Top 10 News: ठाकरेंच्या शिलेदाराला केंद्रात मंत्रिपदाची ऑफर, पुण्यात आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे आंदोलन आणि फुटबॉलचा महाकुंभ आजपासून सुरु, वाचा TOP १० बातम्या
Top 10 News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सात खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठाकरेंच्या शिलेदाराला केंद्रात मंत्रिपदाची ऑफर;
7 खासदार शिंदेंच्या संपर्कात?
Top 10 News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सात खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातील एका खासदाराला मंत्रिपदाची ऑफर, तर इतरांना मानाची पदं देण्याची ऑफर शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंकडून खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या ठाकरेंच्या पक्षाच्या मेळाव्याला खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी दांडी मारली होती. त्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाली. याबाबत वाकचौरैंना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत बोलणं टाळलं.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आज CJP चे आंदोलन
‘नीट’, सीबीएसईसह अन्य पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील एक कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी दिलीय. आंदोलनात वेळ आल्यास तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचे म्हणत पुण्यानंतर जयपूर, अमृतसर, लखनऊ आणि बंगळुरू येथे आंदोलन करणार असल्याचे दिपके यांनी सांगितलंय. तसेच नीट परीक्षेतील पेपरफुटी, एनटीएचा गलथांग कारभाराबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.
राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर ;
३-४ दिवसात आणखीन काही भागात येण्याचा अंदाज
देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोमसी पावसाने वाटचाल केली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यात मोसमी पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस काहीसा लांबण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुढील ३ ते ४ दिवसात राज्यातील इतर भागात मोसमी पाऊस दाखल होण्यास स्थिती अनुकूल आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. यंदा राज्यातील नागरिकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव यंदाच्या मोमसी पावसाच्या हंगामावर दिसतो आहे. हवामान विभागाकडून यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुजोर परप्रांतीय कॅब चालकावर गुन्हा दाखल
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय कॅब चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अखेर 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या मुजोर कॅब चालकाचे नाव निशांत धर शुक्ला असं आहे. मारहाण झालेले वयोवृद्ध दाम्पत्य प्रचंड घाबरल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे स्वतःहून पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते नितेश पाटोळे यांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी बनून पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती.
‘माहेरच्यांकडून कार अन् ३ लाख रुपये आण’;
सासरच्या छळाला कंटाळून विवाहिची आत्महत्या Top 10 News:
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची एक धक्कादायक घटना समोर आलीय. वाघाळे गावातील 25 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैशाली नामदेव नवले असे मृत विवाहितेचे नाव असून, जून 2023 मध्ये तिचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच पती, सासरा आणि सासूकडून चारचाकी गाडी आणि शेतीसाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात येत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून वैशाली नवले यांनी घरासमोरील शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी मृत विवाहितेचे वडील शरद निकुळे यांच्या फिर्यादीवरून पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती नामदेव नवले आणि सासरा रुस्तुम नवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वाघाळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.
सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली
पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या सयानी घोष यांनीही बंडखोरांची साथ दिली आहे. त्यांच्यासोबत युसूफ पठाण आणि शत्रुघ्न सिन्हा हेदेखील बंडखोरांच्या गटात सामील झालेत. तृणमूलच्या या बंडखोरांच्या छावणीत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटी खासदारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्यानं राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडालीय. विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मोठा सुरुंग लागण्याची चिन्हे आहेत. पक्षातील 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून एनडीए सरकारला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवलीय.
ओमानमधील जहाज हल्ल्यानंतर तीन भारतीय अजूनही बेपत्ता
भारताने ओमानजवळ झालेल्या व्यापारी जहाजावर जो हल्ला करण्यात आला त्याचा निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे की या हल्ल्यानंतर जहाजावर असलेल्या २४ पैकी २१ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पण तीन भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता आहेत.ओमानच्या तटावर सेटबेल्लो या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. जहाजावर २४ भारतीय होते. त्यापैकी २१ जणांची सुटका झाली आहे. अजूनही तीन भारतीय बेपत्ता आहेत. ओमान या ठिकाणी जो भारतीय दुतावास आहे त्यांचं या घटनेकडे बारकाईने लक्ष आहे. तीन भारतीय नागरिक बेपत्ता आहेत, त्यांच्यासाठीची शोध मोहीम अद्यापही सुरु आहे. भारतीय दुतावासाचे अधिकारी हे ओमानच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचं सांगण्यात येतंय.
पीओकेत पाकच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं;
वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना झाल्याचा सांगण्यात येतंय. पाकव्याप्त मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे एमआय-17 (Mi-17) हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलीय. हेलिकॉप्टरमधील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झालाय. बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. मृतांचा नेमका आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. उड्डाण करताना हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळालीय. हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह 20 सैनिक असल्याच सांगण्यात येतय. काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर पडल्याचे लष्कराने एक निवेदन जारी केले आहेहा अपघात पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यात झाला. हेलिकॉप्टरमधील सर्व सैनिक ठार झाल्याचं म्हटलं जातंय.
3 देश, 48 संघ अन् 104 सामने ;
FIFA World Cup सुरू!
जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ म्हणजेच फुटबॉल! आणि या फुटबॉलचा महाकुंभ, अर्थात ‘फिफा विश्वकरंडक’आजपासून सुरु होणारेय. भारतीय चाहत्यांसाठी ही स्पर्धा शुक्रवारी पहाटेपासून सुरू होणार आहे. यावेळचा विश्वकरंडक अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरणार आहे, कारण आत्तापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विश्वकरंडक असणार आहे. यावेळच्या विश्वकरंडकाचे आयोजन एका किंवा दोन नव्हे, तर तब्बल तीन देशांमध्ये अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत संयुक्तपणे केले जात आहे. एकूण 48 संघ असणार आहेत, याआधी फक्त 32 संघ असायचे. 16 वेगवेगळ्या जागतिक दर्जाच्या स्टेडियम्समध्ये तब्बल 140 सामने खेळवले जातील. त्यामुळे या सर्व सामन्यांचा भारतीय देखील आनंद घेऊ शकणार आहे.
लग्न करून लिव्ह-इनमध्ये राहणारीही माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये…
मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. शशांक नेहमीच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शशांक केतकर यानं थेट देशातील लग्नसंस्थेबाबत आपलं मत व्यक्त केलं असून लिव्ह-इन रिलेशनशिपवरही भाष्य केलंय. विषय अवघड आहे… कारण फक्त तुम्हाला नवरा-बायको हा टॅग लागला आणि एक दागिना गळ्यात आला म्हणजे सगळ्याची उत्तरं मिळाली, असं होत नाही, असं मत शशांक केतकर यानं मांडलंय. त्यासोबतच, एक लग्न करून दुसरीकडे लिव्ह-इनमध्ये राहणारीही माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये, असा भुवाय उंचावणारा खुलासाही शशांक केतकर यानं केला आहे.




