Top 10 News : ‘राष्ट्रवादी कोणाची?’ पासून ते महिला आशिया कपमध्ये भारताची विजयी सलामीपर्यंतच्या वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीवरून अजित पवार आणि शरद पवार गटातील वाद पुन्हा पेटला आहे.

‘राष्ट्रवादी कोणाची?’;
मेहबूब शेख यांचा अजित पवार गटाला जोरदार टोला
Top 10 News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीवरून अजित पवार आणि शरद पवार गटातील वाद पुन्हा पेटला आहे. अजित गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी, संस्थापकत्व हा इतिहास असून पक्षावर मालकी हक्क नसतो, अशी भूमिका मांडली होती. त्याला शरद पवार गटाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वी पक्ष उभा केला असून त्यांचे योगदान मिटवता येणार नाही, असे ते म्हणाले. पक्ष लोकांचा असला तरी संस्थापकांनाच बेदखल करण्याची नैतिकता काय, असा सवालही त्यांनी केला. यामुळे दोन्ही गटांत पुन्हा ‘इतिहास विरुद्ध कायदेशीर मान्यता’ हा वाद रंगला आहे.
५ सप्टेंबरला दिल्लीत मोठं आंदोलन!
अभिजीत दीपकेंचा सरकारवर गंभीर आरोप
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ५ तारखेला दिल्लीत मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासह प्रलंबित मागण्या अद्याप मान्य न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. जंतर-मंतरवरील यापूर्वीच्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन होईल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, बॉम्बे हायकोर्टाची क्लार्क टायपिंग टेस्ट रद्द करून ती पुन्हा घेण्याची मागणी मान्य झाल्याचेही दीपके यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्यांची भेट घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
खरी की डुप्लिकेट पैठणी?
आता एका बारकोडवर मिळणार संपूर्ण माहिती
महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेल्या पैठणीच्या खरेदीत होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता ओरिजनल पैठणीवर बारकोड आणि विशेष लोगो देण्याचा विचार सुरू असून, त्याद्वारे वापरलेला धागा, पैठणी तयार करणारे कारागीर आणि उत्पादनाचे ठिकाण याची माहिती ग्राहकांना मिळू शकणार आहे. त्यामुळे सेमी आणि बनावट पैठणी सहज ओळखता येईल, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. पैठणी उत्पादन वाढवण्यासाठी कारागिरांची संख्या वाढवण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ सुरूच!
पुढील ५ दिवस ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा नवा अंदाज जाहीर केला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात रिमझिम, तर विदर्भात दुपारनंतर काही ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते. विजांच्या वेळी नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘सुपर एल नीनो’चा धोक्याचा इशारा!
प्रवाळ भित्तींपासून भारताच्या शेतीपर्यंत संकटाची चाहूल Top 10 News :
समुद्राचे वाढते तापमान आणि हवामान बदलामुळे जगातील प्रवाळ भित्तींवर मोठे संकट ओढावले आहे. यावर्षीच्या अखेरीस अत्यंत शक्तिशाली ‘सुपर एल नीनो’ निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे समुद्राचे तापमान वाढून प्रवाळ विरंजनाचा धोका वाढू शकतो. एल नीनोचा भारताच्या मान्सूनवरही परिणाम होण्याची शक्यता असून, सप्टेंबरपासून 2027च्या सुरुवातीपर्यंत त्याचे परिणाम जाणवू शकतात. भात, मका आणि इतर खरीप-रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. काही भागांत पूर, तर काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान बदलामुळे शक्तिशाली एल नीनोच्या घटना अधिक वारंवार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
“दीपकेसह सहकाऱ्यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा”
सोनम वांगचुक यांचा मोठा खुलासा
नीट पेपरफुटीविरोधातील दिल्ली आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे आपल्याला जाणवल्याचे वांगचुक म्हणाले. मात्र, हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे व्यासपीठ बनू नये आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी निष्पक्ष दबावगट म्हणून काम सुरू ठेवावे, असा सल्लाही वांगचुक यांनी दिला.
नेपाळ पुरानंतर अंधारात; भारत धावला मदतीला!
अतिरिक्त वीजपुरवठ्याची तयारी
नेपाळमधील विनाशकारी पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असून वीज निर्मिती क्षमतेत सुमारे ५५० मेगावॅटची घट झाली आहे. या संकटाच्या काळात नेपाळला मदत करण्यासाठी भारत पुढे सरसावला असून, गरजेनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. २६ ऑगस्ट रोजी आलेल्या अचानक पुरामुळे रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील अनेक प्रकल्प प्रभावित झाले. पुरामुळे नेपाळकडून भारताला होणारा वीजपुरवठाही कमी झाला आहे. दरम्यान, नऊ जलविद्युत प्रकल्पांतील सुमारे ५३७ कामगार बेपत्ता असल्याचे वृत्त असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
सायप्रस किनाऱ्याजवळ भीषण दुर्घटना!
270 प्रवाशांसह फेरी बोट उलटली
उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 270 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी फेरी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरेनिया बंदरातून तुर्कीकडे जात असताना किनाऱ्यापासून सुमारे चार मैल अंतरावर बोटीत पाणी शिरू लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत 100 हून अधिक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, जीवितहानीबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. रुग्णवाहिका आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल असून उर्वरित प्रवाशांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
महिला आशिया कपमध्ये भारताची विजयी सलामी!
शेफालीचा धडाका, थायलंडचा 94 धावांनी धुव्वा
महिला आशिया कप 2026 मध्ये भारतीय महिला संघाने दणदणीत विजयाने मोहिमेला सुरुवात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने थायलंडचा तब्बल 94 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने 159 धावा केल्या, ज्यात शेफाली वर्माच्या 36 चेंडूंतील तुफानी 64 धावांचा मोठा वाटा होता. प्रत्युत्तरात थायलंडचा संघ अवघ्या 65 धावांत गारद झाला. दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
निक्की तांबोळी-अरबाज पटेलमध्ये बिनसलं? ;
‘चीटिंग’च्या पोस्टने ब्रेकअपच्या चर्चांना उधाण Top 10 News :
‘बिग बॉस मराठी ५’मधील चर्चेत राहिलेली जोडी निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निक्कीच्या वाढदिवसानंतर अरबाजने तिच्यासाठी रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. मात्र, आता दोघांनीही सोशल मीडियावर ‘चीटिंग’ आणि नात्यातील विश्वासघाताशी संबंधित सूचक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, निक्की किंवा अरबाजने अद्याप ब्रेकअपबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे स्पष्ट झालेले नाही.





