्या केबिन क्रूसाठी नवीन हेल्थ आणि फिटनेस पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांचा परिणाम थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि ड्युटी रोस्टरवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. मेपासून लागू होणाऱ्या या पॉलिसीनुसार केबिन क्रूचा बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि त्यांची एकूण फिटनेस तपासला जाणार आहे. कंपनीने 18 ते 24.9 या BMI ला सामान्य आणि योग्य श्रेणी मानले आहे. 18 पेक्षा कमी BMI असलेले कर्मचारी अंडरवेट समजले जातील अशी माहिती समोर आली आहे. पण त्यांनी मेडिकल तपासणी आणि फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर त्यांना काम सुरू ठेवता येईल. या पॉलिसीनुसार, ज्यांचं वजन ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त किंवा कमी असेल, त्यांना काही काळासाठी ड्युटीवरून लांब ठेवलं जाईल. त्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. जर त्यांनी ही चाचणी पास केली नाही, तर त्यांचा पगारही थांबवला जाऊ शकतो. विशेषतः स्थूल श्रेणीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. पर्यटकांचा अतिउत्साह, फॉर्च्यूनर समुद्रात अडकली Top 10 News: गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहने नेण्यास सक्त मनाई असतानाही, काही पर्यटक नियमांना हरताळ फासताना दिसत आहेत. उत्साहाच्या भरात वाहने समुद्रकिनारी नेतात.गोव्यातील वागातोर किनाऱ्यावर फिरायला आलेल्या पर्यटकांनी आपली कार थेट समुद्राच्या लाटांजवळ नेण्याचा प्रयत्न केला. फॉर्च्यूनर चालकास अंदाज न आल्याने कार समुद्रात फसली. समुद्राचा अंदाज न आल्याने या पर्यटकांची कार वाळूत पूर्णपणे रुतली. मौजमजा करण्याच्या नादात पर्यटकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार न केल्याने ही परिस्थिती ओढवली. कार वाळूत अडकल्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी बाहेर काढता येईना, त्यामुळे कारमालक पर्यटकांची तारांबळ उडाली.पर्यटकांनी स्थानिक प्रशासनाची किंवा क्रेनची मदत घेण्याऐवजी स्वतःच प्रयत्न सुरू केले. त्यांनी तिथे असलेल्या दुसऱ्या एका कारला दोरी बांधून अडकलेली कार बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही कार बाहेर येईना.अखेर पर्यटकांनी स्थानिकांच्या मदतीने जेसीबीला बोलावून कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जेसीबीच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. “आम्ही इराणची क्षमता नष्ट केली” मध्य पूर्वेतील तणाव चांगलाच वाढलाय. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद आता उघडपणे समोर येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, जर ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करेल. याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने एक तीव्र निवेदन जारी केले आहे की, हल्ला झाल्यास होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल. दरम्यान, या सगळ्यात अमेरिकेचे अर्थसचिव स्कॉट बेसेंट यांनी, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणची तटबंदी कमकुवत करण्यासाठी अमेरिकन लष्करी दलांचा वापर केला जातोय असं म्हटलंय. तसंच, “जोपर्यंत इराणची तटबंदी पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरू राहील.”असं बेसेंट म्हणाले. युद्धातील घटना चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्या माध्यमांच्या वृत्तांकनावरही त्यांनी आक्षेप घेतला. बेसेंट म्हणाले की, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या कृती जनतेपर्यंत अचूकपणे पोहोचवल्या जात नसल्याचा आरोप देखील केला. ‘धुरंधर 2’, पायरेटेड साईट्सवर HD मध्ये लीक ‘धुरंधर 2’ सिनेमाच्या रिलीजपूर्वीच त्याला मिळालेल्या प्रतिसादानं सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त याच चित्रपटाची चर्चा रंगलीय. पण, या आनंदात विरझण पडलंय ते पायरसीचं. रिलीज होताच ‘धुरंधर 2’ची HD प्रिंट लीक झालीय. थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच, या सिनेमाची HD प्रिंट इंटरनेटवरील अनेक बेकायदेशीर वेबसाईट्सवर लीक झाली. काही जणांनी बेकायदेशीर वेबसाईट्सवरुन ‘धुरंधर 2’ डाऊनलोड करुन पाहिलाच, पण इतरांनाही फुकटात सिनेमा पाहण्याचं आवाहन करायला सुरुवात केली. ही बाब सिनेमाच्या निर्मांत्यांसाठी जेवढी धोकादायक होती, तेवढीच धक्कादायकही होती. त्यामुळे तुमच्यापर्यंतही अशा काही लिंक आल्या असतील आणि तुम्ही सिनेमा डाऊनलोड करुन पाहण्याचा विचार करत असाल तर, वेळीच सावध व्हा, असं केल्यानं तुम्हाला तीन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.