सुनेत्रा पवार-प्रफुल्ल पटेल यांची महत्वाची बैठक Top 10 News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसून येतायेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात दिल्लीत एक बैठक झालीय. प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दिल्लीतील या वेगवान घडामोडींमुळ महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. या बैठकीला सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेली ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जातीय. पक्षात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडी आणि एका पत्राच्या वादामुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आगामी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जातंय. पुण्यात विक्रमी पावसाची नोंद राज्यातील अनेक जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचे चित्र आहे. मात्र, असे असताना पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात काल झालेला पाऊस हा 130 वर्षानंतर एप्रिल महिन्यातील एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती आहे. यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर काल पुणे शहरात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला. अवकाळी पावसाने एका महिलेचा बळी गेल्याची दु:खद घटना घडली, पावसामुळे झाड कोसळले, त्या झाडाखाली तिघे अडकले होते. वादळी वाऱ्याने कोसळलेल्या या झाडाखाली अडकलेल्यांपैकी दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं, तर एक महिला जागीच दगावली. सतीश उर्फ खोक्या भोसलेची निर्दोष सुटका भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर पडलाय. एका व्यक्तीला बॅटने मारहाण या बरोबरच शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या मागील वर्षभरापासून कारागृहात होता. एका व्यक्तीला आपल्या साथीदारासोबत बॅटने अमानुष मारहाण करताना खोक्या भोसलेचा व्हिडिओ समोर आला. याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेत खोक्याला अटक केली. या प्रकरणासोबतच शिरूर तालुक्यातील पिता-पुत्रांना मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार करून हरणाचे मांस घरात आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर बॅटने मारहाण केल्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. कारागृहा बाहेर पडताच खोक्या भोसलेची आणखी एक रील्स चांगलीच व्हायरल होत आहे. मंत्रालय परिसरातील ८० वाहनांवर कारवाई वाहनांवर अवैधरित्या शासकीय दिवे व सायरन लावून फिरणाऱ्यांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम राबवत कडक कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल ८० वाहनांवर कारवाई करत त्यांवरील लाल, निळे आणि पिवळे फ्लॅश लाईट्स तसेच सायरन जप्त करण्यात आले. या सर्व वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंत्रालय आणि विधानभवन परिसरातच बहुतांश गाड्यांवर ही कारवाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या दृष्टीने हा गंभीर मुद्दा ठरला आहे. कल्पना खरातविरोधात लूकाऊट नोटीस Top 10 News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असल्याने आता एसआयटीकडून खरातच्या नातेवाईकांची चौकशी सुरू करण्यात आलीय. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनची पुन्हा एसआयटीकडून चौकशी केली. तसेच कल्पना खरातच्या दोन भावांचीही तपास पथकाने चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्पना खरात फरार असून एसआयटीचे पथक तिच्या मागावर आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी देखील कल्पना खरातचा थांगपत्ता न लागल्याने कल्पना खरातविरोधात लूकाऊट नोटीस काढण्यात आलीय. राघव चड्डा यांनी पक्षाला दाखवला आरसा आपच्या उपनेते पदावरून हटवल्यानंतर खासदार राघव चड्डा यांनी सोशलमिडीयावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या पोस्टमध्ये त्यांनी ‘इव्हिल आय’ या इमोजीचा वापर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अलीकडच्या काळात संसदेत सर्वसामान्यांच्या हितासाठी उठवलेल्या आवाजाची झलक दाखवलीय. यामध्ये मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा, मोबाइल रिचार्जमधील 28 दिवसांचा ‘स्कॅम’,इन्कमिंग कॉल चार्जेस आणि डेटा एक्स्पायरी समस्या, पेपर लीक प्रकरण आणि हवाई प्रदूषणाचा प्रश्न, आरोग्य विम्यावरील GST आणि विमानतळावरील महागडे खाद्यपदार्थ, पॅटर्निटी लीव (पितृत्व रजा) आणि बँकांमधील मिनिमम बॅलन्स दंड, अशा प्रमुख मुद्द्यांचा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करून त्यांनी पक्षालाच आरसा दाखवल्याचं बोललं जातंय. 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ३४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार आयोग २.५७ च्या फिटमेंट फॅक्टर ठेवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होऊ शकते. त्यांच्या पगारामध्ये ३४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल. ८ वा वेतन आयोगाचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये फिटमेट स्वरूपात निधी या आयोगाच्या अहवालात नमुद करण्यात आला आहे. तो साधारण ३ टक्क्यांपर्यंत असू शकतो अशी माहिती समोर आली आहे. यातून पगार ३४ टक्क्यांनी वाढताना पाहायला मिळेल. साधरण १० वर्षांनंतर वेतन आयोग येतो. जर ३४ टक्क्यांपर्यंतची पगार वाढ मिळली तर भरभक्कम वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकते. मात्र सर्वात आधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होईल. त्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरेल. होर्मुझची सामुद्रधुनीसाठी 35 देशांची बैठक अमेरिका – इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात ऊर्जासंकट निर्माण झालंय. याचं कारण होर्मुझची सामुद्रधुनी आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत इराणनं अमेरिका आणि इस्त्रायलची कोंडी केली आहे. मात्र या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक इराणनं रोखल्यानं जगभरात ऊर्जासंकट निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी 30-35 देशांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला भारताला देखील आमंत्रण देण्यात आलंय. ब्रिटनकडून भारताला या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आल्याचं विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं. भारताकडून विदेश सचिव विक्रम मिसरी या बैठकीला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असणार आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु करणे आणि ऊर्जा साधनांचा पुरवठा पूर्ववत करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. सनरायजर्स हैदराबादचा 65 धावांनी दणदणीत विजय कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना महागात पडल्याचं पाहायला मिळालं. कारण सनरायजर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 226 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेननं 52 धावा केल्या. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ या धावसंख्येचा पाठलाग करताना 161 धावांवर बाद झाला. केकेआरकडून अंगकृष रघुवंशीनं 52 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादनं 65 धावांनी विजय मिळवत खातं उघडलंय. तर, केकेआरचा हा या हंगामातील दुसरा पराभव ठरला. या पराभवासह केकेआर गुणतालिकेत तळाला पोहोचलाय. अखेर ‘रामायण’ टिझर प्रदर्शित Top 10 News: वर्षभरापासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, त्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाची झलक अखेर समोर आलीय. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी हा खास टिझर प्रदर्शित करत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं. या झलकमध्ये रणबीर कपूर प्रभू रामा यांच्या भूमिकेत दिसत असून त्याचा लूक पाहून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेत. या चित्रपटात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, व्हिडिओच्या शेवटी ‘रॉकिंग स्टार’ यश साकारणाऱ्या रावणाचीही झलक दाखवण्यात आली पण चेहरा पूर्णपणे उघड करण्यात आलेला नाही. चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटासाठी भरघोस बजेटचा वापर केल्याचं दिसत आहे. या भव्य चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.