Top 10 News : “मी रिटायर होणार नाही, मी चांगली खमकी”, मराठी शिकण्याची अंतिम मुदत संपली आणि ‘देवखेळ २’ सीरिजची घोषणा, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या रिटायरमेंटवरील वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

मी रिटायर होणार नाही, मी चांगली खमकी’
पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
Top 10 News : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या रिटायरमेंटवरील वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बीड-परळी महामार्गावरून प्रवास करताना तोच रस्ता आणि तीच माणसं पाहून रिटायरमेंट घ्यावीशी वाटते, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता केजमधील कार्यक्रमात त्यांनी या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं. ‘ताई रिटायर होणार’ अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र मी रिटायर होणार नाही, मी चांगली खमकी आहे, असं त्या म्हणाल्या. पुढे ‘दोन-चार लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं’ असं सूचक विधान त्यांनी केलं. त्यामुळे या ‘दोन-चार लोकांचा’ रोख नेमका कुणाकडे, याची चर्चा सुरू झाली आहे.
…तर मुलाला स्वतः पोलिसांकडे घेऊन जाईन
बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया
विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या मुलाचा आरोपींच्या सीडीआरमध्ये कुठेही संबंध आढळल्यास त्याला स्वतः पोलीस ठाण्यात आणून सोडू, असं सोनवणे म्हणाले. तसेच काही आरोपी सत्ता असतानाही पळत होते, मात्र आम्ही गुन्हेगार नसल्याने उजळ माथ्याने फिरतोय, असा दावा त्यांनी केला. केज तालुक्यात २० जून रोजी विलास घुले यांची हत्या झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मराठी शिकण्याची अंतिम मुदत संपली;
रिक्षावाल्यांचं लायसन्स जाणार?
महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सक्तीच्या मराठी प्रशिक्षण आणि परीक्षेची अंतिम मुदत आता संपली आहे. या मोहिमेसाठी एक लाख ७० हजार अर्ज आले होते. त्यापैकी एक लाख ४० हजार चालक उत्तीर्ण झाले, तर सात हजार ७५० चालक नापास झाले आहेत. तर १७ हजार ४२७ चालक प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. नापास चालकांना पुन्हा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मात्र मराठी न शिकणाऱ्या किंवा परवाना अटींचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर आरटीओकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. कारवाईनंतर तीन महिन्यांत मराठी न शिकल्यास परवाना आणि परमिट रद्द होण्याचीही शक्यता आहे.
एक वर्षानंतरही हसनाळ ‘बेघर’;
सरकारची आश्वासनं कुठे?
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावाला १८ ऑगस्ट २०२५ रोजी आलेल्या लेंडी नदीच्या महापुराला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं आणि पाच जणांचा मृत्यू झाला. सुमारे ७०० ते ८०० ग्रामस्थांनी डोंगरावर जाऊन जीव वाचवला. पुरात घरे, गुरेढोरे आणि संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं. वर्षभरानंतरही गावाचं पुनर्वसन झालेलं नसून बाधित नागरिक टीन शेडमध्ये राहत आहेत. गावात जाण्यासाठी रस्ता, पिण्याचं पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने दिलेली पुनर्वसनाची आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा;
पुढील ४ दिवसांचा पावसाचा जोर वाढणार Top 10 News :
महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, बहुतांश ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. दरम्यान, वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या सरी सक्रिय होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारी शाळेत प्रवेशावर निर्बंध;
CJP च्या मोहिमेनंतर निर्णय
राजस्थान सरकारने सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. मुख्याध्यापकांची लेखी परवानगी नसल्यास शाळेच्या आवारात छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘कॉक्रोच जनता पक्ष’ाने शाळांची पाहणी करण्याची घोषणा केली होती. पक्षाचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी जयपूर, अजमेर, बारमेर आणि कोटासह विविध ठिकाणच्या शाळांना भेट देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सरकारने हा आदेश काढला. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे. आदेशानुसार वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृह, मैदान आणि स्वच्छतागृहांमध्येही अनधिकृत प्रवेश करता येणार नाही.
गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का;
अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गोवा दौऱ्यापूर्वीच गोवा काँग्रेसमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पक्षाच्या तब्बल १०८ बूथ लेव्हल एजंट्सनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने संघटनात्मक नाराजी समोर आली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रांच्या प्रतीही सार्वजनिक केल्या आहेत. पक्षातील बैठका, निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक निर्णयांमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वाशीम खान आणि सोशल मीडिया विभागाशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळेही नाराजी वाढल्याचं सांगितलं जात आहे. खरगे या नाराजीची कशी दखल घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
भारताच्या निवडणूक प्रणालीवर ट्रम्प फिदा;
अमेरिकेसाठी मागितला ‘सेव्ह अमेरिका ॲक्ट’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक करत अमेरिकेतील मतदानाचे नियम अधिक कठोर करण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकेतील छायाचित्र ओळखपत्राशिवाय मतदानाबाबत प्रश्न उपस्थित केल्याचा दावा केला. भारतात ६४.६ कोटी मतदार असून प्रत्येक मतदाराकडे वैध फोटो ओळखपत्र असणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. ट्रम्प यांनी अमेरिकेत ‘सेव्ह अमेरिका ॲक्ट’ मंजूर करण्याचं आवाहन केलं. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही ट्रम्प यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. प्रस्तावित कायद्यात मतदार ओळखपत्र आणि नागरिकत्वाचा पुरावा अनिवार्य करण्याचा प्रयत्न आहे.
रवींद्र जडेजाचा महाविक्रम!
350 विकेट्ससह दिग्गजांच्या यादीत एंट्री
गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या केशरा नुवंथाला बाद करत जडेजाने कसोटी कारकिर्दीतील ३५० विकेट्स पूर्ण केल्या. यासोबतच कसोटीत ४००० हून अधिक धावा आणि ३५० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो जगातील चौथा, तर भारताचा दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव, इंग्लंडचे इयान बॉथम आणि न्यूझीलंडचे डॅनियल विट्टोरी यांनी हा पराक्रम केला आहे. जडेजा ३५० कसोटी विकेट्स घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज, तर हा टप्पा गाठणारा जगातील तिसरा डावखुरा फिरकीपटूही ठरला आहे.
‘देवखेळ २’ चा टीझर प्रदर्शित
प्राजक्ता माळीचं कधीही न पाहिलेलं रूप Top 10 News :
प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘देवखेळ’ या थ्रिलर सीरिजच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली आहे. जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘देवखेळ २’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरमध्ये विश्वास आणि सारिकाच्या नात्यातील नवा ट्विस्ट पाहायला मिळतो. मंदिरात एका व्यक्तीची किंकाळी ऐकून विश्वास तिथे धावतो. त्यावेळी सारिकाच्या हातात रक्ताने माखलेला कोयता आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसतात. त्यामुळे सारिकाने खून केला की तिला फसवलं गेलं, याची उत्सुकता वाढली आहे. सीरिजची लॉन्च डेट लवकरच जाहीर होणार आहे.





