मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा Top 10 News : मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून, पक्षाची आगामी भूमिका काय असेल, याबाबत कानमंत्र देतील. ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने, या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करणार? या मेळाव्यासाठी विशेष दोन स्क्रीन ही मैदानात लावल्या आहेत त्यामुळे त्यावर कोणाचा व्हिडिओ लावला जाणार? संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. राज ठाकरे या भाषणात नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल. राज ठाकरे यांचा 2026 चा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडत असून, त्यासाठीची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे. आगामी राजकीय रणनीती आणि पक्षाची पुढची वाटचाल यावर या मेळाव्यात ते महत्त्वाची भूमिका मांडणार असल्याने सर्वांचे लक्ष या सभेवर लागले आहे. यापूर्वी झालेल्या पदाधिकारी बैठकीत रणनीतीवर चर्चा झाली होती, ज्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा होणार आहे. सहावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीचे पेपर तपासले राज्यातील शिक्षण क्षेत्रात दोन धक्कादायक प्रकार समोर आले असून शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सातारा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सहावीच्या विद्यार्थ्यांकडून तपासून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे, तर अकोला येथे शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर आला आहे. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सहावीच्या विद्यार्थ्याकडून दहावीचे पेपर तपासून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला, ज्यामुळे शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि विश्वासार्हता यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या वेळी संबंधित शिक्षकांचे नाव वैभव शेंडे असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा शाळेने केला. हा प्रकार उघड करणाऱ्या तक्रारदारालाच संस्थेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने वाद अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे, पेपर तपासणारा शिक्षक आणि तक्रार करणारा व्यक्ती या दोघांनाही समान नोटीस देण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या कांडामुळे खळबळ नाशिकच्या कॅनडा कॉर्नरसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये, कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातनं आपल्याच कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. दरम्यान , या विकृत भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्याची कुंडली जगासमोर आली. त्यामुळे वासनांध मांत्रिकाबरोबरच, त्याच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांचीही अडचण वाढल्याचं दिसतंय. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने धार्मिक विधीच्या नावाखाली आधी जाळ्यात ओढले आणि नंतर गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरातचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि त्यानंतर गैरवर्तन करतो, असं दिसून येते. हा व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती 58 व्हिडीओ लागले असून त्यामध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओंच्या आधारे आरोपी ब्लॅकमेल करत होता का किंवा वारंवार अत्याचार करत होता का, याचा तपास सुरू आहे. राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनींच्या दरनिर्धारणात पारदर्शकता आणण्यासाठी पुढील तीन वर्षांत संपूर्ण राज्याचे मायक्रो झोनिंग करण्यात येणार आहे. यामुळे जमिनींचे रेडीरेकनर दर अधिक अचूक आणि वास्तववादी होतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. दरम्यान, ‘महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी सुधारणा) विधेयक २०२६’ सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले. सध्या अनेक प्रकरणांमध्ये कमी मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदवले जातात. जुन्या कायद्यातील सहा वर्षांच्या मर्यादेमुळे अशा प्रकरणांतील थकीत महसूल वसूल करण्यात सरकारला अडचणी येत होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. यावेळी चर्चेदरम्यान आमदारांनी मुद्रांक शुल्क कार्यालयातील अनियमितता आणि दरनिर्धारणातील विसंगतींकडे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, मायक्रो झोनिंगची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. याची सुरुवात प्रथम मुंबईतून होईल. त्यानंतर पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि पुढे ग्रामीण भागात याचा विस्तार केला जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार योगेश सागर, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, दीपक केसरकर आदींनी सहभाग घेऊन विविध सूचना मांडल्या. अखेर सर्वसंमतीने हे विधेयक मंजूर करण्यात आले. पुढील दोन दिवस राज्यात गारपिटीचा इशारा राज्यात उन्हाचा चटका जाणवत असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल झालेत. हवामानतज्ज्ञ सानप यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून, विशेषतः सायंकाळच्या वेळी हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसाचे संकट मात्र गडद झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ढगाळ हवामानामुळे पुढील ४८ तासांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या गारपिटीची देखील शक्यता आहे. मात्र, हा दिलासा अल्पकाळ टिकणारा असून, दोन-तीन दिवसांनंतर वातावरणात पुन्हा बदल होईल आणि तापमानात मोठी वाढ होऊन उन्हाचा कडाका वाढेल. