NEETचा पेपर फोडणारा ‘माफिया ग्रूप’ Top 10 News: नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयच्या कारवाईने वेग घेतला आहे. लातूरमधील रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर पुण्यातील मॉर्डन कॉलेजच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनिषा मांढरेला अटक करण्यात आलीय. हे दोन्ही आरोपी NTA च्या तज्ज्ञ पॅनेलशी संबंधित होते. पेपर सेट करणे तसंच पडताळणी प्रक्रियेची जबाबदारी या दोघांकडे होती. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक झाली आहे. दरम्यान आता या पेपरफुटीनंतर nta नं नीटच्या फेरपरीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार आता नव्याने विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. विठ्ठल दर्शनासाठी वशिला ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पंढरपुरातील स्थानिक दलाल आणि भाविकामध्ये दर्शनासाठीच्या आर्थिक व्यवहाराची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर दर्शनाचा काळाबाजार उघड झाला आहे. या गंभीर प्रकाराची मंदिर समितीने दखल घेतली असून कायदे तज्ञांचा सल्ल्याने कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.उद्या पासून अधिक मास सुरु होत असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. अशातच वशिल्याच्या दर्शनासाठी प्रती व्यक्ती दोनशे रुपये या प्रमाणे पाच भाविकांसाठी येथील एका दलालाने फोन पे वर एक हजार रुपये घेतल्याची बाब यातून समोर आली आहे. वशिल्याने दर्शन देणारा दलाल आणि भाविकामध्ये पैसे घेवून दर्शन देण्याबाबत झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. आज सायंकाळी ही कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली. राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण टोकाला? अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष टोकाला गेल्याची चर्चा आहे. कारण राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नसणं ही कारकुनी चूक नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. कारण राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या कार्यालयात असलेले राष्ट्रीय सचिव संजय प्रजापती यांनी याबाबत थेय विधान केलंय. पटेल आणि तटकरे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना पटेलांच्या कार्याध्यक्ष पदाविषयी विचारले असता त्यांनी कार्यकारिणीच्या पत्राचा दाखला देत सदस्यच असल्याचा पुनरूच्चार केला. तर आपल्याला ४० वर्षांच्या राजकारणाचा अनुभव असून योग्यवेळी बोलणार असल्याचं सूचक विधान खासदार सुनील तटकरेंनी केलंय. काँग्रेस नगरसेविकेच्या मुलगी अन् जावयांवर गुन्हा दाखल मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर आली आहे. भांडुपच्या काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या कुटुंबावर भांडुप पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय.काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर या नगरसेविका आहेत. पतीशी संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेचे अपहरण, मारहाण आणि धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. आशा कोपरकर भांडुपच्या प्रभाग क्रमांक 110 च्या नगरसेविका असून या प्रकरणी त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि चालकावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं भांडुपच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भांडुप पोलीस सध्या पुढील तपास करीत आहेत. स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल Top 10 News: कोरोना महामारीनंतर सुरू झालेली युद्धे आणि वाढती जागतिक अस्थिरता यामुळे मागील अनेक दशकांतील विकास धोक्यात येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या पुन्हा गरिबीत ढकलली जाऊ शकते असा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नेदरलँड्समधील द हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना मोदींनी जगासमोरील ऊर्जा संकटाबाबत चिंता व्यक्त केली. त्यासोबतच “आज मानवतेसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. आधी कोरोना आला, त्यानंतर युद्धे सुरू झाली आणि आता ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर गेल्या दशकांतील सर्व उपलब्धी नष्ट होऊ शकतात.” असेही मोदी यावेळी म्हणाले. तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजाराचा भत्ता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मोठी घोषणा केलीय. राज्यातील लोकसंख्या कमी होत असल्यानं त्यात वाढ व्हावी म्हणून राज्य सरकारकडून पालकांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. तिसऱ्या मुलाला जन्माला घालणाऱ्यांना 30 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. तर, चौथ्या मुलाला जन्म देणाऱ्यांना 40 हजार रुपयांचा भत्ता दिला जाईल. चंद्राबाबू नायडू यांनी श्रीकाकुलम जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना यासंदर्भात घोषणा केली. चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारकडून या योजनेसंदर्भातील सविस्तर नियम आणि अटी येत्या महिन्याभरात जाहीर केल्या जाणार असल्याचं म्हटलं जातंय. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भगीरथ याला शनिवारी तेलंगणाच्या हैदराबादमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार यांच्या मुलाविरोधात पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार केली होती. त्याआधारे ८ मे रोजी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात चौकशीसाठी भगीरथ पोलिसांसमोर शरण गेल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी वर्षभरात सोने आणि चांदीची खरेदी करु नये असं आवाहन केलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवलं होतं. यानंतर आता सरकारनं चांदीच्या व्यापारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं चांदीच्या आयातीचे नियम कठोर केले आहेत. विदेश व्यापार महानिदेशालय म्हणजेच डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) नं आज एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार चांदीचे बार म्हणजेच विटा याचे दोन कोड 71069221 आणि 71069221 या दोन्ही वेगळ्या कॅटेगरीच्या चांदीला फ्री ऐवजी प्रतिबंधित मध्ये टाकण्यात आलं आहे. म्हणजेच आता कोणीही थेट चांदीच्या विटा विदेशातून मागवू शकणार नाहीत. चांदी आयातीसंदर्भात घेतलेला निर्णय तातडीनं लागू करण्यात येणार आहे. केकेआरच्या विजयाने गुजरातच्या प्लेऑफचं तिकीट हुकलं आयपीएल 2026 मधील 60 व्या चुरशीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सवर 29 धावांनी मात करत घरच्या मैदानावर विजय मिळवला. फिन ॲलन आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर केकेआरने 247 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला निर्धारित 20 षटकात 218 धावांपर्यंतच मजल मारता आली. शुभमन गिल आणि जोस बटलरची झुंज अपयशी ठरली आणि गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या आशा अजूनही जिवंत आहेत, तर दुसरीकडे गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची आणि प्लेऑफचे तिकीट पक्के करण्याची गुजरातची सुवर्णसंधी हुकली आहे. ‘आखिरी सवाल’ रिलीज होण्याआधीच चित्रपटावर बंदी Top 10 News: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा बहुचर्चित ‘आखिरी सवाल’ चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. भारतात रिलीज झाल्यानंतर आता या चित्रपटाला UAE मध्ये मोठा धक्का बसलाय. UAE सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली असून, त्यामुळे मेकर्सची मोठी अडचण झालीय. समोर आलेल्या माहितीनुसार ‘आखिरी सवाल’ हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या 100 वर्षांच्या प्रवासावर आधारित आहे. चित्रपटात काही संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दे मांडण्यात आलेत. याच पार्श्वभूमीवर UAE सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात अनेक कट्स आणि बदल करण्याची मागणी केली होती. मात्र, मेकर्सनी भारतीय प्रेक्षकांसाठी तयार केलेलं मूळ व्हर्जन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे UAE मध्ये चित्रपटाच्या रिलीजला परवानगी मिळाली नाही.