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि फळबागांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. भीषण अपघातात तानाजी सावंतांचे पुतणे बचावले Top 10 News : धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काल मुंबई येथे धनंजय सावंत यांच्या पत्नीसह समर्थकांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशाचा हा कार्यक्रम आटोपून परतत असताना भिगवणजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान, धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गाडीचा चक्काचूर झाला असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र धनंजय सावंत यांचे पुत्र आणि चालक व सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडर महाग होणार? भारतासह जगभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडर महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात गॅस सिलिंडर आधीच महाग आहेत, पण त्यांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलने इराणमधील जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर, साऊथ पार्सवर, हल्ला केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. प्रत्युत्तराची धमकी देत, इराणने आखाती देशांमधील पाच तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराणचे सैन्य सौदी अरेबियाची सॅमरेफ रिफायनरी आणि जुबैल पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, संयुक्त अरब अमिरातीचे अल होसन गॅस क्षेत्र आणि कतारची रास लाफान रिफायनरी आणि मेसाईद पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर हल्ला करू शकते. कच्च्या तेलाच्या किमती ११० डॉलरवर पोहोचल्या. इस्रायलच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती गगनाला भिडत आहेत. या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल जवळपास ११० डॉलरपर्यंत वाढल्या. त्यामुळे आता देशातही पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडर महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तान अण्वस्त्र मिसाईल बनवण्याच्या तयारीत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक भीषण वळणावर पोहोचला आहे. त्यातच दुसरीकडे पाकिस्तान अण्वस्त्र मिसाईल बनवण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर संचालकाडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, अमेरिकेकडून इतिहासात पहिल्यांदाच अण्वस्त्र कार्यक्रमाच्याअनुषंगाने पाकिस्तानवर थेट आरोप केलाय. तुलसी गबार्ड यांनी या संदर्भात कबुली दिलीय.पाकिस्तान, इराण , रशिया , चीन, उत्तर कोरिया अमेरिकेला टप्प्यात आणू शकतील, अशी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र विकसित करत असल्याची माहिती तुलसी गबार्ड यांचा अमेरिकेच्या सभागृह समितीसमोर जबाबमध्ये दिली आहे. दरम्यान, या संदर्भात अधिक बोलताना अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी , “गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान हे अण्वस्त्र आणि पारंपरिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अनेक नवीन, प्रगत आणि पारंपरिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालींवर संशोधन आणि विकास करत आहेत, जे आपल्या अमेरिकेला त्यांच्या टप्प्यात आणतात. गुप्तचर यंत्रणांचे असे मूल्यांकन आहे की अमेरिकेला असलेला धोका सध्याच्या 3,000 हून अधिक मिसाईल संख्येवरून 2035 पर्यंत एकत्रितपणे 16,000 हून अधिक मिसाईलपर्यंत वाढेल” असं त्यांनी म्हटलं. इस्रायलने जगातील सर्वात मोठ्या गॅस क्षेत्राला लक्ष्य Top 10 News : मध्य पूर्वेतील सुरू असलेले युद्ध अधिक धोकादायक बनत आहे. इराणने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीआणि कता रमधील प्रमुख ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची उघडपणे धमकी दिली आहे. हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या गॅस क्षेत्रावर हल्ला केला आहे. वृत्तानुसार, अलीकडील हल्ल्यात इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्राला आणि त्याच्याशी संबंधित तेल व वायू सुविधांना लक्ष्य करण्यात आले. हा जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक मानला जातो, जो इराण आणि कतार यांच्यात विभागलेला आहे. इराणी माध्यमांनुसार, या हल्ल्यात गॅस टँकर आणि रिफायनरीच्या काही भागांचे नुकसान झाले. हल्ला होताच, कामगारांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि आग विझवण्यासाठी आपत्कालीन पथकांना पाचारण करण्यात आले. इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर थेट हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यानंतर, इराणने कठोर भूमिका घेतली असून आखाती देशांमधील प्रमुख ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिलीय. गश्मीर महाजनीने साकारला दमदार गोंधळी येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे. या गोंधळ नृत्यात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोलीसह कमालीचा नृत्याविष्कार सादर केला आहे. नुकतेच हे गीत प्रकाशित झाले असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. जगदंबेचा हा गोंधळ कथानकात थरार आणि उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. संबळाच्या ठेक्यावर रहस्यमय वातावरणात गश्मीरची एन्ट्री वेगळीच रंगत वाढविणारी आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेल्या या गोंधळाला संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचा संगीतसाज आहे. अजय गोगावले यांचा दमदार स्वर गाण्याला लाभला आहे. हा गोंधळ आशिष पाटील यांनी आपल्या सदाबहार अदाकारीने नृत्यदिग्दर्शित केला आहे.